“पतीला स्वतःची चूक कधीच सापडत नसेल तर तेथून पुढे पत्नीला सुद्धा तिची चूक सापडत नाही.”
अपर्णा कुलकर्णी
नाती आपले आयुष्य खूप सुंदर बनवतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नातेसंबंध असतात. मोजकीच नाती असावीत पण त्या नात्यांची वीण घट्ट आणि कायम स्वरुपी टिकतील अशीच असावीत. सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटपर्यंत साथ देणारे असे एक महत्त्वाचे नाते म्हणजे नवरा बायकोचे. नवरा बायको हे गाडीच्या चाकाप्रमाणे असतात असे अनेक पिढ्यंपासून आपण ऐकत आलो आहोत. पण याची प्रचिती तेंव्हाच येते जेंव्हा आपण त्या नात्यात पडतो, ते अनुभवायला लागतो, जगायला लागतो. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असे म्हणतात, तसेच नात्यात असल्याशिवाय ते नाते समजत नाही.
नवरा बायकोचे नाते थोडे तिखट, थोडे गोड, थोडे आंबट, तर थोडे खारट, तर कधी कडू अशा सगळ्या रसांनी युक्त असते. परिपूर्ण असते, व्यापक असते. या नात्यात पडल्याशिवाय त्याची गोडी कळूच शकत नाही. पण या नात्याची वीण घट्ट असायला हवी, या नात्याची गरज दोघांनाही तितकीच असायला हवी. विचारांचे स्वातंत्र्य हवे, वागणुकीत समानता हवी, एकमेकांबद्दल आदर हवा, एकमेकांना काय हवे आहे त्याची पूर्तता करण्यासाठी दोघेही तयार हवेत, समंजसपणा, विश्वास, प्रेम हवे. तरच आणि तरच ते नाते फुलेल, बहरेल, आपलेसे वाटेल, जगण्याला अर्थ देईल, नवे कारण देईल. नाहीतर मग कोणा एकाची आयुष्याभर फरफट करेल.
भांडण तर प्रत्येक घरात, प्रत्येक कपलमध्ये होतात. पण ती भांडणे किती दिवस ताणून धरायची आणि केंव्हा सगळं सोडून देऊन पुढे जायचे, थोडक्यात कुठे थांबायचे हे दोघानाही समजायला हवे. पण दुर्दैवाने सांगावे लागत आहे मित्रानो, आपण आपल्या भारतीय संस्कृतीत एकविसाव्या शतकात वावरत असलो तरीही आपली भारतीय संस्कृती ही आजही पुरुष प्रधानच आहे. नवरा बायकोच्या नात्यात आजही बायकोनेच समजून घ्यावे, सगळी तडजोड तिनेच करावी, एक पाऊल मागे सरकावे, नवऱ्याची मर्जी सांभाळावी असेच सगळ्यांना वाटते. खेदाची गोष्ट ही की हे संस्कार खूप लहान पणापासून मुलींवर त्यांचे पालक करत असतात. स्वयंपाक शिक, थोरा मोठ्यांशी कसे वागावे बोलावे याचे भान ठेव, एखादे काम मुलगी करत नसेल किंवा येत नसेल तर उद्या सासरी गेल्यावर तुझ कसं होणार, आईचा उद्धार करतील सासरचे लोक. असे शब्द सतत ऐकवले जात असतात मुलींना.
या जगात कोणीही परिपूर्ण नाही, सर्वगुणसंपन्न नाही. त्यामुळे कोणत्याही कपलमध्ये वाद होणे, एकमेकांच्या दोषावर बोट दाखवणे, त्यातून नात्याचा संघर्ष हे सगळं होणारच. पण नातं खुलायला, एकमेकांचे स्वभाव समजायला, गुण दोष समजायला , आवडी निवडी समजायला वेळ तर लागणारच. मग ते लग्न प्रेम विवाह पद्धतिने झाले असले काय किंवा मग अरेंज मॅरेज असले काय. लग्न जर प्रेम संबंधातून झाले तर या सगळ्या गोष्टी आधीच माहीत असतात. पण तरीही प्रेमविवाह करणाऱ्या कपलमध्ये वाद होतच नाही असे अजिबात नाही. करणे वेगळी असू शकतात पण वाद होतातच होतात.
अशा वेळी दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, एकमेकातील गुण दोषा सकट एकमेकांना स्वीकारण्याची गरज असते. आपण माणसे आहोत त्यामुळे वागताना, एकमेकांना समजून घेताना चुका होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे वाद झाल्यावर आपल्या वागण्याचा नीट विचार करा. आपले मन आपल्याला कधीच चुकीचे काही सांगत नाही. त्यामुळे मनाचा आवाज ऐकायला शिका. आपली चूक झाली असे मनापासून वाटत असेल तर माफी मागायला मागे पुढे बघू नका. नात्यासाठी एक पाऊल मागे या. पण जर नवऱ्याला स्वतः कुठे चुकतोय असे वाटतच नसेल प्रत्येक वेळी मी बरोबरच आहे किंवा बरोबरच वागलो असेच वाटत असेल तर मग ती अपेक्षा त्याने बायको कडूनही करूच नये.
अशाने होते काय की बायको माफी मागते आहे ना मग तीच चुकीची असते अशी धारणा होते नवऱ्याची. आणि प्रत्येक वेळी तिनेच माफी मागावी अशी अवाजवी अपेक्षा करायला लागतात पुरुष. पण नात्यात दुरावा नको, कटुता नको म्हणून बायका एक पाऊल मागे सरकत आहेत हे ही समजत नाही या नवऱ्याना. मग चूक कोणाची का असेना बायकोनेच माफी मागावी असा आग्रह होऊन जातो नवऱ्याचा. गृहीत धरायला लागतात नवरे बायकांना. मग हेकेखोर वृत्ती बळावते नवऱ्याची आणि बायको कडूनच समजुतीची अपेक्षा धरली जाते. एकदा दोनदा बायकोने माघार घेऊनही आपली चूक नवऱ्याच्या लक्षात येत नसेल तर मग ती बायकांना पण सापडत नाही.
अशा वेळी नवरा बायकोने काही नियम त्यांच्या नात्यात घालून घ्यावेत आणि त्याचे पालन दोघांनीही करावे. जसे की ,
– ज्याची चूक आहे त्यानेच माफी मागावी.
– माफी मागत असताना कमीपण वाटून घेण्याची गरज नाही. माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही. उलट माफी मागणाऱ्याला नात्याची गरज आणि किंमत असते म्हणून तो/ ती माफी मागतो हे लक्षात ठेवावे.
– ज्याची चूक असेल त्याने आपल्या जोडीदाराची मनधरणी करावी.
– जसे प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतो, तसेच प्रत्येक नवा दिवस आपल्या नात्यासाठी नवी संधी आहे असे समजून वागावे.
– त्या त्या दिवसाचे भांडण त्याच रात्री संपवावे. दुसरा दिवस नवा आणि फ्रेश असे समजून सगळे विसरून नाऱ्याची सुरुवात करावी.
– नाते फुलण्यासाठी दोघांनी एकमेकांना वेळ द्यावा, सगळ्या गोष्टी शेअर जरव्यात. काहीच लपवून ठेवू नये. विश्वास ठेवावा.
– अधून मधून एकमेकांना छोटे पण गोड सरप्राइज द्यावेत.
– एकमेकांस आवडत नाहीत त्या गोष्टी करू नयेत.
अशाने नात्याची वीण खूप घट्ट होईल आणि नाते एका वेगळ्याच उंचीवर जाईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
