Skip to content

सतत तडजोड करून परिस्थिती सांभाळून घेणाऱ्या लोकांचं पुढे काय होतं बघा..

सतत तडजोड करून परिस्थिती सांभाळून घेणाऱ्या लोकांचं पुढे काय होतं बघा..


मेराज बागवान


‘तडजोड’ खूप महत्वपूर्ण गोष्ट.ह्या तडजोडीला आपण विविध नावाने ओळखतो .जसे की , ‘जुळवून घेणे, संभाळून घेणे, त्याग , समजून घेणे किंवा सामावून घेणे’.आयुष्य जगत असताना ह्या ताडजोडीला खूप महत्व आहे. कारण आयुष्य सुकर, शांतीमय आणि सुखी करण्यासाठी ह्या ‘तडजोडीची’ नितांत गरज असते.तडजोडीमुळे कलह, वाद ,भांडण-तंटे आटोक्यात येतात किंवा टळू देखील शकतात.पण ही तडजोड एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीक असते.पण मर्यादेबाहेरील तडजोड खूप हानिकारक ठरू शकते. ह्या अति तडजोडीचे लगेच नाही पण दूरगामी खूप वाईट परिणाम भोगावे लागतात.

काही व्यक्ती सतत कोणासाठी ना कोणासाठी तडजोड करीत असतात.कधी नाते टिकावे म्हणून तर कधी जवळची व्यक्ती दुरावू नये म्हणून.कधी परिस्थती बिघडू नये, भांडणे होऊ नये,आपल्यामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून ही सर्व तडजोडीची धडपड चालू असते.मग अशा व्यक्ती सतत स्वत्व विसरून फक्त आणि फक्त दुसर्यासाठी जगत असतात. झटत असतात.पण हे सगळे ठीक आहे. स्वतः आधी इतरांचा विचार करणे खूप चांगली गोष्टी आहे.पण समोरची व्यक्ती मात्र त्यास पात्र हवी,किंबहुना त्या लायक हवी.

पण सतत तडजोड करून परिस्थिती सांभाळून घेणाऱ्या अशा लोकांचं पुढे काय होते….

जर एखादी व्यक्ती सतत तडजोड करीत असेल, तर अनेकदा ती गृहीत धरली जाऊ शकते.’ती घेईल की समजून मला,तिला काय वेगळे सांगायचे’ अशी मानसिकता समोरच्या व्यक्तीची तडजोड करणाऱ्या व्यक्तीविषयी होऊ शकते.

जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी परिस्थिती स्वतः तडजोड करून सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचे स्वतःचे मत कधीच कोणीच विचारात घेऊ शकणार नाही.तिचे काय म्हणणे आहे, त्या व्यक्तीची काय इच्छा आहे या बद्दल कोणीच काहीच विचार करू शकणार नाहीत.का , तर ती सतत समजून घेत आहे ना….

सतत तडजोड केल्यामुळे व्यक्ती स्वत्व हरवून बसतात.प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते.पण एखादी व्यक्ती जर सतत जुळवून घेत असेल आणि नेहमी तीच जळवून घेत असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचे असे अस्तित्व च उरत नाही.

एखादी व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता समोरच्या व्यक्तीसाठी खूप काही करीत असते.त्या व्यक्तीचे नेहमी भले व्हावे असे तिला वाटत असते.आणि म्हणूनच ती त्या साठी सदैव झटत असते.मग ह्याने काय होते? हळूहळू त्या व्यक्तीची किंमत समोरच्या व्यक्तीसाठी कमी होऊ लागते.नकळत का होईना पण असे घडू शकते.कारण तडजोड करणारी, झटणारी व्यक्ती कायम समोरच्याची उपलब्ध असते.आणि ह्याच ‘सतत उपलब्ध’ असल्यामुळे ती व्यक्ती असल्याची किंमत राहत नाही.

जर कोणी एक व्यक्ती नाते तुटू नये म्हणून प्रत्येक बाबतीत एकतर्फी ताडजोड करीत असेल तर दुसरी व्यक्ती जिच्यासाठी तडजोड सुरू आहे ती त्या व्यक्तीचा मान किंवा आदर म्हणावा तसा ठेवू शकत नाही.

अनेकवेळा तडजोड करणाऱ्या व्यक्तीवरच जगाचा सर्व राग काढला जातो.बाहेर तसे बोलता येत नाही, राग व्यक्त करता येत नाही.म्हणून नेहमी समजून घेणाऱ्या व्यक्तीवरच राग निघतो.मनाला लागेल असे बोल त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून ऐकून घ्यावे लागतात.

एकांतरीत सतत तडजोड केल्यामुळे स्वतःच्या आयुष्याला कोणतीच दिशा राहत नाही.निर्णय घेण्याची क्षमता खुंटते.सतत इतरांचाच विचार केल्यामुळे आयुष्यात कोणतेच ध्येय दिसत नाही.समोरचा जो निर्णय घेईल त्या निर्णयाला फक्त ‘हो’ म्हणण्याऐवजी हाती काहीच उरत नाही.

तडजोड करण्याची सवय लागल्यामुळे स्वतःचे वैयक्तिक मत अशी व्यक्ती स्पष्टपणे मांडू शकत नाही.’मला काय आवडते?’ ह्याचा जणू पूर्ण विसरच त्या व्यक्तीला पडलेला असतो.सतत दुसऱ्यांना काय वाटते? ह्याच विचारात ते मग्न असतात. आणि यामुळे ते स्वतःला वेळ देऊ शकत नाहीत आणि स्वतःला पूर्णपणे ते विसरू शकतात.

असे काही परिणाम दिसून येतात जेव्हा एखादी व्यक्ती सतत तडजोड करीत असते.त्यांना वाटते आपण तडजोड केली तर सर्व काही सुरळीत चालेल.पण तसे होताना कित्येकदा दिसत नाही.

म्हणूनच तडजोड ही हवी पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आणि योग्य त्या व्यक्तींसाठीच.अन्यथा आयुष्याची दिशाभूल होऊ शकते.

खूप अवघड नाही.पण प्रत्येकाने विचार जरूर करावा की आपण करतोय ती योग्य तडजोड आहे ना ?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “सतत तडजोड करून परिस्थिती सांभाळून घेणाऱ्या लोकांचं पुढे काय होतं बघा..”

  1. nice article. Ya sarv goshti ghadun gelay mazay ayushat.
    Do not adjust every time because of you have adjust every time you lose your value. Very nice article 👍 👏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!