Skip to content

बायको आपल्या नवऱ्यासाठी कधीच एक प्रॉब्लेम होऊ शकत नाही..वाचा कथा!

बायको आपल्या नवऱ्यासाठी कधीच एक प्रॉब्लेम होऊ शकत नाही..वाचा कथा!


अपर्णा कुलकर्णी


बायको आपल्या नवऱ्यासाठी कधीच एक प्रॉब्लेम होऊ शकत नाही..वाचा कथा!

निनाद आणि जान्हवी दोघांचे लग्न म्हणजे एक तडजोड होती. हो तडजोडच पण दोघांच्या संमतीने केलेली. निनाद खूप श्रीमंत, एकुलता एक आणि लाडा कोडात वाढलेला मुलगा. आता तो मुलगा राहिला नव्हता पुरुष या कॅटेगरीत मोडत होता. कॉलेजमध्ये असताना त्याचे एका मुलीवर नितांत प्रेम होते. पण निनादचा जरा तिरसट स्वभाव लक्षात आल्यामुळे तिने त्यांचे नाते संपवले आणि लग्नास नकार दिला. त्यामुळे निनादला अनेक स्थळे येऊनही त्याने लग्न केले नाही. अजूनही तो त्याचे पहिले प्रेम विसरू शकला नव्हता.

जान्हवी तशी दिसायला एकदम ठाकठीक. रंग रूप फारसे उठाळून येणारे नव्हतेच. सावळी पण नाकी डोळी नीटस. शिवाय घरातली परिस्थिती फारच बेताची. त्यामुळे हुंड्याची अपेक्षा तिचे आई वडील पूर्ण करू शकले नाही आणि घरातली जबाबदारी मोठी मुलगी या नात्याने जान्हवीने स्वीकारली. जॉब करून घर सांभाळत असे ती. त्यामुळे तिचेही लग्नाचे कोवळे वय केंव्हाच सरले.

त्यामुळे निनाद आणि जान्हवी यांचे बऱ्याच उशिरा लग्न झाले. जान्हवीने तिशी पार केली होती तर निनादने पस्तिशी. निनादच्या आईने अंथरूण धरल्यामुळे कसेतरी मनाविरुद्ध त्याने लग्न केले होते.

संसार सुरू झाला होता दोघांचा पण तो समाजासाठी. त्यांची मने अजूनही जुळून आली नव्हती. शारीरिक जुळवाजुळव झाली होती, ती सुद्धा निनादच्या आईला म्हणजे जान्हवीच्या सासू बाईना वंशाला वारस म्हणून कोणीतरी हवे होते म्हणून. निनादने इथेही कर्तव्यापूर्ती केली होती ती ही त्याच्या आईसाठी.

दिवस जात होते, हळू हळू संसार पुढे चालत होता. घरात पैसा आडका, नोकर चाकर कशाचीही कमतरता नव्हती पण सुख नव्हते. जान्हवी तशी सगळ्या सुखाला पोरकीच होती. निनादचा स्वभाव खूप आतल्या गाठीचा होता. एकतर पुरुष बोलून व्यक्त होतच नाहीत तो त्यांचा पॅटर्न नसतोच. पण निनाद अनेक गोष्टी मनात ठेवून वागत असे. एखादी गोष्ट पटत नाही तर तो ती बोलून दाखवणार नाहीच, आणि समोरच्याने ती ओळखून वागल पाहिजे असा त्याचा हट्ट होता.

चुकून जान्हवीकडून काही त्याच्या अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत तर त्याच गोष्टी मनात राग ठेवून तो पुढचे चार दिवस चिडून वागत असे. कदाचित त्याच्या याच स्वभावामुळे त्याच्या प्रेमाला तो मुकला होता आणि आता बायकोचे प्रेम मिळवू शकत नव्हता.

पण जान्हवी पहिल्या पासूनच खूप धीराची आणि समंजस होती. लग्न झाल्यावर काहीच दिवसात तिने निनादचा स्वभाव ओळखून वागायला सुरुवात केली होती. या नात्यात कसलीही अपेक्षा न ठेवता हे नाते जमेल तसे पुढे न्यायचे तिने ठरवले होते. आणि बऱ्याच प्रमाणात त्यात यशस्वी झाली होती. शिवाय जॉब चालूच होता त्यामुळे कामात मन रमवत होती. पण तिची सासू मात्र खूपच छान आणि मोकळ्या स्वभावाची होती. आपला मुलगा कशा स्वभावाचा आहे हे त्या माऊलीने चांगलेच ओळखले होते. आणि त्यानुसार काही टिप्स तिच्या लाडक्या सुनेला दिल्या होत्या. दोघीही एकमेकींच्या छान मैत्रिणी झाल्या होत्या. जान्हवीच्या बाबतीत हीच एक सुखाची गोष्ट होती.

