Skip to content

चुकलेल्या नवऱ्यांना पुन्हा नव्याने संधी देणाऱ्या स्त्रियांची मानसिकता!

चुकलेल्या नवऱ्यांना पुन्हा नव्याने संधी देणाऱ्या स्त्रियांची मानसिकता!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


भारतीय संस्कृती ही कुटुंब प्रधान संस्कृती आहे. अगदी प्राचीन काळापासून एकत्र कुटुंब, नाती, त्यातील असलेले बंध याबद्द्ल आपल्याला शिकवण मिळालेली आहे. ही नाती कशी निर्माण करावीत, कशी नीट सांभाळून ठेवावी हे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्यापर्यंत आल आहे. आता जरी पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावर हळू हळू प्रभाव पडत असला तरी मुळ संस्कृती ही आहेच. घर म्हणून जी काही एक गोष्ट आहे ती फक्त चार भिंती पुरती सीमित नसून ती तिथल्या माणसांनी त्यांच्या नात्यांनी बनली आहे हे बाळकडू आपल्याला मिळालेलच आहे.

हेच कारण आहे की इथे नाती टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात. शहरात जरी आता विभक्त होण्याचं प्रमाण वाढत असल तरी त्याच्या पेक्षा कितीतरी जास्त पटीने नात टिकवण्यासाठी प्रयत्न केला जातो, भर दिला जातो. मग त्या माणसं शिकलेली असोत किंवा अशिक्षित.
कोणतं नात टिकवण? तर नवरा बायकोचं. लग्न हा एक संस्कार आहे ही गोष्ट हे नात पदोपदी सिद्ध करत. या नात्यात एखाद्या रोलर कोस्टर राइड सारखी परिस्थिती पण निर्माण होते. म्हणजेच नवरा बायकोचे वाद विवाद, मग त्याची कोणतीही कारण असू शकतात, व्यसन, घरातल्या व्यक्तींना न सांभाळणं बाहेर काहीतरी संबंध असणे, संसारच नीट न करणे अशी अनेक कारणे या वादांमध्ये असतात, दिसून येतात.तरीही हे संसार तुटत नाहीत. हे शेवटपर्यंत टिकतात.

बऱ्याचदा अस होत की नवऱ्याच्या कितीही चुका असल्या, त्याने काहीही केलेले असेल तरी बायका त्यांना पुन्हा एक संधी देतात, मग तो व्यसनी असुदेत, भांडणारा असुदेत किंवा अजून काही करणारा असुदे. बायकांना माहीत असत की आपला नवरा चुकतोय तरी त्या त्यांना माफ करून पुन्हा एकदा सुधारायची संधी देतात. पण बाहेरून जी लोकं पाहत असतात ज्यांना सरळ सरळ दिसत असत की काहीतरी चुकीचं घडत आहे त्यांना मात्र हा प्रश्न पडतो की ही बाई कशी काय इतकं होऊन गप्प आहे? कस काय परत त्याला संधी देत आहे? काय मानसिकता असेल या पत्नीची?

तर याच उत्तर ही आपल्या संस्कृती मध्येच दडल आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत पतीला परमेश्वर मानलं जात. म्हणजेच त्याला देवाच्या स्थानी ठेवलं जात. तसच संसारात काही चूक झाली, तो मोडला तरी चुकीचं अनेकदा बाई लाच ठरवलं जातं. तिलाच दोष दिला जातो की तुला नीट संसार करता आला नाही. तू घर सांभाळलं असत तर नवरा अस वागला नसता. त्यामुळे पत्नीचा बरायचदा हा प्रयत्न असतो की काहीही झालं तरी आपला संसार नीट टिकला पाहिजे आणि त्यासाठी त्या नवऱ्याला परत एक संधी द्यायला तयार होतात.

आताच्या काळात अनेक महिला नोकरी करतात, त्यांचं स्वतःच काहीतरी अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. फक्त घरापुरत किंवा कोणाचीतरी बायको अस त्यांनी स्वतः ला मर्यादित ठेवलेल नाही. पण ही अलीकडच्या काळातली परिस्थिती आहे. बहुतांशी बायका या घर सांभाळतात आणि संसार पाहतात. हे काम खरतर कोणत्या तरी जॉब पेक्षा पण कठीण आणि कौशल्य पूर्ण आहे. पण यासाठी पत्नी कोणता मोबदला मागत नाही. बिनदिक्कत करत राहते.

पण जेव्हा नवऱ्यासोबत काही होत, तो काही करतो आणि नात तुटायची पाळी येते तेव्हा नवऱ्याकडे मात्र सर्व असत. त्याच घर, माणसं. पण पत्नीकडे काही राहत नाही. तिला माहेरी पण जाता येत नाही. कारण तिथे पण तिला हेच सांगितलं जात की एकदा मुलीचं लग्न झालं की ती तिकडची झाली.

अनेक संसार टिकतात त्या या गोष्टी मनात ठेवून टिकवलेल्या नात्यामुळे आणि या सर्वाच्या पलिकडे असत ते प्रेम. आपण ज्या माणसासोबत लग्न करतो त्याचाशी मनाने, शरीराने जोडले गेलेलो असतो. ती व्यक्ती आपली असते. तिच्याबद्दल प्रेम, आत्मीयता, माया असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे माझा नवरा जर चुकत असेल तर मीच त्याला मोठ्या मनाने माफ करायला हवं ही भावना बायकोच्या मनात असतेच. अशी क्षमाशिलता, सहानुभूती स्त्री कडे उपजतच असते. हीच तिच्या प्रेमाची ताकद असते ज्यामुळे चूक करणारा नवरा पण बरेचदा सुधारतो, त्याला पश्चाताप होतो आणि तो परत पूर्वीसारखा पण होतो.

या सर्व गोष्टी जरी असल्या, संधी देऊन नात सुधारत असेल, नीट होत असेल तर नक्की संधी द्या. पण जिथे आपलं स्वतःचं अस अस्तित्वच राहत नसेल, आपला स्वाभिमान राहत नसेल आपल्याला त्यातून शारीरिक, मानसिक त्रास होत असेल तर अश्या नात्याविषयी परत एकदा विचार करण्याची खूप गरज आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “चुकलेल्या नवऱ्यांना पुन्हा नव्याने संधी देणाऱ्या स्त्रियांची मानसिकता!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!