Skip to content

एकट्याने नातं शेवटपर्यंत सांभाळणाऱ्या एका स्त्रीची कथा, इतर महिलांसाठी प्रेरणादायी!

एकट्याने नातं शेवटपर्यंत सांभाळणाऱ्या एका स्त्रीची कथा, इतर महिलांसाठी प्रेरणादायी!


अपर्णा कुलकर्णी


अपूर्वाचे लग्न एका प्रतिष्ठित आणि एकत्र कुटुंबात झाले होते. तिच्या सासरची मंडळी व्यवसाय करत होती. तिच्या दिराचे कपड्यांचे दुकान होते, तिच्या नवऱ्याची बेकरी होती तर चुलते किराणा दुकान चालवत असत. अपूर्वा कधीच इतक्या लोकांत वावरली नव्हती. भाऊ आणि आई वडील इतकाच तिचा परिवार होता. पण स्थळ सांगून आले आणि घरची परिस्थिती खूपच चांगली असल्यामुळे तिच्या आई वडिलांनी हे लग्न करून दिले.

अपूर्वाच्या सासरी सासू, सासरे, नणंद, दिर आणि चुलत सासरे असा परिवार होता. घरपण खूप मोठे होते त्यामुळे पसारा ही तितकाच होता. अपूर्वा ग्रजुअट झाली होती. पुढे तिला मास्टर डिग्री घ्यायची होती पण वडिलांची परिस्थिती शिकवण्यासाराखी नव्हती. त्यामुळे सासर आर्थिक दृष्ट्या सक्षम बघून दिले तर सासरची मंडळी तिला शिकवतील या आशेने त्यांनी अपूर्वाचे थाटात लग्न लावून दिले होते. अपूर्वाच्या शैक्षणिक इच्छे बद्दल तसे बोलणेही झाले होते. घरातील मंडळी शिकवायला तयार होती. त्यामुळे अपूर्वा ही शिकण्याची स्वप्ने रंगवत होती.

अपूर्वाचा नवरा अभिजीत एकदम शांत आणि अबोल स्वभावाचा होता. बरोबर या उलट अपूर्वाचा स्वभाव होता. ती नेहमी बोलत असे पण अभिजीत मात्र हम हम इतकेच करत असे. नंतर नंतर अपूर्वाने त्याच्याशी बोलणे कमी कमी करत शेवटी बंद केले. तरीही अभिजीतला फरक पडला नव्हता. घरातला व्याप खूपच जास्त होता. नणंद सुरुवातीला सासरी राहायची पण एक दिवस नवऱ्याशी भांडून ती दोन मुलांसह माहेरी आली ती कायमची.

अपूर्वा घरातली मोठी सून त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये तिलाच पार पाडावी लागत. तिच्या दिराने प्रेम विवाह केल्यामुळे त्यालाच नेहमी बायकोच्या पुढे पुढे करावे लागे. घरातल्या कामात तिचा हातभार कधीच लागला नाही. सासूला सगळ्याच गोष्टी हातात द्याव्या लागत. एकंदरीत सगळ्या घरच्या कामाचा भार अपूर्वावर पडत असे. हे सगळं करून कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करणे अशक्यच होते. घरातील कोणत्याच गोष्टीत अभिजीत लक्षच घालत नसे, आणि त्याला काही सांगीतले तरीही तो फक्त ऐकून घेण्याचे काम करी त्यामुळे त्याला बोलून फायदाच होत नसे. अपूर्वाची मनात खूप घुसमट होत असे. कधी कधी सगळा राग ती तिच्या बाबांवर काढत असे.

त्यात लग्नाच्या पाच वर्षात ती दोन मुलांची आई झाली होती. अभिजीत फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी तिच्या जवळ येत असे आणि त्यासाठीच थोडेफार बोलत असे. अभिजीत नवरा म्हणून नालायक होताच पण बाप म्हणूनही नालायक ठरला होता. मुलांची काळजी घेणं, शाळेत ने आण करणं, त्यांना वेळ देणं असे कोणतेच काम तो करत नसे. घरात नोकर चाकर पण नव्हते. त्यामुळे सगळा चेंदा अपूर्वा एकटीच उचलत असे. एकदा चिडून ती अभिजीतला म्हणाली होती तुला मुलांची कोणतीही जबाबदारी घ्यायचीच नव्हती तर तु त्यांना जन्माला तरी का घातलस ?? हे ऐकून अभिजीतने तिला खूप मारले होते.

या घरात खायला, प्यायला, ल्यायला काही कमी पडत नाही ना ?? मग उगाच बडबड करू नकोस. तुझ्या बापाने लग्नात हुंडा दिला नाही, उद्या मुलगी शिकून नोकरी करेल आणि पगार तुम्हालाच देईल असं म्हणाला होता तुझा बाप. पण तुला घरातली चार कामे झेपली नाहीत म्हणून कॉलेज केले नाहीस तू. तरीही मी तुला काहीच बोललो नाही आता आयत मिळतय तरीही तोंड फार सुटले आहे तुला ?? असे काहीही वाट्टेल ते बोलला होता अपूर्वाला. हे ऐकून अपूर्वा अंथरुणाला खिळली होती. तिच्या सासरच्या लोकांनी दवाखाना ही केला नव्हता तेंव्हा योगायोगाने तिचे वडील आले होते आणि त्यांनी हा प्रकार पाहिला आणि काही दिवस मुलीला घेऊन जातो म्हणून माहेरी आणले होते. तेंव्हा अपूर्वाच्या भावाचे नुकतेच लग्न ठरले होते.

