Skip to content

बेफिकीरीने वागले तर काय होते…एका मित्राचा अनुभव!!

बेफिकीरीने वागले तर काय होते…एका मित्राचा अनुभव!!


राजेंद्र सोनवणे


खेळ कुणाला दैवाचा कळला !

शहाजी आणि मी आम्ही दोघेही बचपन के दोस्त होतो. त्याच्या व माझ्या जन्मात फक्त एक महिन्यांचेच अंतर होते मात्र दुर्दैवाने त्याचा जन्म झाल्यानंतर त्याची आई वारली. शेजारीच राहात असल्याने आम्ही एकत्र वाढलो खेळलो शाळेतही बरोबर, एकाच पोरीवर आम्ही दोघांनीही ‘लाईनपण’पण मारली त्याचे एक वैशिष्ट होते त्या काळात पोरीला डोळा मारायची एक क्रेझ होती. तर हा डोळा मारण्यात अतीशय पटाईत होता बघता बघता पोरीला डोळा मारीत असे बरे त्यावेळेस पोरीला डोळा मारणे हा अतीशय गंभीर गुन्हा समजला जात असे समजा त्या पोरीने लाईटली घेतले तर काही नाही पण जर तिने घरी सांगितले तर डाेळा मारणाऱ्याची पार डोळा सुजेपर्यंत धुलाई होत असे. तर असो हे डोळेपुराण थांबवतो तर आम्ही सातवीपर्यंत शिक्षणही बरोबर घेतले.

सातवीनंतर मी नगरला शिक्षणासाठी आलो त्याची मात्र परिस्थिती नसल्याने व थोरला भाऊ व वडिल यांनी शेती कर म्हटल्याने त्याने शिक्षण सोडून दिले मात्र त्याला शेती करायची नव्हती त्यामुळे सातवी झाल्यावर त्याने घरातून पळ काढला व थेट पुणे गाठले व एका मुस्लिम ट्रक ड्रायव्हरकडे क्लीनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

क्लीनरला आमच्याकडे किन्नर म्हणत असत तर ही किन्नरकी म्हणजे एक आधुनिक वेठबिगारीचा प्रकार होता ड्रायव्हर जी कामे सांगेल ती करणे, त्याचे कपडे धुणे त्याला दारू आणून देणे, गाडी धुणे, वेळप्रसंगी त्याच्या शिव्या खाणे ही सर्व कामे त्यावेळेस किन्नर लोकांना करावी लागत एवढे केल्यानंतर ड्रायव्हर थोडी थोडी ड्रायव्हिंग त्यांना शिकवत. शहाजीपण त्यास अपवाद नव्हता ड्रायव्हरकी शिकण्यासाठी त्यानेही हे सर्व सहन केले.

त्या ड्रायव्हरने ह्याची शिकण्याची जिद्द पाहून हळूहळू ड्रायव्हरकी शिकवली व शेठजीला सांगून याला एका मोठ्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नेमले. ड्रायव्हर लोक त्याकाळी खुप पैसे कमवत एक ट्रिप मारली की दोन तीन हजार रुपये सहज मिळत असत व साधारणतः 1990-91 साली दोन तीन हजार रुपये म्हणजे खुप मोठी रक्कम होती. या दरम्यान शहाजीचे लग्नही झाले होते़ तर अशीच त्याची व माझी एकदा नगरला भेट झाली तो ट्रक घेऊनच पुण्याला निघाला होता त्यावेळेस मीही सुशिक्षित बेकार असल्याने त्याने मला चल पुण्याला फिरायला म्हटल्यावर मीही त्याच्या सोबत निघालो.

देहूच्या आसपासच्या परिसरात त्याने जागा घेवून घरही बांधले होते. त्याला बायकोही सुंदर आणि सुस्वभावी मिळाली होती. पुण्याला त्याच्या घरी गेल्यावर त्याने बायकोला माझी ओळख करून दिली आम्ही रात्रभर खुप गप्पा मारल्या त्याचा सगळा थाटमाट पाहून मलाही उगाचच बी.ए आणि बी.कॉम करीत बसलो असे वाटले कारण त्यापेक्षा ड्रायव्हर झालो असतो तर बरे झाले असते असे राहून राहून वाटायला लागले मी त्याला तसे म्हटले असता, ‘ये तेरे बस की बात नही है’ असे म्हणत ड्रायव्हरकी शिकण्यासाठी त्याने काय काय सहन केले हे सांगत आपली सर्व किन्नरकीची कहाणी सांगितली.

दुसऱ्या दिवशी त्याचा निरोप घेऊन मी माघारी आलो त्यानंतर बरीच वर्षे त्याचा आणि माझा संपर्क झाला नाही एक दिवस तो पुण्यातील त्याची सर्व प्रॉपर्टी विकून गावाकडे आल्याचे समजले जास्त मिळणारे पैसे, सततचे बाहेरगावी फिरणे यामुळे त्याला दारूचा व बाहेरचा नाद लागला होता व यामुळेच त्याला एचआयव्ही झाल्याचे समजले होते. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती हळू हळू या आजाराने त्याचा बळी घेतला त्या नंतर काही दिवसांनी त्याच्या बायकोलाही लागण झाल्याने तिचाही जीव गेल्याचे समजले अशा तऱ्हेने एका चांगल्या बालपणीच्या मित्राला मी मुकलो होतो.

जिवनात जर बेफिकीरीने वागले तर काय होते याचा धडा मी ही शिकलो होतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!