जोडीदाराकडून मिळालेल्या कधीकाळच्या जखमा कशा विसरायच्या??
मेराज बागवान
जोडीदार’.किती विश्वासू शब्द आहे ना…रोजच्या भाषेत बोलायचे तर , ‘पती-पत्नी’, ‘नवरा-बायको’ असे शब्द ‘जोडीदार’ ह्या शब्दाला साजेसे आहेत.जोडीदार, ह्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. जोडीदार म्हणजे, जो आपल्यासोबत कायम असतो.कोणतीही परिस्थिती असो, कायम साथ देतो तो जोडीदार.सुख-दुःखे ज्याच्यासोबत हक्काने आणि विश्वासाने शेअर केली जातात, तो म्हणजे जोडीदार. लग्न झाल्यानंतर, संपूर्ण आयुष्यच एकमेकांशी शेअर केले जाते.पण कितीही झाले तरी, नवरा-बायको, पती-पत्नी हे दोन विभिन्न व्यक्तिमत्त्व आहेत.दोन वेगवेगळी माणसे आहेत.त्यामुळे दोघांचे स्वतःचे असे मत, विचार ,ध्येये असतात.मग यातूनच कधी कधी दुरावा, भांडणे, वाद-विवाद होतात.मने दुखावली जातात.मानसिक वेदना होतात. आणि यातून कधी कधी असेही घडते, ज्यामुळे जोडीदाराकडून आयुष्यभरासाठी काही ‘जखमा’ मिळतात , ज्या कधीही न विसरता येणाऱ्या असतात.
पती-पत्नींमध्ये काही वाद असे होतात की ज्यामुळे नातेच पूर्णपणे तुटून जाते.घटस्फोट होतात.आजकाल तर हे खूप सर्रास पहावयास मिळते. नाते तुटल्यामुळे , दोघे जण विलग होतात आणि सहवास कायम चा तुटतो. संसार मोडकळीस येतो. आणि आयुष्यभराची जखम होऊन जाते.पण ह्या घटनेमुळे आयुष्य थांबत नाही.म्हणूनच ह्या जखमा जरी कायमच्या झालेल्या असल्या तरी, विसरून जाता आल्या पाहिजेत. यासाठी काही अशा गोष्टी करता येतील :
नवीन गोष्टींमध्ये स्वतःचे मन गुंतवणे – जेव्हा संसार कायमचा तुटतो, तेव्हा दुःख खूप होते. कोणी मुद्दाम संसार मोडत नाही.पण काही गोष्टी असह्य झाल्यामुळे , शेवटचा पर्याय म्हणून जोडपी विभक्त होतात. मग ह्या गोष्टीनंतर , नवीन कला शिकणे, शिक्षण घेणे , जे आवडते ते करणे ह्या गोष्टी केल्या तर हळूहळू का होईना त्या दुःखाचा विसर पडतो.मन अशा प्रकारे कुठे तरी गुंतवल्यामुळे दुःख कमी कमी होत जाते आणि आयुष्याचा नवा मार्ग सापडतो.
मन मोकळे करणे – जेव्हा जोडीदाराची साथ कायमची सुटते, तेव्हा मन एकाकी होते.कोणाशी बोलण्यास मन धजावत नाही.पण असे केले तर आणखीनच मन नैराश्याकडे झुकू लागते.म्हणूनच जे तुम्हाला अगदी विश्वासू वाटतात, मग ते कोणी घरातील व्यक्ती असेल, कुटुंब असेल , मित्र-मैत्रिणी असतील, ऑफिस सहकारि असतील त्यांच्याशी तुम्ही मुक्तपणे संवाद साधला पाहिजे.यातून अनेक मार्ग सापडतात, समस्येवर उपाय देखील मिळतो.
मुलांच्या संगोपनात वेळ घालविणे – जर का मुले असतील तर त्यांच्या जडणघडणीवर लक्ष दिले पाहिजे.आई-वडिलांच्या भांडणात मुले बळी पडतात. म्हणून जोडीदाराचा राग मुलांवर कदापि निघू नये.यामुळे त्यांना चांगले शिक्षण, संस्कार देण्याकडे लक्ष दिले पाहिजे. फक्त स्वतःच्याच कोशात न राहता मुलांची योग्यरीत्या जोपासना केली पाहिजे.
सकारात्मक दृष्टिकोन – नाती तुटली की अत्यंत वेदना होतात.पण कधी कधी ‘जे होते ते चांगल्यासाठीच’हा विचार कायम मनात ठेवावा.सामाजिक जीवनात आपल्यापेक्षा ही फार मोठी दुःखे असणारी माणसे असतात. तरी ते आपले आयुष्य हसत हसत जगत असतात.त्यामुळे त्या समाजात तसा दृष्टिकोन ठेवून वावरले पाहिजे. जे अडचणीत आहेत त्यांना मदत केली पाहिजे. जेणेकरून कुठेतरी स्वतःचे दुःख कमी कमी होत राहील आणि समाजाला आपण कुठे तरी उपयोगी पडलो याचे समाधान राहील. काहीही झाले तरी विधाता कायम आपली मदत करीत आहे, घरातील इतर मंडळी, मित्र-मैत्रीण कायम आपल्यासोबत आहेत हा विश्वास कायम मनात बाळगावा.
