तुमचे बह्यासंबंध आहेत हे मला कळलंच.. तेव्हा मी खूप रडली..
टीम आपलं मानसशास्त्र
किती वर्ष झाली मनमोकळ बोललीच नाही.. मनात सगळं दडून ठेवलं… सगळा राग, होणारी चिडचिड, संताप, डोळ्यात साठवलेले अश्रू, इच्छा, अपेक्षा, झालेली निराशा.. सगळ्या सगळ्या भावना आज मोकळ्या कराव्या अस वाटल म्हणून हे सर्व लिहिलं…
आज आपल्या लग्नाला 30वर्ष पूर्ण झाले… 30वर्षां आधी आजच्या दिवशी हसू रडू सगळं सगळं वेगळं होत.. पण आज मात्र सगळ्या भावना पूर्णपणे वेगळ्या झाल्या आहेत..
हल्ली कशी एक यादीच तयार असते आयुष्याचा जोडीदार कसा हवा याची.. आणि त्या यादीत एक सुद्धा कमी नको जर असेल तर next… पण तेव्हा मात्र बघायला कोणी आल की घरचे सगळं ठरवणार.. त्यांना पटलं तर हो नाहीतर नाही आणि त्यांना पटलं म्हणजे काय तर हुंडा.. जागा जमीन.. घर.. नोकरी बस.. स्वभाव.. वागणं बोलणं.. विचार या बद्दल कोणती चर्चा सुद्धा नसायची.. मुलाला कोणत व्यसन आहे की नाही हे शेजारच्या लोकांकडून माहीत काढत पण ते सुद्धा कितपत खर सांगणार..
असो हे सगळं सांगण्याच कारण म्हणजे माझं लग्न सुद्धा यापैकी एक.. नवरा कसा दिसतोय.. त्याच वागणं बोलणं..त्याचा स्वभाव याबद्दल काहीच माहिती नसताना झालेलं लग्न.. पण तरीसुद्धा खूप साऱ्या आशा, सुंदर संसाराची स्वप्न घेऊन या घरात आली..
आणि आज ते आठवतेय तरी अश्रू थांबत नाहीत.. सुरवातीचे दिवस खूप छान होते.. वाटल की असच सुंदर आयुष्य राहील पण माझ्या आयुष्यात इतकं वेगळं वळण येईल याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती..
लग्न झालं.. थोडफार फिरणं झालं.. दोन मुलं झाली.. त्यांचं शिक्षण उत्तम चालू होत पण अचानक तुमच्या वेगळ्या वागण्याची चाहूल लागायला लागली.. नेहमीप्रमाणे तुमचं वागणं नव्हत.. घरात कोणत्या बाबतीत तुम्ही कमी नाही पडलात पण एक नवरा म्हणून तुम्ही काही वेगळं वागत आहात हे जाणवू लागलं.. माझ्यापासून दूर गेल्यासारखे..
तरीसुद्धा काहीच विचारलं नाही पण कोणती गोष्ट किती काळ लपणार.. तुमचे बह्यासंबंध आहेत हे मला कळलंच.. तेव्हा मी खूप रडली.. खूप राग.. खूप संताप झालेला…स्वतःला विचारलं की कुठे कमी पडली मी.. काय चुकलं माझं… तुम्हाला सुद्धा विचारलं .. भांडली तुमच्याशी पण तुम्ही मला कोणतच उत्तर देणं महत्त्वाचं नाही समजल..
असो… त्यानंतर मात्र मी ठरवलं की आजपासून माझं आयुष्य हे फक्त माझ्या मुलांसाठी.. मुलांमधे तर जीव होताच..पण माझ्या दुःखाचं..आणि आमच्यातील बिघडलेल्या संबंधाच सावट मला माझ्या मुलांवर पडू द्यायच नव्हत….
माझं जगण्याचं कारण माझी मुलं आणि माझ्या हसण्याच कारण सुद्धा तेच..बाकी सगळ दुःख मनात साठवून आजपर्यंत नसलेल्या पण वरवरच्या आनंदात जगण्याचा प्रयत्न केला..
आता मुलांचीही लग्न झाली.. ते उत्तम संसाराला लागली.. मुलाचं शिक्षण..त्यांचं career उत्तम घडलं याचा तर आनंद कायम आहे आणि असेलच.. पण मला मात्र कुठेतरी दूर जावं असं वाटतेय.. आज माझा एकटेपणा मला खूप त्रास देतोय..
संसारात एक सहज बाहेर सबंध ठेवतो.. लग्न करून सुद्धा त्या नात्याशी प्रामाणिक राहत नाही.. प्रेम, वासना, आकर्षण यांना बळी पडून अगदी सहजच जोडीदाराला अंधारात ठेवून स्वतः मात्र मनाची मौज करतो.. पण दुसऱ्याच काय.. त्याने त्याच्या बाजूने सगळं व्यवस्थित सांभाळलं असेल.. जर एक कायम प्रामाणिक राहून नात निभावत असेल… तर त्याला मिळणाऱ्या या दुःखाचं कारण काय…
सगळ्या प्रती मी माझी कर्तव्य पूर्ण केली.. तुम्हाला सुद्धा कुठेच काही कमी पडू दिलं नाही..अर्थात स्पष्ट बोलायचं झालं तर शारीरिक आणि मानसिकरित्या.. तरीसुद्धा माझ्या वाट्याला हे दुःख.. हा एकटेपणा आला…
शेवटी हा एकच प्रश्न विचारेन की माझी या सगळ्यात चूक काय….?????
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
