Skip to content

“जशी योग्य सून मिळणं महत्त्वाचं, तसेच योग्य सासर मिळणं सुद्धा महत्त्वाचं! “

“जशी योग्य सून मिळणं महत्त्वाचं, तसेच योग्य सासर मिळणं सुद्धा महत्त्वाचं! “


मधुश्री देशपांडे गानू


मैं तो भूल चली बाबुल का देस,
पिया का घर प्यारा लगे…”

सुंदर चित्रपट गीत आहे. खरंच स्त्रीला निसर्गाचं वरदान असतं, ती नवीन वातावरणात, कुटुंबात पटकन रुळते. रुजते आणि तिकडचीच होऊन जाते. हा लवचिकपणा, चिवटपणा फक्त स्त्रीमध्ये आढळतो. आणि जर एखादी स्त्री हिरा असेल तर तिला शोभेल असं सोन्याचे कोंदण पण हवं ना! नाहीतर सासर असं मिळतं की त्यांच्या नाकापेक्षा मोती जड!!

लग्न हा जुगारच आहे. सगळं मनासारखं मिळालं तर उत्तमच. पण बहुतेक वेळा दोन्हींकडून तडजोड जास्त करावी लागते. तरच संसार टिकतात. सासर-माहेर दोन्ही जोडलेली राहतात. तोडणार्या माणसाला काय एका क्षणात तोडता येतं. अशांविषयी आपल्याला बोलायचं नाही.

आपण संसाराचं महत्त्व जाणणाऱ्या समाजाविषयी बोलणार आहोत. मोठमोठ्या शहरांमध्ये आज “लग्नसंस्था” मोडकळीस आली की काय? अशी सध्याची स्थिती आहे. मुलींच्या अवास्तव अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. स्वतःचे शहर सोडायची इच्छा नाही. उच्चशिक्षित आणि कमावती असल्याने स्वतः पेक्षा वरचढ नवरा हवा हा अट्टाहास. मुलाचे आई-वडील नकोत, अशी अचाट अपेक्षाही असते हल्ली मुलींची.. त्यामुळे निश्चितच आज योग्य सून मिळणं खूपच महत्त्वाचं आणि जिकिरीचंही झालं आहे. त्यातून दोन्हीकडच्या पालकांची नको इतकी लुडबुड हे तर अनेक घटस्फोटांचे महत्त्वाचं कारण आहे. हल्ली “लिव इन रिलेशनशिप” चे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. आजच्या पिढीला लग्नाचं बंधन नको वाटतं. सासर, माहेर या संकल्पनाच बाद होतात इथे.

वरील सगळे मुद्दे लक्षात घेता योग्य सून मिळणं आज खरंच कठीण होऊन बसलं आहे. त्याच प्रमाणे या “अशा स्वतंत्र विचारसरणीच्या मुलींना योग्य सासर मिळणे ही तेवढंच महत्त्वाचं आहे.” उच्चशिक्षित, करिअरला प्राधान्य देणाऱ्या, स्वतंत्र जीवनशैली, स्वतंत्र विचारसरणी असलेल्या, महत्त्वाकांक्षी अशा मुलींना त्यांच्या या अपेक्षांना प्रोत्साहन देणारं, मदत करणारं, स्वातंत्र्य देणारे, पाठीशी खंबीर उभं राहणारंच सासर हवं. तरच त्यांच्या मनाप्रमाणे, योग्यतेप्रमाणे त्या आयुष्य आनंदाने जगू शकतील. नोकरी-व्यवसाय सोडून जर त्यांना घरी बसवलं तर त्या मनाने विझून जातील.

