विवाहपूर्व समुपदेशनाचे १० फायदे !!
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
विवाह बंधनाला आपल्या भारतात खूप महत्त्व आहे. कारण इथे मुळातच नातेसंबंध, त्यांची जपणूक यांना पहिल्यापासून महत्त्वाचं स्थान आहे. त्यातून कुटुंब हे तर केंद्रस्थानी येत. अश्या या कुटुंबप्रधान संस्कृतीत विवाह तितकीच महत्त्वाची भूमिका निभावत. इथे दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंबाचा विवाह होत असतो. अनेक नवी नाती यात तयार होत असतात, जोडली जात असतात. जी आयुष्याच्या शेवटपर्यंत जपली जातात. हेच तर याच वैशिष्ट्य आहे.
पण अलीकडच्या काही काळाचा आढावा घेतला तर अस दिसून येत की विवाह टिकण्यात, टिकवण्यात अडथळे येत आहेत. घटस्फोटाच प्रमाण वाढताना दिसत आहे. याची कारण वेगवेगळी आहेत. व्यक्तीनुसार बदलत जाणारी आहेत. परंतु हे जर कुठेतरी कमी करायचे असेल तर यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन. विवाह पूर्व समुपदेशन हा जोडप्यांना दिल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीचा एक भाग आहे. यामध्ये दोन व्यक्ती ज्या पुढे जाऊन लग्नबंधनात अडकणार आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणली जाते. जसं की एकमेकांचे स्वभाव, आर्थिक परिस्थिती, इंटीमसी बदल असलेली त्यांची मतं, स्वतःमध्ये असलेलं चांगले, वाईट गुण हे सर्व विषय यामध्ये चर्चिले जातात.“Premarital counseling helps couples create a blueprint for their lives together,” असं relationships मध्ये specialization केलेल्या psychologist Sabrina Romanoff म्हणतात.
अजूनही भारतात समुपदेशनाबद्दल पुरेशी जागृती नाही. उलट गैरसमज जास्त आहेत. त्यातही पूर्व वैवाहिक समुपदेशन साठी येणारी तर खूप कमी आहेत. कारण अजूनही लोक मोकळेपणाने बोलायला कचरतात. परंतु अश्या प्रकारे समुपदेशन करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण नंतर होणाऱ्या वादांची कारण जरी बदलत असली तरी त्यातला एक धागा असतो तो म्हणजे ती व्यक्ती, जी आपला नवरा किंवा बायको असते ती अजूनही आपल्याला पुरती समजेलेलीच नसते. कारण तसा संवाद झालेला नसतो. तेव्हढा वेळच एकमेकांना दिला गेलेला नसतो. यामुळे जरी लग्न झालं तरी ओळख मात्र नीट झालेली नसते आणि नंतर जस जसं एक एक गोष्टींचा उलगडा होतो तसे तसे मतभेद तंटे वाढतात. म्हणून या गोष्टी, एकमेकांबद्दल जास्तीत जास्त समजून घेणं महत्त्वाचं ठरत. जे या समुपदेशनातून केल जात. बऱ्याच जणांना याविषयी पुरेशी माहिती नसल्याने तिथे जाण्याचं प्रमाण कमी आहे. तसेच याचे अनेक फायदे आहेत तेही माहीत करून घेणं आवश्यक आहेत. ते कोणते ते पाहू:
१.चांगला संवाद होतो: विवाहपूर्व समुपदेशनाचा मुळ हेतू हाच आहे की दोन व्यक्तींचा नीट संवाद व्हावा. कारण दोन्ही एकमेकांना अनोळखी असतात. स्वभाव नीट माहीत नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये जर उत्तम संवाद झाला तर स्वभाव उलगडायला मदत होते. आपल्या आवडीनिवडी, कमतरता, चांगले गुण, आपल्या आयुष्यातील विविध प्रसंग शेअर केल्याने तो माणूस हळू हळू समजायला मदत होते.
२: विचारपद्धती समजते: आपल्या एकंदरीतच आयुष्यावर आपल्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे. हे विचार तयार होतात कसे होते? तर आपल्या belief system मधून. विवाहपूर्व समुपदेशनामुळे त्या व्यक्तीची belief system समजायला मदत होते. आयुष्याकडे, वैवाहिक आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा/तिचा दृष्टिकोन समजतो.
३: एकमेकांच्या अपेक्षा/इच्छा समजतात: दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, नात्यात येतात तेव्हा त्यांच्या एकमेकाकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. मग ते नवरा बायको म्हणून असेल, सून, जावई, कामाच्या बाबतीत इतर बाबतीत हे सर्व असणार आहे. फक्त याची आधी पुरेशी स्पष्टता नसल्याने नंतर समस्या येतात. या समुपदेशनातून त्या अपेक्षा सांगितल्या जातात, मतं जाणून घेतली जातात.
