तारुण्य निघून जाईल म्हणून नियमबाह्य शरीरसंबंध ठेवण्याची मानसिकता..चूक की बरोबर?
मेराज बागवान
आपल्या देशात ‘लग्न संस्था’ निर्माण होण्याचे कारण म्हणजे, कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवणे.आणि ही कुटुंब व्यवस्था तेव्हाच टिकून राहते जेव्हा स्त्री-पुरुष शरीराने जवळ येतात. यालाच आपण ‘शरीरसंबंध’ किंवा आजच्या रोजच्या भाषेत ‘सेक्स’ असे संबोधतो.आपल्या भारत देशात , फक्त लग्नानंतरच शरीरसंबंध ही संस्कृती आजही टिकून आहे.पण काही ठिकाणी जागतिकीकरण, शहरीकरण, सुशिक्षितपणा यामुळे ही सांस्कृतिक कुठे तरी लोप पावत आहे.म्हणजेच आजची काही तरुणाई लग्नाआधी देखील सर्रास ‘शरीरसंबंध’ ठेवतात.आणि यामध्ये त्यांना वेगळे असे काहीच वाटत नाही.वय, तारुण्य निघून जाईल म्हणून असे संबंध बिनधास्तपणे ठेवले जातात.मग ही आजच्या तरुणाईची मानसिकता चूक आहे की बरोबर ?
आजकालची तरुणाई लग्न करायला पटकन तयार नाही.उच्च शिक्षण, करिअर , आत्मकेंद्रित स्वभाव/वृत्ती, स्वातंत्र्य हवे असणे, जबाबदारी घेण्याची इच्छा नसणे, जुळवून घेता न येणे किंवा कोणाबरोबर कायमची बांधिलकी ठेण्याची मानसिकता नसणे अशी काही कारणे या मागे आहेत.पण असे जरी असले तरी , शारीरिक गरज प्रत्येकाला असते.स्त्री असो वा पुरुष दोघांनाही शारीरिक गरजा आहेत.’सेक्स’ ही तर निसर्गाने दिलेली गोष्ट आहे. त्यामुळे ती एक भावना आहे,जी पूर्णतः नैसर्गिक आहे.आणि यामुळे आपसूकच स्त्री-पुरुष एकमेकांकडे ओढले जातात आणि शारीरिक संबंध जुळतात.
स्त्री-पुरुष आज कार्यालयीन जीवनात एकत्र काम करीत आहेत. मेट्रो शहरात ,१२ १२ तास एकत्र काम केले जाते.कधी कधी आकर्षण निर्माण होते.कामाचा ताण प्रचंड असतो.घर ते ऑफिस अंतर जास्त असते , त्यामुळे प्रवासात वेळ जास्त जातो.कॉर्पोरेट जगातील स्पर्धा, डेड लाईनस पाळणे यामुळे दमछाक होते.आणि या सर्व समस्यांमुळे कधी कधी काही स्त्री-पुरुष कुठेतरी ताण हलका करण्यासाठी शरीरसंबंध जोपासताना दिसतात.मोठ-मोठया शहरात हे होत असते.शरीर तरुण असते आणि ते आपल्या गरजा मागत असते. आणि मग यामुळेच एकमेकांशी लग्न झालेले नसताना देखील हे संबंध जोपासले जातात.एकमेकांच्या मर्जीने, संगतमताने हे सर्व होते आणि त्यामुळे आपण जे करीत आहोत ते बरोबर आहे अशी त्यांची मानसिकता होते.
लग्नाचे वय आजकाल वाढत आहे.वयाची तिशी उलटून गेली तरी काही मुले-मुली लग्नाला नकार देतात.पण लग्नाचे वय जरी निघून गेलेले असले तरी अगदी विशीत-पंचविशीत हीच मुले-मुली ‘सेक्स’ मुक्तपणे करीत असतात.पुढे त्याच व्यक्तीबरोबर लग्न होईल की नाही ,हा कोणताच विचार देखील ही पिढी करताना दिसत नाही.किंवा त्यांना त्याचे काहीही देणे घेणे नसते.’लिव्ह इन रीलेशनशीप’ हा प्रकार लग्नापेक्षाही साधा-सरळ मानताना आजची काही पिढी दिसते.मग ‘सेक्स’ ही जरी ‘भावना’ असली तरी देखील , कित्येकदा ती ‘प्रॅक्टिकल’ पणे हाताळताना दिसते.मग अशा गोष्टींमधून अनेकदा प्रश्न पडतो तो म्हणजे , ‘काय चूक आणि काय बरोबर’?