आज काळ बदलला आहे. सर्रास प्रेमात पडून लग्न होतात. जातीचे जोखड ही आज फार राहिले नाही. कोणीही दबावाने त्याच्या मनाविरुद्ध काही करू शकेल असे आपल्याला वाटत नाही. पण आजही गाव, खेड्यात कित्येक वेळा वडीलधारी माणसं लग्न ठरवतात. सासरच्या मंडळींकडून प्रचंड जाच होतो. हुंड्याची प्रथा तर सरसकट सगळीकडे आहेच. आजही अनेक नवविवाहित स्त्रिया आत्महत्या करतात. आजही अनेक वर्षं संसार केलेल्या स्त्रिया नवऱ्याचा मार खातात. विवाहित स्त्रीला एक मोलकरीण यापलीकडे किंमत नाही. घरातील कोणत्याही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिला आजही स्थान नाही. “घरातील एक मूक प्रेक्षक!” एवढीच तिची आजही ओळख आहे. फक्त मारहाण केली तरच अत्याचार असं नाही, तर अनेक प्रकारे जाचक मानसिक त्रास केला जातो. अगदी आयुष्यभर ती सहन करत राहते. समाजाला ह्याचा पत्ताही लागत नाही. तिच्या कष्टांची, कर्तृत्वाची, सहभागाची, अस्तित्वाची किंमत शून्य आहे. वयाची पन्नाशी पार केली तरी ती कोणाची तरी सूनच असते. तिची स्वतःची ओळख काहीच नसते. कारण सासरच्या मंडळींनी जिथे तिचं अस्तित्व नाकारलेलं असतं, तिथे समाज तिला काय किंमत देणार??

उदाहरणं तर अगणित आहेत. उच्च पदावरची नोकरी केवळ आजारी सासूची शुश्रुषा करायला कोणीतरी हवं म्हणून ती सोडून देते. अनेक वर्षं बिछान्याला खिळलेल्या सासूची मनोभावे सेवा करते. पण “तू कमावत नाहीस. मग तुझं या घरात काय स्थान? किंवा तुला गरजेसाठी ही पैसा पुरवला जाणार नाही.” हे तिला नवऱ्याकडून ऐकावं लागतं. हे असं सासर??? वंशाला दिवा हवा म्हणून अनेक मुली जन्माला घालाव्या लागतात. स्वतःच्या शरीराची, मनाची ससेहोलपट करून घ्यावी लागते. आणि मुलगा झाला नाही तर सहज नवरा दुसरे लग्न करतो. मुलगी झाली म्हणून बायको आणि मुलीला इस्पितळात सोडून पळून जाणारा नवरा आजही अस्तित्वात आहे. ही आपल्या समाजाची वस्तुस्थिती आहे.

लग्न हा फक्त दोन व्यक्तींचा नाही तर दोन कुटुंबांना सांधणारा, नातं निर्माण करणारा दुवा असतो. दुसऱ्याची लाडकी लेक आपण सून म्हणून कायमची आपल्या घरी आणतो. तेव्हा तिला रुळायला काही काळ जाणार हे ही लक्षात घेतलं जात नाही. तिच्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेनेच पाहिलं जातं. तिचा वेगळा स्वभाव, वेगळ्या आवडीनिवडी यांचीही चेष्टा केली जाते. खरं म्हणजे सासरच्या मंडळींनी, नवऱ्याने, सासू-सासर्‍यांनी तिला प्रेमाने आपलंसं करायला हवं. ही प्रथम त्यांची जबाबदारी आहे. तरच ती तुम्हांला प्रेम देईल. वर्षानुवर्ष संसार करूनही सुनेला कायम नावं ठेवणारी सासरची मंडळी जास्त बघायला मिळतात. समजून उमजून एखादी गरिबाघरची लेक सून म्हणून आणली, तर तिच्या गरीब माहेरा वरून तिला आजन्म हिणवलं जातं. सुनेच्या आई-वडिलांना सतत नावं ठेवणे हा तर सासरच्या मंडळींचा आवडता उद्योग. असं सासर काय कामाचं?? मग सुनेचा दुखलं-खुपलं, मनातलं सांगायला माहेरी ओढा राह्यला तर तिकडूनही टोमणे खावे लागतात.

आजही घरातील कोणत्याही बेबनावाला सहज सुनेला गृहीत धरले जातं. जबाबदार धरले जातं. सासू सासरे वृद्धाश्रमात गेले तर सून वाईट, असा सहज शिक्का मारला जातो. सुनेची बाजू समजून घ्यायला कोणी साधा प्रयत्नही करत नाही. कित्येकदा अत्यंत मत्सराने , द्वेषाने सुनेला वागवलं जातं. जाणून बुजून अन्याय केला जातो. तिच्या नात्याला मानसन्मान, न्याय दिला जात नाही. कित्येकदा सासरच्या मंडळींकडून विनयभंग, बलात्कारासारखे गुन्हे घडताना आपण वाचतो.