४. समस्या निराकरण शिकवले जाते: लग्नानंतर पुढे जाऊन ज्या काही समस्या मग त्या छोट्या का असेनात निर्माण होतात त्या कश्या सोडवाव्यात, त्यावर कसा मार्ग काढावा याबद्दल यात समुपदेशन केले जाते.
५: लग्नाबद्दल असणारी चिंता कमी केली जाते: अनेक जणांच्या मनात लग्न म्हटल की चिंता निर्माण होते, नवीन जबाबदाऱ्या, नवीन नाती हे सर्व सांभाळता येईल का नाही अशी मनात चिंता असते. ती यात कमी केली जाते. नेमक्या कोणत्या गोष्टीची चिंता वाटत आहे त्याबद्दल नीट चर्चा करून त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत केली जाते.
६: चुकीचे/अकार्यक्षम वर्तन शोधून ते कमी केले जाते: प्रत्येकाच्या स्वभावात गुण दोष असतातच. ते शोधून काढून त्यावर काम करता येते. जे यात केले जाते. असे वर्तन जे पुढे जाऊन नात्यामध्ये अडथळा आणू शकत ते शोधून कमी करण्यास, दुरुस्त करण्यास मदत केली जाते.
७. चांगल्या बाजूवर लक्ष देणे: कोणत्याही गोष्टीच्या चांगल्या वाईट दोन्ही बाजू असतात. ते आपल्यावर आहे आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करतो, ते वाढवण्यसाठी प्रयत्नशील राहतो. यामध्ये ही नात्याच्या चांगल्या बाजूवर लक्ष देण्यास शिकवले जाते.
८. निर्णय क्षमता विकसित केली जाते: नवरा बायको म्हणून जेव्हा एक नात तयार होते तेव्हा आयुष्याच्या अनेक टप्प्यावर निर्णय हे घ्यावे लागतात. आणि ते फक्त एकानेच घेऊन चालत नाही ते दोघांनी घ्यायला लागतात. तितका त्यांच्यामध्ये समजूतदारपणा, संवाद लागतो. एकत्र निर्णय घेण्याची क्षमता यावी लागते. मग ते काम असुदे, मुल असुदे. ही निर्णय क्षमता यात विकसित केली जाते.
९. भविष्याबदल बेत आखता येतात: हे समुपदेशन दोघांनाही भविष्यबद्दल बेत आखुन देण्यास मदत करते. ज्यामध्ये आर्थिक बेत असतील, फॅमिली बद्दलचे असतील. या सर्व गोष्टी वास्तववादी दृष्टीने कश्या करता येईल हे समजून घ्यायला मदत करते.
१०: एकमेकांबद्दलचा स्वीकार वाढतो: जर आपल्याला एखाद्या व्यक्ती नीट समजली, तिच्यातील चांगल्या बाजू, कमतरता नीट समजून घेता आल्या तर त्या दृष्टीने काही प्रसंग निर्माण झाला तर त्या व्यक्ती बद्दलचा स्वीकार वाढतो. तो जर वाढवला तर समस्या कमी होते. उदा. समजा मुलीला जेवणात फार रस नाही, नीट बनवता येत नाही हे जर आधी मुलाला माहीत असेल तर पुढे तिने एखाद्या वेळी नाही जेवण बनवले तर त्याला त्रास होण्याचं प्रमाण कमी आहे. तसच मुलाच्या बाबतीतही, त्याला जर बाहेरून समान आणायची सवय नसेल तर बायकोला त्रास होण्याचं काही कारण असणार नाही. इथे उलट ज्या गोष्टी त्यांच्यामध्ये कमी आहे त्या त्यांना कश्या शिकवल्या जातील यावर भर असेल.
शेवटी नात जरी प्रेमाचं असल तरी त्यात फक्त प्रेम असून चालत नाही. त्यासाठी या सर्व गोष्टी पण तितक्याच गरजेच्या असतात. म्हणून त्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. त्यातलीच समुपदेशन ही गोष्ट आहे जी आपल्या नात्याचा पाया मजबूत करते. कारण इमारत कितीही मोठी असली तरी त्याचा पाया किती खोल आहे यावर त्याच टिकण ठरतं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लग्नाना पुर्वी दोघांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे पुढे जाऊन दोघांचा त्रास कमी होईल आणि जीवन सुखी होण्यासाठी मदत होईल
Khrach yachi garaj ahe khup lokana .
खूपच सुंदर मुद्दे आहेत. प्रत्येक लग्ना पूर्वी समुपदेशन करून सहा महिने अंमलबजावणी करावी
अतिशय उपयुक्त माहिती आहे