अपूर्वाची परिस्थिती घरच्यांना कळत होती. तिच्या आई बाबांना तिला माहेरीच ठेवून घेण्याची इच्छा होती पण तुला जर इथे ठेवून घेतले तर माझे ठरलेले लग्न मोडेल ताई. असे भावाचे बोलणे अपूर्वाच्या काळजात घाव देऊन गेले होते. काहीच दिवसात तिने माहेर सोडले अगदी कायमचे. अपूर्वा खूप स्वाभिमानी होती, जगण्याची इच्छा कधीच मेली होती पण कारण संपले नव्हते. ती आता एकटी अपूर्वा नव्हती तर दोन मुलांची आई होती. मुलांना घेऊन आपणही मरावे असा विचार क्षणभर मनात येऊन गेलाही तिच्या मनात, पण जन्म जरी तू दिला असलास तरी मारण्याचा अधिकार तुला नाही असे तिचे मन तिला सांगून गेले आणि तिला ते पटलेही. स्वतःच जन्म दिलेल्या मुलांचा बळी ती माऊली कसा घेणार होती ?? इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती तिची. जगायचे नव्हतेच पण मरताही येत नव्हते असे काहीसे झाले होते तिचे.

अशाच जड पावलांनी स्वतःशी काहीतरी ठरवून ती सासरी आली. आता फक्त ती आई म्हणून जगणार होती. त्यांच्या बापाने कधीच कुठले कर्तव्य पूर्ण केले नव्हते पण म्हणून ती आई म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नव्हती. सगळी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पूर्ण करणार होती. एक एक दिवस ढकलत होती अपूर्वा आणि दिवसाच्या शेवटी कॅलेंडरवर क्रॉस करून दिवस संपल्याचे समाधान व्यक्त करत होती. एक दिवस बातमी आली की अभिजीतच्या बेकरीला आग लागली आणि सगळी बेकरी जळून खाक झाली. अभिजीत रडत रडत घरी आला.

नेमका त्याच वेळी अभीजीत बेकरीचे सामान आणायला बाहेर पडला होता आणि त्याच्या कर्मचारी कडून माल तयार करताना गॅसची नळी लीक होऊन सगळी बेकरी भस्मसात झाली होती. नशिबाने माणूसहानी टळली होती. त्या दिवसापासून अभिजीत दारू प्यायला लागला होता. त्याच्या घरच्यांनी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला स्पष्ट नकार दिला होता. दिर आणि चुलते लगेच वेगळे झाले होते. सासू सासरे असून नसल्या सारखे होते तर नणंदच यांच्या जीवावर बसून खात होती तर ती काय आधार देणार ?? क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. घराच्या वाटणीच्या दोन खोल्या फक्त अपूर्वाल मिळाल्या होत्या.

आहे त्या शिक्षणावर मिळेल ती नोकरी करत अपूर्वाने घर सावरायला सुरुवात केली. अभिजीत फक्त दारूच्या नशेत रहात होता. कधी कधी बेकरीचे स्वप्न पाहून बडबडत असे. दारू प्यायला आई बाबा कडून किंवा कधी अपूर्वाच्या पर्स मधून पैसे चोरत असे. बघता बघता अपूर्वाने स्वतःच्या हिमतीवर घर सावरले. मुलं मोठी केली. त्यांची शिक्षणे केली. आज तिच्या लग्नाला पस्तीस वर्षे पूर्ण झाली होती. संसाराचा सगळा गाडा तिने एकटीने हाकला होता, पर्यायाने हकावा लागला होता. याच काळात तिचे आई वडील वारले होते पण फक्त अंत्यविधी पुरते ती तिकडे गेली होती.

अभिजीत दारूच्या खूप आहारी गेला होता. दारू पिऊन असल्यावर आपण काय करतो, कसे वागतो याचे कसलेही भान त्याला उरत नसे आणि ते स्वाभाविक होते. अशा ही परिस्थितीत अपूर्वा त्याला खाऊ घालण्याचे काम करत असे. नशेत तो बेकरी बद्दल तर कधी अपूर्वाला दिलेल्या त्रासाबद्दल खंत व्यक्त करत असे आणि रडत असे. त्याची ही अवस्था बघून बायको म्हणून जरी दया येत नसली तरी एक माणूस म्हणून अपूर्वा अस्वस्थ होत असे, वाईट वाटत असे. कधी कधी एखाद्या लहान मुलाप्रमाणे अपूर्वाच्या कुशीत शिरून अभिजीत खूप रडत असे. शेवटी एक दिवस दारूने त्याचा बळी घेतला. नंतर अपूर्वाने दोन्ही मुलांची लग्ने केली आणि खऱ्या अर्थाने ती सगळ्याच जबाबदाऱ्या मधून मोकळी झाली.

लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या काही बेसिक अपेक्षा असतात. नवरा प्रेमळ, समंजस आणि प्रामाणिक असावा असे प्रत्येकच मुलीला वाटतेच. एक फेज असते ती आणि त्या वयात प्रत्येक मुलगी संसाराचे गोड स्वप्न रंगवत असते. अशीच काही बेसिक पण महत्त्वाची स्वप्ने होती अपुर्वाचीही. तिला शिक्षणात सपोर्ट करणारा, कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा समंजस नवरा हवा होता. पण अभिजीत सोबत लग्न झाल्यावर त्या स्वप्नांचा बळी गेला आणि स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे विचित्र आयुष्य वास्तव म्हणून जगली ती किंबहुना जगावे लागले तिला. आयुष्यात इतका संघर्ष करूनही न डगमगता किंवा एका पॉइंटवर नवऱ्याकडून कसलीही अपेक्षा न करता आईचे, बायकोचे कर्तव्य पूर्ण केले तिने आणि एकट्याने नातं शेवटपर्यंत सांभाळले.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “एकट्याने नातं शेवटपर्यंत सांभाळणाऱ्या एका स्त्रीची कथा, इतर महिलांसाठी प्रेरणादायी!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!