Skip to content

” स्त्रियांना आनंदी ठेवणं ही सुद्धा एक कला आहे.”

” स्त्रियांना आनंदी ठेवणं ही सुद्धा एक कला आहे.”


मधुश्री देशपांडे गानू


“नारी हूं, शक्ती हूं…
कोमल हृदय हूं
वज्र सी कठोर भी,
फिर भी कुछ तो अलग हैं मुझमें

माझ्याच कवितेतील काही ओळी. “स्त्री”. आजपर्यंत स्त्रियांबद्दल इतकं लिहिलं गेलं आहे. तरीही स्त्री बद्दलचे आकर्षण तसंच आहे. अजूनही स्त्री पूर्ण कळली आहे असं नाहीच वाटत ना! आता तर स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्याही पुढे गेली आहे. खरंतर निसर्गाने स्त्री आणि पुरुष शारीरिक, भावनिक, मानसिक पातळ्यांवर वेगळे निर्माण केले आहेत. आणि तरीही ते परस्पर पूरक आहेत. कोणीही एक दुसऱ्या विना अपूर्णच आहे. स्त्री ही जननी आहे. शक्ती आहे. शिवाला शक्तीशिवाय पूर्णत्व नाही. या लेखाचा उद्देश स्त्रियांना आनंदी कसे ठेवावे असा असला तरीही त्यामुळे पुरुष आणि संपूर्ण कुटुंब ही आनंदी कसं होईल हा आहे.

प्रथम सर्वात महत्त्वाचा मुद्दा.. समाजाच्या चुकीच्या चालीरीती मुळे आणि चुकीच्या संस्कारांमुळे स्त्रीला भोगवस्तू, दासी, पायातली वहाण आणि स्त्रीकडे फक्त एक मादी आणि तुमच्या कुटुंबाला कुलदीपक देणारी व्यक्ती असं समजणाऱ्यां साठी हा लेख नाहीच. आज सहज कोणत्याही वयोगटातील पुरुष कोणत्याही वयोगटातील स्त्रीला “J1 झालं का?” असं विचारतात. कोणतीही स्त्री केव्हाही उपलब्ध आहे अशी अत्यंत विकृत मानसिकता असलेल्या पुरुषांसाठी तर हा लेख नाहीच नाही. मुळात स्त्री-पुरुष म्हणजे फक्त एकच नातं, एकच संबंध, नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी एवढाच संकुचित आणि एकांगी विचार या लेखाचा असूच शकत नाही. स्त्री म्हणजे फक्त तिचे शरीर असे नसून तिलाही मन आहे, भावना आहेत, स्वतंत्र बुद्धी आहे. आणि ती एक स्वतंत्र माणूस आहे.

स्त्री ही आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात सर्वप्रथम येते ती आपली “जन्मदात्री माता” म्हणून. तिच्यामुळेच आपण हे जग बघतो. आणि तिच्यामुळेच इतर अनेक नाती आपल्याला मिळतात. बहीण, मावशी, आजी आत्या, मामी, काकू, वहिनी, मैत्रीण, सखी, पत्नी, मुलगी. स्त्रियांची तर किती नाती!!! प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष जन्मापासूनच अनेक स्त्रियांचा आपला नातेसंबंध आपल्याला फक्त आईमुळेच मिळतो.

अशा आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक स्त्रियांना आनंदी ठेवणं ही नक्कीच एक कला आहे. ही कला फक्त पुरुषांनीच जोपासली पाहिजे असं अजिबातच नाही. तर स्त्रियांनी सुद्धा स्त्रियांना आनंदी ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. मुळात हा लेख फक्त पुरुषांनाच दोषी ठरवणे किंवा त्यांना शहाणपण शिकवणे असा नाहीच. आणि सरसकट सगळे पुरुष वाईट असतात असाही अजिबातच नाही. प्रत्येक पुरुषाने आणि स्त्रीनेही आपल्या आयुष्यातील अनेक स्त्री-पुरुष नाती जपण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण रक्ताची नाती असोत किंवा मित्र-मैत्रिणी यामुळेच तर तुमच्या आयुष्याला खरा अर्थ असतो. तुम्हांला हक्काचं कुटुंब असतं. मायेची माणसं असतात. तुमचं दुखलं-खुपलं, सुखदुःख सगळ्याचे साथी असतात. भागीदार असतात. मग त्यांना आनंदी ठेवलेत तर तो आनंद तुम्हांलाही मिळणारच ना!!