बघता बघता त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली होती. जान्हवी आणि निनादच्या पोटी जन्मास आलेला अंकुर चार वर्षांचा झाला होता. जान्हवी घरातले आणि नवऱ्याचे सगळे कर्तव्ये मनापासून पार पाडत होती. मुलाची शाळा, अभ्यास, खाणे पिणे, नवऱ्याची मर्जी सांभाळून वागणे, सासूचा दवाखाना औषध गोळ्या अगदी सगळे.

एकदा तिच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या तर जान्हवीने आठ दिवस सुट्टी काढून सासूचे आईप्रमाणे सगळे दुखणे केले होते. रोज सासूसाठी स्वतःच्या हाताने सगळे करून तिने त्यांची तब्येत ठणठणीत केली होती.

निनाद हे सगळं बघत होता. आतून त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत होती पण बोलून दाखवणे हे त्याच्या स्वभावात नव्हतेच कधी. त्यामुळे त्याच्या भावना त्याच्याच मनात साचून राहिल्या.

कालच त्यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली होती. जान्हवी खिडकीत बसून गेल्या काही वर्षांचा आढावा घेत होती. निनाद बेडवर बसून तिच्याकडेच पहात होता. अचानक निनादच्या छातीत कळ आली आणि वेदनेने तो व्हीवळला. जान्हवी पळत त्याच्याकडे धावली. डॉक्टर म्हणाले हार्टअटॅक आहे पण सौम्य प्रकारचा होता. पण इथून पुढे काळजी घ्या. जान्हवी भरल्या डोळ्यांनी निनादकडे पहात होती. त्याची खूप काळजी घेणार होती. त्याची आई आणि मुलगा त्याच्या उशालाच बसून राहिले होते. आता निनादला झोप लागल्यामुळे दोघेही बाहेर गेले होते.

निनाद बेडवर पडून होता. त्याने डोळे उघडले तर जान्हवी नुकतेच त्याच्यासाठी गोड शीरा घेऊन आली होती. तिने हळूच त्याच्या मानेखली हात घालून त्याला उठवले, दोघांची नजरानजर झाली. आज पहिल्यांदा जान्हवीला निनादच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम दिसत होते. त्याचे डोळे भरून आले होते. त्याची अवस्था पाहून जान्हवी कासावीस होत होती. तिने हळूच त्याचे डोळे पुसले आणि त्याला स्वतःच्या हाताने भरवले. आज निनादच कंठ सतत दाटुन येत होता. जान्हवी त्याची खूप काळजी घेत होती. त्यात जबाबदारी, कर्त्याव्यापूर्ती आणि प्रेम सगळेच होते. बघता बघता पंधरा दिवस झाले. जान्हवी आता नोकरीवर रजा घेतली असल्याने घरात पूर्ण वेळ तिने निनादची काळजी घेण्यात घालवला होता. त्यात कसलीही कसूर तिने ठेवली नव्हती. निनाद आता चांगलाच बरा झाला होता. त्याची रीकव्हरी पाहून सगळेच सुखावले होते आणि नेहमीप्रमाणे याचे सगळे श्रेय जान्हवीच्या सासूने जान्हवीला दिले होते. पण आजही निनाद निशब्द होता नेहमी प्रमाणेच.

निनाद आज बागेत बसला होता. संध्याकाळची वेळ होती, छान सूर्य अस्ताला जाताना दिसत होता, पाखरांचा किलबिलाट होता. वातावरण अगदीच शांत, प्रसन्न होते. जान्हवी त्याची कॉफी घेऊन तिथे आली. आज निनादच्या चेहऱ्यावर विलक्षण सुख दिसत होते तिला. ते पाहून तीही मनोमन सुखावली. अहो कॉफी घेताय ना ?? तिने विचारले तसा तो भानावर आला त्याने कॉफीचा मग हातात घेत तिला बसायला सांगितले. जान्हवी जरा आश्चर्य चकित होऊन तिथे बसली. कॉफी घेत घेत निनाद जान्हवीकडे टक लावून पहात होता. मावळत्या सूर्याची किरणे जान्हवीच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे तिचा सावळा पण नाकी डोळी नीट असलेला चेहरा खरंच सुंदर दिसत होता. आज पहिल्यांदा निनाद तिच्याकडे इतक्या जवळून टक लावून पहात होता. जान्हवी मात्र निसर्ग सौंदर्य न्याहाळन्यात मग्न होती.