ह्या काही गोष्टींमुळे नक्कीच जोडीदाराकडून मिळालेल्या जखमा हळूहळू विसरण्यास नक्कीच मदत होईल.
दुसऱ्या परिस्थितीमध्ये जोडीदाराशी वाद होऊन देखील कालांतराने पुन्हा संसार पूर्ववत होतो.पण जोडीदाराकडून मिळालेल्या जखमा मनात कायम कोरल्या जातात.मग अशा वेळी ह्या कधी काळी मिळालेल्या जखमा कशा विसरायच्या? यासाठी पुढील काही गोष्टी नक्कीच उपयोगी पडतील.
संवाद साधणे – एकमेकांशी मुक्तपणे बोलले पाहिजे. एकमेकांच्या अपेक्षा बोलून दाखविल्या पाहिजेत.ज्यात जोर-जबरदस्ती कुठे नसेल पण सुसंवाद असेल.
आत्मनिर्भर बनणे – पती-पत्नी दोघांनी देखील प्रत्येक बाबतीत जमेल तसे स्वतंत्र बनले पाहिजे.एकमेकांना पाठिंबा देत स्वतःचे असे वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे.
माफ करणे – तडजोडीने का होईना संसार पुन्हा थाटला जातो.त्यावेळी भूतकाळातील एकमेकांच्या चुका मोठ्या मनाने माफ करता आल्या पाहिजेत.
नवीन गोष्टी आत्मसात करणे – जेव्हा जोडीदार दुःख देतो , त्यावेळेस मन कमकुवत होते.पण हे जर का विसरायचे असेल तर नेहमी जे काही तुम्ही करीत आहात त्यापेक्षा वेगळे असे काही तरी केले पाहिजे. मग ते काहीही असू शकते.जसे की , सामाजिक उपक्रम, समाजसेवा, छंद जोपासणे, शिक्षण घेणे , नवीन गोष्टी शिकणे इत्यादी
अपेक्षाविरहित जगणे – जेव्हा अति अपेक्षा मनात घर करू लागतात, तेव्हा नकारात्मकता वाढीस लागते.जोडीदाराकडून काही अपेक्षा ह्या हक्कासमान असतात , जसे की आर्थिक जबाबदारी उचलणे, शारीरिक संबंध, मुलांवरील समान हक्क इत्यादी.पण ह्या सगळ्याची जोर-जबरदस्ती कदापि होता कामा नये.म्हणूनच समजूतदारपणा कायम अंगी हवा.संयम हवा.जर अपेक्षा विरहित जगले तर कायम आनंदी, सुखी-समाधानी, तणावमुक्त जगता येते.आणि यामुळे भूतकाळातील जखमा देखील भरून निघतात.
अशा काही गोष्टींमुळे नक्कीच आयुष्यात फरक पडतो आणि संसाराची गाडी देखील रुळावर येते.
आज लग्नाला २ ३ महिने होत नाहीत तर घटस्फोट होताना दिसत आहेत.काही ठिकाणी घटस्फोट न होता देखील जोडपी विभक्त होत आहेत.संयम, समजूतदारपणा कुठेतरी कमी पडत आहे. आणि स्वार्थीपणा, हट्टीपणा बळावत आहे.यामुळे कधी एकजण संसार जोडायला तयार आहे तर दुसरा त्यास तयार नाही.मग अंतिम पर्याय म्हणजे कायमचे सहजीवन संपविणे.आणि ही आजची आपल्या समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे.आज अशा गोष्टी ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या की मन खूप दुःखी होते, अंगावर शहारे येतात.
अत्यंत वाईट वाटते.कारण,नाती ही कायम जपण्यासाठी असतात, नाती आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतात आणि त्यात लग्न ही तर खूप सुंदर गोष्ट आहे, सहजीवनाचा एक खूप नाजूक प्रवास आहे.जिथे एकमेकांची काळजी घेत आयुष्याचा प्रवास सुखमय करायचा असतो. पण काही वाद-विवाद, कौटुंबिक कारणे, भांडणे, मत भिन्नता, जोर-जबरदस्ती, अपेक्षा, राग, अहंकार यामुळे संसार क्षणात मोडतो.आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. समाजात आज ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.आणि ही कुठेतरी कमी करायची असेल तर प्रत्येक जोडप्याने काही गोष्टींचे आत्मपरीक्षण करणे आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणे हाच यावरील उपाय आहे.
काळजी घ्या ..!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख अतिशय अप्रतिम आहे आणि यातील सर्व काही गोष्टी खऱ्या आहेत असं होत असतं समाजामध्ये आणि असं होत आहे आज-काल
खूपच छान