Skip to content

एका स्त्रीला नवऱ्याकडून हवा असलेला सुंदर दागिना कोणता?

एका स्त्रीला नवऱ्याकडून हवा असलेला सुंदर दागिना कोणता?


अपर्णा कुलकर्णी


मालती आज सकाळी लवकर उठून छान तयार झाली होती. पूजा केल्याशिवाय घरातील कोणत्याही कामाला हात लावायचा नाही हा नियम आजवर ती काटेकोरपणे पाळत आली होती. आजही तिने स्वामींची व्यवस्थित पूजा केली आणि मग चहा घेत मनोहरची वाट पहात बसली होती. आज मनोहर सकाळी सकाळी उठून कुठेतरी बाहेर पडला होता ते ही मालतीला न सांगता. आज पहिल्यांदाच असे घडले होते त्यामुळे त्या जास्तच आतुरतेने वाट पहात होत्या.

चहा संपेपर्यंत मनोहर दारात आलेला तिला दिसला. मालती मलाही चहा आणतेस का ?? घरात येत मनोहर म्हणाला, तशी मालती म्हणाली अरे तुझीच वाट बघत होते पण तू कुठे गेलास, कधी येणार हे काहीच सांगितले नव्हतेस त्यामुळे मग मी माझ्यापुरता करून घेतला चहा. तुला माहिती ना मला सकाळचा चहा वेळेत लागतो. हो ग मला माहित आहे पण आज कामच तसे होते म्हणून गेलो होतो मनोहर म्हणाला. हो का असे कोणते काम होते की मला न सांगता जावं लागलं हातची घडी घालून मनोहरकडे बघत मालतीने विचारले.

तसे मनोहरने खिशात हात घालून एक कागदाची पुडी काढली, पुडी बाहेर काढल्या बरोबर त्यातून दरवळणारा सुगंध सांगत होता की त्यात मोगऱ्याचा गजरा आहे. त्यांनी तो बाहेर काढला आणि मालतीच्या केसात माळत ते म्हणाले आता तुझे सौंदर्य पूर्णपने खुलून दिसते आहे मालती. आज आपल्या लग्नाला साठ वर्षे पूर्ण झाली. साठ वर्षांच्या तुझ्या सहवासात माझे आयुष्य ही या मोगाऱ्याच्या सुगंधाप्रमाणे दरवळून निघाले आहे. तू मला पूर्णत्व दिलेस, माझे घरकुल सांभाळले आहेस, एखाद्या लहान मुलाची घेतो तशी माझी काळजी घेतलीस, मला जपलेस तू. हा प्रवास तुझ्यासोबत खूप सोपा झाला आणि कधी साठ वर्षांचा झाला समजलेच नाही.

तुला आठवत का ग मालू ?? तुला मी पहिल्यांदा बघायला आलो होतो तेंव्हाही तू मोगऱ्याचा गजरा माळला होता आणि तेंव्हा तू जशी कमालीची सुंदर दिसत होतीस ना आजही अगदी तशीच सुंदर दिसतेस. मनोहरचे हे बोलणे ऐकून मालतीने लाजून मनोहरला मिठी मारली आणि मनोहर हसायला लागला. मालती म्हणाली, खरंच किती सुंदर काळ व्यतीत केला ना आपण दोघांनी एकमेकांसोबत. तू पाहायला आला होता तेंव्हा कल्पना ही नव्हती की आपण इतकी वर्षे हसून खेळून संसार करू.

माझ्या मामाने तू येण्याच्या तासापूर्वी मला सांगितले होते की, तुला बघायला पाहुणे येत आहेत जा तयार हो आणि मी नेहमीप्रमाणे तयार झाले होते विशेष तयारी न करता कारण तेवढा वेळच नव्हता. आयत्यावेळी मामाने सांगितल्यामुळे मी मामावर नाराज होते आणि कार्यक्रमासाठी तयार नव्हतेच पण तु जेंव्हा माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करून मला म्हणाला की, मला माफ करा असे अचानक मी आलो पण तुमच्या मामांना मी नाही म्हणू शकलो नाही

कारण कोणालाही असे तोडून बोलणे माझ्या स्वभावातच नाही. पण खरच मी दिलगीर आहे. मी माझे शिक्षण अभियांत्रिकीमध्ये पूर्ण केले आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी करत आहे. मला कसलेही व्यसन नाही आणि आजवर कधीच कोणाकडे वाकड्या नजरेने पाहिले पण नाही. असे जेंव्हा तू मला बोललास त्याच क्षणी तुझा स्वभाव मला समजला होता आणि तेंव्हाच मी मनात तुला होकार दिला होता. कारण तुझा खरेपणा तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता आणि आयुष्यभर तू तसाच राहिलास त्यातच मी धन्य झाले मनोहर.