ती जरावेळ बसून जायला निघाली तसे निनादने तिचा हात पकडला. तिच्या अंगावर क्षणात काटे उभे राहिले. आजचा त्याचा स्पर्श तिला खूप काही सांगून जात होता, लग्नानंतर पहिल्यांदा ती असे काहीतरी अनुभवत होती. तिने मागे वळून पाहिले तर निनाद तिच्याकडे पाहून गोड हसत होता. कुठे जात आहेस बस ना माझ्याजवळ. निनादच्या या बोलण्याने ती मंत्रमुग्ध होऊन खाली बसली. काही काम आहे का तुला? त्याने प्रश्न केल्यावर भानावर येत ती नाही म्हणाली.

निनादला तिची अवस्था कळत होती. त्याने हळूच जान्हवीचा हात त्याच्या हातात घेतला आणि घट्ट पकडून म्हणाला, जान्हवी आजपर्यंत मी तुझ्याशी खूप तुटकपने वागलो, तुला सतत हिनावत आलो, तुझ्या रुपावरून वागण्यावरून बोलत राहिलो. घरी आल्यावर माझी विचारपूस करणं, मला काय हवं नको ते विचारणं मला कट कट वाटत होते. माझी बायको माझ्यासाठी अडचण आहे प्रॉब्लेम आहे असे वाटत होते. तुझा बोलका स्वभाव माझी डोकेदुखी आहे असे वाटत होते मला.

पण इतकी वर्षे तू माझा स्वभाव ओळखून, माझ्या शब्दांची ही गरज न पडता सगळे निरपेक्ष भावनेने केलेस ते ही अगदी प्रेमाने. फक्त माझे नाही तर माझ्या आईला स्वतःची आई समजून तिला जपलेस, आपल्या मुलावर उत्तम संस्कार केलेस. माझा अव्यक्त स्वभाव जाणून घेऊन तडजोड केलीस. वेलेप्रसंगी माझी चिडचिड सहन केलीस. कधीच एका शब्दानेही तक्रार केली नाही, किंबहुना मी ती संधीच कधी तुला दिली नाही जान्हवी. तुझे दिसणे, तुझा स्वभाव सगळेच खटकत होते. खरतर हे लग्न करून जशी मी तडजोड केली तशीच ती तुलाही करावी लागली होती.

पण ते समजून न घेता उपकार केल्यासारखे तुझ्याशी वागत राहिलो, मनात अढी ठेवून. आज तुला एक गोष्ट सांगतो जान्हवी, मी कॉलेजमध्ये असताना एका मुलीच्या प्रेमात होतो. पण माझ्या याच स्वभावामुळे तिने मला सोडले. दोष खरतर माझ्या स्वभावात होता. तडजोड मी करायला हवी होती. पण तू , तुला सगळे समजून पण तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्या सोबत संसार केलास. मी तुला कोणतेच सुख दिले नाही. पण तू माझ्या सुखाची आणि माझ्या पैशांची मागणी केली नाहीस. तू नोकरी करत स्वतः चा स्वाभिमान, स्वतःचे अस्तित्व जपत संसार सुरळीत सुरू ठेवला. तुला हे घर सोडून निघून जाणं सहज शक्य होते पण तू तो व्यभिचार केला नाहीस जान्हवी. मी तुझा ऋणी आहे खूप खूप ऋणी आहे. माझ्या सारख्या विचित्र माणसाच्या आयुष्यात येऊन त्याचे नंदनवन केलेस तू.

पण आता या क्षणापासून मी शपथ घेतो जान्हवी , तुला साथ देईन अगदी मनापासून. तुला कधीच अंतर देणार नाही. कायम तुझ्या सोबत असेन. आजवर जे क्षण माझ्यामुळे निसटून गेले त्या प्रत्येक क्षणाची भरपाई करेन. आज मला समजले आहे बायको आपल्या नवऱ्यासाठी कधीच प्रॉब्लेम असू शकत नाही. कधीच नाही.

जान्हवीच्या डोळ्यातील आसवे निनादच्या हातांवर पडतच होती. तिच्या संयमाचा बांध आज आश्रुंवाटे फुटला होता, तिची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली होती. दोघेही एकमेकांच्या मिठीत अव्यक्त बांध अश्रुवाटे मोकळा करत होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!