स्त्री सुशिक्षित असो वा अशिक्षित, काळी, गोरी, बुटकी, उंच ,सुंदर, कुरुप, तिच्या शरीरयष्टीवरून, रंगावरून दिसण्यावरून तिची पारख होते. तिच्यातले गुण कधीच अधोरेखित केले जात नाहीत.

आजची स्त्री नक्कीच बदलते आहे. स्वतंत्र, सक्षम, समर्थ आहे. ती ठामपणे स्वतःची मतं मांडतेयं. स्वतःला काय हवं, काय नको ते स्पष्टपणे सांगतेंय. आता ती अन्याय सहन करणार नाही. तरीही आजही अनेक ठिकाणी सासरी अन्याय्य वागणूक मिळतेंय.

लग्नसंस्थेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने सासर आणि माहेर दोन्हीं जपायचा प्रयत्न करायलाच हवा. आजच्या स्त्रीला सासरी योग्य मान मिळायला हवा. घरची लक्ष्मी म्हणून तुम्हीं तिला वाजत गाजत घरी आणता, तिला त्याच लक्ष्मीचा मान सातत्याने द्यायला हवा. बदलत्या काळाप्रमाणे सुनेचे बदलते रूप याप्रमाणे सासरच्या मंडळींनी ही लवचिक दृष्टिकोन ठेवायला हवा. तिला प्रतिस्पर्धी, उपरी न मानता कुटुंबाचा भाग म्हणून योग्य मानसन्मान द्यायलाच हवा. तिचा सर्वार्थाने स्वीकार हवा. तिचा अधिकार आहे तो.

ज्याप्रमाणे सुनेकडून सासरच्या मंडळींच्या अपेक्षा असतात त्याच प्रमाणे सुनेच्या ही असतात. हे नातं एकमेकांच्या कलाने, सुसंवादाने मजबूत व्हायला हवं.तिला सासरी मनमोकळेपणाने, आनंदाने जगता यावे. ती तुमच्या कुटुंबात समरसून जावी यासाठी योग्य सासर मिळणं आणि सासरच्या मंडळींनी तिला हे पोषक वातावरण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच लग्नं टिकतील. नाती बहरतील. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांना सगळी नाती मिळणं आवश्यक आहे. ही काळाची गरज आणि आपली जबाबदारी आहे. बघा पटतंय का!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

8 thoughts on ““जशी योग्य सून मिळणं महत्त्वाचं, तसेच योग्य सासर मिळणं सुद्धा महत्त्वाचं! “”

  1. Ekdum barobar ahe…maza hi anubhav ya sarkhach ahe….Navin sun yete tyaveli tila gharatle sarv goshti shantpane samjaun tila ky vatate te hi samjun ghen garjeche ahe…ani jr gharat don suna astil tr tyana compair karu naye….ani ji sun kamavte ti changli ti gharachi malakin ani ji kamvat nahi tichi gharat kimmat shunya… Tila gharatlya kamwalipekshyahi duyyam sthan dile jate. Ti kamvat nahi mhanun gharatlya kontyach goshtit tine sahbhag ghyayacha nahi….Tichya maherchya lokancha satat apaman karaycha….ase kelyane tichya manat sasrchyanbaddal adar kasa rahil…

  2. Agadi manatale lihle ahe. Aaj pratham sunanchya bajune lihlela lekh vachala. Khare ahe…aaj chi sun ghar office vadildhari mandali ani mulanche sangopan sagalyach jababdarya ghete ..pan sasarche sadhe tyanchyach natvandancha sambhal karu shakat nahi ..sunecha load..tichi tarevarchi kasarat samjun ghet nahit…ani tila kayam parkepanachi treatment det rahtat…he badalale pahije

  3. अगदी बरोबर लिहिले आहे. मला पण असाच अनुभव आहे . खोटी माहिती पुरवून लग्न करून नेले . पण तेथे आपले कोणीच नव्हते .

  4. Khup yogy n chhan vishleshan kelay pn sushikshit asun hi he sangav va samjavav lagtay he durdaiv.jevha aaplya ghari koni yet tevha tyach aadaratithy nit nahi zal to pahuna na tumchyakade thambto va na parat yeto.mag soon tr kayamchi aaleli aste.tumhi man nahi thevla tr tila tumcha aadar ka vatel?

  5. Diwas tase rahile nahit aata gairfayda ghenare lok jast vadhlet Ani Kam karnarya striya ky ky naste udyog pan kartat he aapan city & news la baghtoch ki

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!