Skip to content

बायकोचं मौन वाचायला शिकणारा नवरा खूपच तिच्याजवळ असतो.

बायकोचं मौन वाचायला शिकणारा नवरा खूपच तिच्याजवळ असतो.


मेराज बागवान


नवरा-बायको’, सर्वात जवळचे असे हे अनोखे नाते.दोन वेगवेगळ्या घरातून आलेले, दोन वेगवेगळ्या संस्कारात वाढलेले, वेगवेगळी जडण-घडण झालेले, अगदी वेगवेगळे स्वभाव, आवडी-निवडी असणारे.पण असे सगळे असूनही विधाता त्या दोघांची गाठ बांधतो आणि ह्या दोन विभिन्न व्यक्तिमत्वांना एकत्र आणतो , जीवनाचा एकत्र मिळून प्रवास करण्यासाठी.यालाच आपल्याइथे ‘लग्न’ असे नाव आहे.

बहुतांशी नवरा-बायको मध्ये, बायको भरभरून बोलत असते.नवऱ्याशी गप्पा-गोष्टी करीत असते.त्याला तिच्या मनातील प्रत्येक गोष्टी उघडपणे सांगत असते.एखादी घटना घडली असेल तर सर्वात आधी नवऱ्याला ती सांगावी असे अनेकजणींना वाटत असते.बायको कितीही शिकलेली असेल, नोकरी/व्यवसाय करणारी असेल तरी देखील बहुतांशी जणींना आपल्या नवऱ्याशी गोष्टी ‘शेअर’ केल्याशिवाय राहवत नाही.बायकांचा हा बऱ्यापैकी स्वभाव देखील असतो.म्हणून त्या सदैव बोलत राहतात.आणि आई-वडिलांचे घर सोडून आल्यानंतर ‘नवराच’ त्या बायकोसाठी सर्वस्व असतो.त्यामुळेच ती त्या हक्काने आणि विश्वासाने नवऱ्याशी बोलत असते.नवराही तिचे म्हणणे ऐकत असतो.पण,खरे तर बायकोचं मौन वाचायला शिकणारा नवरा खूपच तिच्याजवळ असतो.

नवरा-बायको आपापसात खूप बोलतात, म्हणजे ते कायम एकमेकांना समजूनच घेत आहेत असे देखील प्रत्येक बाबतीत नसते. म्हणूनच, जेव्हा एखादा नवरा बायकोचे मौन समजून घेतो तेव्हा तो तिला खऱ्या अर्थाने समजून घेत असतो.बायको कधी कधी खूप अबोल असते.नवऱ्याला सर्व काही सांगणारी कधी कधी निशब्द होऊन बसते.अशा वेळी जो नवरा तिचे हे निशब्द समजून घेऊ शकतो तो नवरा खऱ्या अर्थाने तिच्याजवळ असतो.

काही काही वेळेस बायकोचे शब्द नवऱ्याला खूप साधे वाटतात.कधी कधी ,त्या शब्दांना अपेक्षांचे स्वरूप आले आहे असे देखील मनातल्या मनात नवऱ्याला वाटत असते. अर्थात बायकोचा नवऱ्यावर पूर्ण हक्क असतो. पण तरी देखील काही गोष्टी , बायकोचे काही शब्द नवऱ्याला पटकन समजत नाहीत.मग अशा वेळी ती बायको शांत शांत राहू लागते.मग खरी परीक्षा सुरू होते ती नवऱ्याची. ‘ही का शांत आहे? हिची तब्येत तर ठीक आहे ना? हिला काय हवे आहे? असे प्रश्न ज्या नवऱ्याला पडतात.आणि त्याची उत्तरे शोधून काढून जो बायकोच्या मौनाचा खरा अर्थ समजून घेऊ शकतो तो खऱ्या अर्थाने बायकोला समजून घेत असतो आणि हीच गोष्ट नवऱ्याला बायकोच्या जवळ आणत असते.

बायको ही खूप ‘संवेदनशील’,’भावनिक’ असते.तिच्या बऱयाच वेळा खूप छोट्या अपेक्षा असतात. जसे की, ‘एखादा ड्रेस/साडी घातल्यानंतर नवऱ्याने त्यावर छान अशी प्रतिक्रिया देणे, किंवा नकळत दोघांचा ‘सेल्फी’ घेणे.काम करून दमल्यानंतर ,’ये बस इथे माझ्याजवळ’ असे म्हणणारा नवरा तिला हवा असतो.तिच्या करिअर मध्ये नवऱ्याने तिला प्रोत्साहन आणि पाठिंबा द्यावा, घरातील कामात थोडा हातभार लावावा असे तिला वाटत असते.तिला थोडा वेळ प्रेमाने जवळ घ्यावे अशी तिची भावनिक गरज असते.पण ह्या सगळ्या भावनिक गोष्टी ती स्पष्टणे कधीच बोलून दाखवत नाही.मग कधी कधी तीच्या मौनातून हे ती जणू बोलत असते. आणि हे सर्व जो भावनिकरित्या समजून घेतो तो नवरा बायकोच्या फारच जवळ असतो.

‘आदर’.प्रत्येक पत्नी साठी खूप मोठी गोष्ट असते.एकवेळ नवऱ्याचे प्रेम मिळाले नाही तरी चालेल, पण त्याने आपला , आपल्या विचारांचा, मताचा आदर करावा हे प्रत्येक पत्नी ला वाटत असते.अनेक पती कोणताही निर्णय घेत असताना आपल्या पत्नीचे मत कायम विचारात घेतात.पण काही ठिकाणी नवरा आपली मते बायकोवर लादत असतो.कधी कधी त्या निर्णयांची जबरदस्ती देखील होताना दिसते. मग ती पत्नी बोलेनाशी होते.मग अशा वेळी जो नवरा ही गोष्ट विचारात घेऊन, आपली चूक सुधारतो आणि प्रत्यक्षपणे बायकोला जो विचारात घेतो तो तिच्या खूपच जवळ असतो.

लग्नसंस्थेचा आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे ‘शारीरिक संबंध’.ही एक भावनिक आणि शारीरिक गरज असते, प्रत्येक पती-पत्नीची. आणि त्या ‘स्पर्शात्मक’ गोष्टींमुळे नाते एक प्रकारे घट्ट होत असते.पण कधी कधी त्या संबंधामध्ये देखील दोघांची काही ना काही गरज/इच्छा असते. दोघेही ती गोष्ट बोलायला कधी कधी पुढे येत नाहीत.मग मौनातून ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न सुरू होतो.हे मौन समजून घेता आले की नाते आपोआप घट्ट होत जाते.

नवरा-बायको हे नातेच असे असते की, प्रत्येक गोष्टीत ते एकमेकांच्या सोबत असते आणि असायलाच हवे. आज आपण पाहतो, हे नाते तुटण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते.त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.पण कुठेतरी ‘समजूतदारपणा’ ,’काळजी’,’विश्वास’ गरजेचा असतो.आणि तो जर असेल तर मौन देखील समजून घेता येते आणि नाते आपोआप फुलते.

प्रत्येक गोष्ट बोलून दाखवलीच पाहिजे असे काहीच नसते.खरे तर काही गोष्टी न बोलून देखील समजून घेता आल्या पाहिजेत.आणि जिथे शब्दांपेक्षा मौन लगेच समजते तेच नाते चिरकाल टिकते.चला तर मग ‘मौन’ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, शब्द काय हवेत विरून जातात पण मौन मात्र मनात कायम जिवंत असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “बायकोचं मौन वाचायला शिकणारा नवरा खूपच तिच्याजवळ असतो.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!