पण मला तुझा आदर तेंव्हा वाटला जेंव्हा लग्नाच्या काहीच दिवसांनंतर तुझ्या बहिनेने माझ्यावर अंगठी चोरल्याचा आळ घेतला पण त्यावेळी तू माझ्या बाजूने ठाम उभा राहिलास. मला खरंच तेंव्हा तुझे खूप कौतुक वाटले मनोहर. अग माझी बहीण जरा आगाऊच होती पहिल्यापासून आणि त्यात तू साधीभोळी. त्यामुळे तिने केलेला आरोप मी हाणून पाडला मी फक्त खऱ्याची बाजू घेतली आणि माज मन मला सांगत होत तू खरी आहेस आणि तेच झालं मनोहर म्हणाला.

पण मी केलं ते काहीच नाही मालू, मी आजारी असताना काही दिवस कामाला जाऊ शकलो नाही आणि त्याचाच फायदा घेऊन लटपटेने कागदांची अफरातफर करून माझ्यावर चोरीचा खोटा आळ आणला होता त्यावेळी माझ्या सोबत ऑफिसमध्ये येऊन ज्या पद्धतीने तू सगळं प्रकरण हाताळले त्यावरून मी तुझा फॅन झालो होतो. किती विश्वासाने बोलली होतीस तू माझ्या बद्दल.

मालू आपल्या या साठ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ उतार आले पण आपण एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. हा आता बाकी जोड्यात होतात तसे वाद आपल्यात ही झालेच पण किती ताणाव, कुठे सैल सोडावं, कधी माघार घ्यावी याच भान सुदैवानं दोघानाही होत आणि म्हणूनच आपल्या संसाराचा गाडा इतका सुरळीत चालू शकला.


खरंय तू म्हणतोस ते मनोहर. नात्यात आपुलकी, प्रेम, विश्वास, जिव्हाळा, आदर आणि समजून घेण्याची तडजोड करण्याची तयारी असेल ना तर कोणतेही नाते कितीही काळ टिकून राहू शकते यात शंकाच नाही. मालू आज तुला मी काय देऊ सांग, खरतर मी, माझा प्रत्येक श्वास, माझे आयुष्य मी तुला वाहिले आहे तरीही सांग तुला काय देऊ ?? मनोहर तू आजवर मला सगळंच भरभरून दिलस.




खरतर प्रत्येक बायकोला तिच्या नवऱ्याकडून सोने, चांदी, पैसा, ऐश्वर्य, प्रॉपर्टी असे काहीच नको असते हवा असतो तो आदर, मान सन्मान, आपलेपणा, प्रेम, समंजसपना आणि सगळ्यात महत्वाचे आपली सुख दुःख वाटून घ्यायला कोणीतरी हक्काचा, विश्वासू माणूस. जी प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यात शोधत असते आणि ते तू मला दिलस. हवं तेंव्हा हवं त्या वेळी तू माझ्यासाठी उपलब्ध होतास.


तुझा हा समंजस पना आणि तू मला दिलेला वेळ हाच माझा दागिना. तू मला वेळ दिला यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं होत माझ्यासाठी जेंव्हा जेंव्हा तु मला वेळ दिलास तो फक्त आणि फक्त माझ्यासाठीच होता आणि माझ्यासाठी हेच कोणत्याही दागिण्याइतकेच मोलाचे होते, आहे आणि राहील. बस बाकी मला काहीच नको.

मालतीचे हे उत्तर ऐकून मनोहरने आनंदाने तिला मिठीत घेतले.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एका स्त्रीला नवऱ्याकडून हवा असलेला सुंदर दागिना कोणता?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!