कधी कधी काय होते, शारीरिक संबंध जोपासले जातात.आणि मग दोघांपैकी कोणी तरी एक जास्त भावनिक होतो आणि त्या व्यक्तीत गुंतत राहतो.मात्र दुसर्या व्यक्ती च्या मनात तशा मानसिक भावना नसतात.शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असली तरी मनात मात्र वेगळेच असते.’त्या क्षणापूरती,मी माझी शारीरिक गरज भागवली बाकी काहिच नाही’ असा विचार करणारी देखील काही मुले-मुली आहेत.मग यामुळे भावनिक व्यक्तीला वाटते की आपण फसले गेलो आहोत.मग पुन्हा प्रश्न पडतो ,’काय चूक आणि काय बरोबर’?
एकीकडे पारंपरिक रित्या लग्न करून , संसार थाटून , मुलांना जन्म दिला जातो.आणि दुसरीकडे विवाहबाह्य संबंध ठेवले जातात.पूर्वीसारखी पारंपरिक विचारसारणी आज राहिलेली नाही. घरातील गोष्टींमुळे, धर्म, जात , पालकांचा विरोध यामुळे काही मूला-मुलींची लग्ने एकमेकांशी होत नाहीत.मग दुसऱ्या जोडीदाराशी लग्न करावे लागते.पण पूर्वीच्या गोष्टी तरीही बाहेर सुरूच असतात.मग लग्न होऊन देखील पूर्वीच्या प्रियकर-प्रेयसी शी शारीरिक संबंध जोडले जातात.प्रेम, सेक्स ह्या गोष्टी चुकीच्या ,वाईट अजिबात नाहीत.मात्र तरी देखील आपली सामाजिक व्यवस्था ती आजही सहजरित्या स्वीकारताना दिसत नाही.आणि मग हे ‘नियमबाह्य’ संबंध जुळतात.मग दोन्ही बाजूंचा विचार केला तर ,पुन्हा प्रश्न पडतो ,’काय चूक, आणि काय बरोबर?’.
काहींचे लग्न जमत नाही.वय वाढत जाते पण लग्न जुळणे लवकर शक्य होत नाही.यामागे विविध कारणे असतात.लग्नाचा योग्य जुळून येत नाही, काही केल्या होकार मिळत नाही.मग यातील काही मुला-मुलींची मानसिकता अशी होती की ,’लग्न जमत नाही म्हणून मी माझ्या शारीरिक इच्छा का मारू, तोपर्यंत माझं तारुण्य का वाया घालवू?’ मग जो कोणी ‘पार्टनर’ मिळेल त्याबरोबर शारीरिक संबंध बांधले जातात आणि ती गरज पूर्ण केली जाते. मग यात ‘चूक काय आणि बरोबर काय’?
आजचे जग झपाट्याने बदलत आहे.आणि याचा परिणाम आपल्या देशावर आणि इथल्या माणसांवर होतो आहे.स्पर्धा वाढली आहे.नात्यांमधील ताण-तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सुसंवाद दुरावत चालला आहे.मन स्थिर नाही.जे आपल्या हातात नाही, ज्या गोष्टी मिळू शकत नाहीत त्याचाच ध्यास घेत माणूस जगभर फिरतो आहे.आहे ते स्वीकारण्याची मानसिकता, थोडा संयम कुठेतरी कमी पडतोय.मग काय नैतिक आणि काय अनैतिक ह्या गोष्टी मागे पडत चालल्या आहेत.मग ह्या सगळ्याचा परीणाम शारीरिक संबंध ह्या नाजूक विषयावर होत आहे.लग्न होऊन देखील विवाहबाह्य संबंध करण्यात काहीही गैर वाटत नाही.तसेच लग्नाआधी देखील ते ‘अनुभवण्यास’ कित्येक जण तयार आहेत.
अशा मानसिकतेमुळे मात्र नातेसंबंध काही प्रमाणात बिघडत आहेत.घटस्फोट होत आहेत.नाती कायमची तुटत आहेत.आणि जरी ती तुटली नाहीत , तरी जिवंतपणी मरुन जात आहेत.दुसरीकडे तरुणाई ह्या मानसिकतेमुळे खूप व्यवहारी बनत आहे आणि कोणाशी ‘अट्याचमेंट’ ठेवत नाहीयेत.जणू एकमेकांचा वापर स्वतःच्या गरजा भागावण्यासाठी होताना दिसत आहे.शारीरिक सुख मिळत असेल कदाचित,ताण तेवढ्या काळापुरता कमी देखील होत असेल. पण मानसिक सुख, स्थैर्य, शांतता मिळतच असेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.
परदेशी संस्कृतीचा हा परिणाम म्हणूयात किंवा आणखी काय? मात्र ही मानसिकता खरेच एक सामाजिक विचार करायला लावणारी आहे आणि अनेक गोष्टींचं परीक्षण देखील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Nice