स्त्री आणि पुरूष यांच्या मानसिकतेत भावनिक प्रकटीकरणात निसर्गतःच वेगळेपण आहे. त्यामुळे बऱ्याचदा गैरसमज होतात. सुसंवाद साधता येत नाहीत. पण स्त्रियांना आनंदी ठेवणं वाटतं तितकं कठीण नाही बरं का!! खरंच खूप सोप्पं आहे. तुमची आई, बहिण, पत्नी, मुलगी यांना आनंदी ठेवणे खरंच कठीण आहे का हो??

स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूप जागरूक असते स्त्री. सहज “आज सुंदर दिसतेस किंवा ही साडी, हा रंग तुला खुलून दिसतोय.” या एका वाक्याने ही ती आनंदित होते. आणि तिचा सगळा दिवस आनंदी होतो. घरची लक्ष्मी, पत्नी, मुलगी, आई आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी होतं. आणि असे कौतुकाचे, प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी स्त्रिया आसुसलेल्या असतात. तिच्या हातच्या पदार्थांचं, तिच्या कलेचं कौतुक करून तर पहा! तुमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक स्त्री नात्याविषयी हे करून पहा.

तुमचं घर 24 तास अविरतपणे अनेक आघाड्यांवर, ती अनेक नात्यांची लेबलं घेऊन लीलया सांभाळत असते. तिला दमलीस का? म्हणून विचारा. सरप्राईज म्हणून कधी तरी चहा, एखादा पदार्थ तुम्ही करून द्या. बघा, ती कशी खुलते ते! कधीतरी छोटंसं का होईना सरप्राईज गिफ्ट द्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींतच मोठा आनंद लपलेला असतो. हे फक्त पुरुषांसाठीच मी सांगत नाहीये. तर स्त्रियांनीही आपल्या आईसाठी, बहिणीसाठी, वहिनीसाठी, मैत्रिणीसाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आनंद देणाऱ्या नक्कीच करायला हव्यात. आपल्या आयुष्यातील स्त्रियांचं मनमोकळे कौतुक करायला हवं. तिच्या कष्टांची कदर करायला हवी. तिचं अस्तित्व, तिच्या असण्याचाही गौरव व्हायलाच हवा.

स्त्रीची शारीरिक, मानसिक, भावनिक गरज पुरुषांपेक्षा वेगळी असते. हे जाणून पतीने तिच्याशी समजून वागायला हवे. तिच्या इच्छा, तिच्या अपेक्षा सांभाळायला हव्यात. पती-पत्नी हे नातं सामोपचाराने, एकमेकांचा विचार करूनच वृद्धिंगत होतं. दृढ प्रेमाचं होतं.

खूप भेटवस्तू स्त्रियांना आवडतात असा सहज समज आहे. आणि तो सर्वस्वी चुकीचा आहे असंही नाही. पण त्यापेक्षाही आपल्या प्रेमाच्या माणसाने आपल्यावर मनापासून प्रेम करणे, ते वेळोवेळी व्यक्त करणे, आपली काळजी घेणे, कौतुक करणे हे तिला खरंच आनंदी करतं.

आता तुम्हीं म्हणाल मग पुरुषांना आनंदी ठेवणं हे स्त्रियांचं कर्तव्य नाही का? तर नक्कीच आहे. स्त्री-पुरुष माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून समान पातळीवर तर आहेत ना!! एकमेकांना आनंदी ठेवणं हेच तर आयुष्याचं सार आहे. तर माझ्या समस्त स्त्री आणि पुरुष मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक स्त्रीला आनंदी ठेवण्याची कला आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुमचा आनंद द्विगुणित होईल, याची खात्री आहे…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!