Skip to content

उत्तम शरिरसंबंध हे तुमच्यातील उत्तम संवादावर अवलंबून असतात.

उत्तम शरिरसंबंध हे तुमच्यातील उत्तम संवादावर अवलंबून असतात.


हर्षदा पिंपळे


पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच.

तरच ती टिकतात…नाहीतर ती तुटतात.

एक मनापासून आणि एक मुळापासून….!

हे शब्द कुणाचे आहेत काही कल्पना नाही परंतु त्या शब्दांमध्ये काहीतरी तथ्य नक्कीच आहे.एखाद्या रोपट्याला जगवायच असेल तर त्याला पाणी गरजेचच आहे. पाण्याशिवाय ते रोपटं असं किती काळ जगणार…?? पाण्याविना ते तडफडून कधीतरी मरणारच नं…?? नात्यांचही अगदी तसच आहे. नाती जितकी विश्वासावर टिकतात तितकीच ती संवादावरही विसंबून असतात. नात्यांमध्ये संवाद हा असायलाच हवा. संवादाशिवाय नात्यांना काही अर्थच नाही.संवाद नसेल तर ती नाती टिकणं अशक्य आहे. संवादाच पाणी नात्यांना घातलं तर नात्यांची मुळं कशी घट्ट रूजून राहतात. आणि केवळ संवाद असून चालत नाही तर सुसंवाद असायला लागतो. सुसंवादाने नात्याला नवा अर्थ सहजपणे मिळतो. जर नात्यात सुसंवादच नसेल तर ……???

सुसंवाद म्हणजे नात्याचा आत्मा असतो.याच आत्म्यावर नातं दीर्घकाळ जिवंत राहतं.साधासुधा संवाद आणि मोकळा सुसंवाद याच बराचसा फरक आहे. साध्या संवादाने जितकी नाती बहरतात त्यापेक्षा कैक पटीने कित्येक नाती ही मोकळ्या सुसंवादाने बहरतात.मनामनांच नातं आलं म्हणजे अनेकदा शरिराचं मिलन आपसूकच घडून येतं.पण काही शरिरसंबंध हे नुसतेच नावाला असतात. त्यात मिलनाची भावना कुठे नसतेच.म्हणजे भूक लागली म्हणून उगाचच खायच म्हणून खायच याला काही अर्थच नसतो.खायची इच्छा सुद्धा मनापासून व्हायला हवी.कोणतीही गोष्ट असो ती अगदी हेल्दी असायला हवी. एखादं नातं असो , तुमचं आरोग्य असो वा शारिरीक-मानसिक संबंध…ते हेल्दीच असायला हवे. अनेकदा एखादी गोष्ट हेल्दी नसण्यामागे खूप कारणं असतात. आणि नात्यांच म्हणाल तर त्यामध्ये अनेकदा संवाद हेच कारण असतं.कित्येकजणांमध्ये तर साधा संवादही लवकर घडून येत नाही.संवाद विरत जातो तस तसे नात्यांचे धागेही विरत जातात.आणि शरिरसंबंध तर नावालाच राहतात. त्याच्यातही मोकळेपणा नसतोच. अशा कित्येक तक्रारी असतात.

“तो हल्ली नीट बोलतच नाही. मलाही सारख त्याला बोल बोल म्हणावसं वाटत नाही. मुळात ते चांगल वाटत नाही. कितीदा त्याला आग्रह करायचा….? ”

“हल्ली कामामुळे दोघांचही नीटसं बोलणच नाही. त्याची आणि माझी शिफ्ट वेगवेगळी असते.घरी दमून आल्यावर नकोसं होतं.सगळा शीण आलेला असतो.सुट्टी असली तर सगळा वेळ तर असाच जातो.एकमेकांसाठी जरा वेळच मिळत नाही. मोकळं असा काही संवादच होत नाही आमचा.”

“तिची चिडचिड फार वाढलेय.छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असते.काय झालं विचारल तर नीट सांगतही नाही. करायच काय काही समजत नाही.”

“दोघांच पटतच नाही. रोज काही ना काही वाद होतात.तिच कटकट तेच नकोनकोसे शब्द. वैताग आलाय अक्षरशः मला…”

ह्यावरुन इतकं तर नक्कीच समजू शकतं की ताणतणाव, अबोला,चिडचिड ,एकमेकांसाठी वेळ नसणं या गोष्टींमुळे नात्यावर निश्चितच वेगळा परिणाम दिसून येतो.अशा स्थितीमध्ये तर शारीरिक संबंध सुद्धा हेल्दी असू शकत नाही. त्या सुखाचा आनंद अशावेळी मिळणं कठीणच. कोणताही नीट नेटका संवाद नाही त्यामुळे शरिरसंबंध सुद्धा मोकळे निरोगी होणं अशक्य आहे. आपला संवाद जितका मोकळा आणि मधुर असेल तर तितकेच शरिरसंबंध हे उत्तम असू शकतात.

जर मोकळा संवाद नसेल ,सतत ताणतणाव ,भांडणं जर एखाद्या नात्यात असतील तर त्याचा परिणाम निश्चितच शरिरसंबंधावर होतो.कारण ताणतणाव वगैरे गोष्टींमुळे शरिरात वेगवेगळे हार्मोन्स निर्माण होतात. आणि मग शरिरही अशावेळी उत्तम साथ देत नाही. ताणतणावाचा परिणाम अशावेळी होतो. पण जर जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा निर्माण होणारे हार्मोन्सही वेगळे असतात. पण याच आनंदी ,प्रसन्न असण्याचा परिणाम शारीरिक संबंधावर योग्य प्रकारे होतो.शरिर अशा वातावरणात उत्तम साथ देतं.शेवटी गरजेचा आहे तो नात्यातील मोकळेपणा… आणि सुसंवाद.

रोजच मेथीची भाजी खाऊन गप्प राहण्यात काही अर्थ नाही. आज कुरकुरीत भेंडी करूयात का….??? असं बिंधास्त मोकळेपणाने विचारलं तर नात्याची चव अधिक रूचकर नी रंगतदार असेल.

अगदी तसच कधीतरी निवांतपणे एकमेकांशी संवाद साधा.सुसंवाद साधा.एकमेकांना काय हवय-काय नकोय ?हे एकदा समजून घ्या.संवाद साधताना हसत रहा…चिडचिड करून काही होत नाही. उलट ताणतणाव वाढून परिणामही चांगले होत नाही. त्यापेक्षा हसत-खेळत संवाद साधा. शरीर आणि मन हेल्दी राहून शारीरिक संबंध उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल.

So… आनंदी रहा…मोकळेपणाने बोला…

केवळ वैवाहिक नाही तर अगदी कोणतही आयुष्य निरोगी राहण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

8 thoughts on “उत्तम शरिरसंबंध हे तुमच्यातील उत्तम संवादावर अवलंबून असतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!