कित्येक जोडपी ‘आता मला या व्यक्तीसोबतच आयुष्य घालवावे लागणार’ अशी दुःखी का असतात?
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा
तू है जहाँ, मैं हूँ वहाँ
अब तो ये जीना, तेरे बिन है सज़ा
मिल जाएँ इस तरह, दो लहरें जिस तरह
फिर हो न जुदा, हाँ ये वादा रहा
जेव्हा दोन व्यक्तीचं एकमेकांवर प्रेम असत, जेव्हा त्या मनाने एकमेकांना आपलं मानतात तेव्हा त्यांची अवस्था काहीशी अशीच असते. त्यांच्या मनातले भाव अतिशय सुंदरपणे या गाण्यात मांडले आहेत. मग ती लग्न करू पाहणारी जोडपी असतील किंवा झालेली. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक करून टाकतो तेव्हा त्याच्याशिवाय जगणं ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही. ती एक प्रकारची शिक्षाच असते. ते एकटेपण कोणाला नको असत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला ती व्यक्ती आपल्यासोबत हवीच असते. तिला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आपल्याला बनवायचं असत. अश्या जोडप्यांना एकमेकांच्या आनंदात आनंद असतो. इतकं त्यांचं आयुष्य एकरूप झालेल असत. हीच त्यांच्या नात्याची वीण असते.
पण हे सर्वांच्या बाबतीत होत का? तर अस नाही. सर्वांचं आयुष्य इतकं सुंदर एकरूप असत अस नाही. कित्येक जोडप्यांच्या आयुष्यात अडथळे, समस्या येत असतात. बाहेरून दिसताना ती एकत्र असतात, दिसतात पण अस नसत. आतल्या आत त्यांचे संघर्ष वेगळेच असते. अश्या वेळी नाईलाज किंवा तडजोड म्हणून ती दोघं सोबत राहत असतात. त्यातून मनात येणारा विचार असतो की ‘आता मला या व्यक्तीसोबतच आयुष्य घालवावे लागणार’.
नात्याच्या सुरुवातीला पण हाच विचार असतो की मला या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायचे आहे. दिसायला तर हे दोन्ही विचार तसे सारखे वाटतात. पण त्यामागील भाव मात्र आता बदलला गेलेला असतो. आधी जो सहवास हवा असतो त्यात प्रेम असते, आत्मीयता असते, सोबत राहण्याची ओढ असते. आता जो सहवास असतो तो कुठेतरी लादला गेला आहे अस वाटत असत. तो नाईलाजाने स्वीकारला जातो आणि म्हणून एक एक तक्रारीचा सुर त्यात येतो की मला या व्यक्तीसोबत च आयुष्य घालवावे लागणार आहे.
पण हा नाईलाज, हे दुःख येते कश्याने? कधीकाळी हवी असलेली साथ फक्त बंधन का होऊन जाते? असे बंधन जे आपण सहजा सहजी तोडू नाही शकत. तर याची अनेक कारणं असतात. जेव्हा सुरुवातीच्या काळात दोन व्यक्ती एकत्र येतात. तेव्हा ते नात बहरत असत. त्यामुळे एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटत असतात. पार्टनर ची एखादी चुकीची, वाईट सवय असेल किंवा खटकणार वर्तन असेल ते दुर्लक्षिल जात, त्याच्यावर पांघरूण घातलं जातं. कारण तो काळच तसा असतो.
पण जसा जसा सहवास वाढतो, जितकं ते नात अधिक घट्ट होत तितका आपल्याला तो माणूस अधिक समजतो. अश्या वेळी आपले विचार, आपलं वागणं एकंदरीत आपला स्वभाव यातलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवत तसचं आपण त्या infatuation काळातून बाहेर आलेले असतो. त्यामुळे आधी दुर्लक्ष केलेल्या गोष्टी आता दिसू लागतात. त्यातून हेही समजत आपल्या विचारांमध्ये किती तफावत आहे. जे अगदी साहजिक असत.पण ते विचार न पटल्याने, तसचं वेगळेपण पटवून न घेतल्याने वाद होऊ लागतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद,खटके उडतात.
आधी ज्या गोष्टी आवडत असतात त्यांचाच आता त्रास होऊ लागतो.
विचार वेगळे असणे हे एक कारण झालं, या सारखी अजूनही बरीच कारणं असतात, जसे की घर चालवणं, व्यसन, मुलांचं संगोपन, एकेमकाना समजून घेणं, आर्थिक परिस्थिती अशी अनेक कारणं असतात. यामध्ये जेव्हा गोंधळ निर्माण होतो तेव्हा नात्यात पण अडथळे येतात.
ही तरी नंतर निर्माण झालेली कारण असतात. काही जणांचं लग्नच प्रेम, मैत्री नसलेल्या आधारावर किंवा तडजोडीच्या आधारावर झालेले असत.त्यामुळे त्यांना पण हे नात सांभाळणं एक कसोटी वाटते. आता अशी अनेक जोडपी असतात जी एका टप्प्यावर येऊन हा निर्णय घेतात की वेगळं झालं पाहिजे. म्हणून डिव्होर्स घेतला जातो.
पण आपण ज्या देशात राहतो तिथे अजूनही कुटुंब प्रधान संस्कृती आहे. इथे जेव्हा दोन माणसांच लग्न होत तेव्हा ते त्यांच्यापुरत राहत नाही तर ते दोन कुटुंबाचं लग्न होत.त्यामुळे वैयक्तिक पातळीवर नवरा बायकोचे काहीही वाद असले तरी विचार करताना कुटुंब म्हणून विचार करावा लागतोच. अशा वेळी लगेच विभक्त होता येत नाही. त्याचा परिणाम सर्व कुटुंबावर होणार असतो.
त्यातून जर मुल असतील तर हा परिणाम अजून वाढतो. त्यामुळे आपल्याला ती व्यक्ती आवडो न आवडो सोबत रहावेच लागते. आणि यातून ‘आता मला या व्यक्तीसोबतच आयुष्य घालवावे लागणार. ‘ असा विचार येऊन जातो. पर्याय नसतात असे नाही. पण त्याचे परिणाम सहन करण्याची तयारी नसते. ही कारण आहेत ज्यातून व्यक्ती एकत्र राहूनही दुरावतात आणि सहवास असूनही दुःखी होतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
