पती-पत्नीत अनेक ठिकाणी एकमत आणि ऍडजस्टमेंट असल्यास त्यांचा सुखी संसार कोणीही रोखू शकत नाही.
हर्षदा पिंपळे
पती – पत्नीच नातं हे एका सुंदर नात्यापैकी एक आहे. आणि या नात्याची वीण एकत्र बांधून ठेवणं हे त्या दोघांच्याच हातात आहे.पती-पत्नी दोघही जर एकसंध असतील तर त्यांच्या सुखी संसाराची सुदृढता कायम टिकून राहते. अशावेळी त्यांच्या सुखी संसारात सहसा कुणीच मध्यस्थी करून त्यांचा सुखी संसार विस्कटू शकत नाहीत.प्रत्येक पती-पत्नीचा संसार सुखी म्हणण्यापेक्षा तो एक आदर्श संसार असायला हवा.अर्थात तो आदर्श संसार करणं दोघांच्या हातात असतं.दोघांची एकमेकांना खंबीर साथ असेल तर ही वीण सहजासहजी तुटणं अशक्यच आहे.
कित्येक संसार हे सुखी संसाराच्या व्याख्येत बसतच नाही. कित्येक जोडपी रहायच म्हणून एकत्र राहतात. बोलायच म्हणून एकमेकांशी बोलतात. केवळ गरज म्हणून एकमेकांशी शारीरिक जवळीक साधतात. परंतु त्यात प्रेम,आपुलकी, जिव्हाळा वगैरे काही नसतोच.इतकच नाही तर कोणत्याही गोष्टीत कित्येकदा एकमत नसतं.तर कधी ऍडजस्टमेन्ट नावाचीही गोष्ट नसते.दोघांपैकी कुणीही एखादी गोष्ट मान्य करायला तयारच होत नाही. दोघेही एकाच ठिकाणी अडून राहतात.घरातील कुणी काही बोलत असेल तरी त्याच्यावरही दोघांच एकमत नसतं. दोघांची दोन वेगवेगळी मतं.आणि दोघांचे दोन टोकांचे हट्ट. यामध्ये सुखी संसाराची सोडाच पण साध्या संसाराचीही व्याख्या समजून येत नाही.
अशा संसाराला संसार तरी कसा म्हणायच…??मान्य आहे की दोन भिन्न व्यक्तींची दोन भिन्न मतं असू शकतात.पण कधीतरी ऍडजस्टमेन्टही करायला हवी नं…?सातत्याने जर दोघांची दोन टोकं असतील तर याला काय अर्थ ….? अशाने संसार तरी सुखाचा कसा होऊ शकतो…? अनेकदा सासु-सासरे (दोघांचे) कसेही असले तरी पती-पत्नी स्वतःच्या संसाराची वीण नक्कीच घट्ट बांधून ठेऊ शकतात. पण जर दोघांचच एकमत नसेल तर संसाराची चाकं सैल व्हायला वेळ लागत नाही.
आता सुखी संसार कुणाला नको असतो…?? आपला संसार हा एक सुखी-आदर्श संसार व्हावा असच जर वाटत असेल तर पती-पत्नीने काही गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या गोष्टी मनापासून स्वीकारणं गरजेच आहे.संसार करताना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो.परंतु अडचणींना सामोरं जाताना किंवा कोणताही निर्णय घेताना ,एखादी गोष्ट करताना जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं ,एकमेकांवर योग्य तो विश्वास दाखवला तर गोष्टी सहज सोप्या होतात. वेळेला एकमत आणि कधीतरी ऍडजस्टमेन्ट ही दोघांनाही करता यायला हवी.
संसारात विश्वासासोबतच एकमत आणि ऍडजस्टमेन्ट या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.या दोन्ही गोष्टी जमत असतील तर नात्यामधील विश्वास अगदी नैसर्गिकपणे टिकून राहतो. आणि ते नातं त्याच विश्वासावर अगदी निर्धास्तपणे जिवंत राहतं.त्यांचा तो सुखी संसार अशावेळी कोणीही मोडू शकत नाही.कुणीही त्यांना सुखी संसार करण्यापासून रोखू शकत नाही.त्यामुळे ‘एक दिवस मी एक दिवस तू’ आणि ‘एक दिवस आपण’ असं करत करत संसाराची गाडी एका सुंदर डेस्टिनेशनपर्यंत नक्की घेऊन जायच प्रयत्न करा.
संसारात अनेकदा वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. कधी घर घ्यायच असतं तर कधी अपत्याचा प्रश्न असतो.तर अशावेळेस दोघांनी एकमत होऊनच निर्णय घ्यायला हवे. घर दोघांच असतं -अपत्य दोघांच असतं त्यामुळे अशा काही गोष्टींवर एकमत झाल्याशिवाय कधीच पुढे जाऊ नका.आणि काही गोष्टी अशा असतात जिथे तडजोड करणं गरजेच असतं.तर वेळप्रसंगी पतीने समजून घ्यावं तर कधी पत्नीने समजून घ्यायला हवं.अशाने नाती स्थिर राहतात. नात्यात कोणत्याही प्रकारची अस्थिरता जाणवत नाही.त्यामुळे पहा,विचार करा आणि सुखी संसाराच एक आदर्श रूप नेमकं काय असावं….याची इतरांनाही जाणीव करून द्या.
एकमत+ऍडजस्टमेन्ट = सुखी संसार
याचं उत्तम उदाहरण पहायच असेल तर डबल सिट नावाचा चित्रपट आवर्जून पहा.इतक्याशा खोलीत ती ऍडजस्टमेन्ट करते.नंतर त्यांच्या स्वप्नांविषयीच एकमत…..आणि सुरू झालेला सुखी संसार. एकमत+ऍडजस्टमेन्ट = सुखी संसार हे समीकरण म्हणजे हा चित्रपट आहे.केवळ चित्रपट पाहण्यात काही अर्थ नसतो.त्यातून थोडं चांगलं आपण शिकायला हवं.
चला थोडं त्यातून काही शिकूयात… आपलाही संसार आदर्श नी सुखी करूयात…!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
