Skip to content

आपल्या सर्वांमध्ये एक ‘बे’शिस्तपणा वावरत आहे !!!

आपल्या सर्वांमध्ये एक ‘बे’शिस्तपणा वावरत आहे !!!


विक्रम इंगळे


अरे! मी त्याला खूप चांगला ओळखून आहे. असं आजकाल कुणी म्हणलं की मला धडकीच भरते. मला एक खरंच कळत नाही की लोक असे न्याय-निवाडा करणारे (जजमेन्टल किंवा न्यायिक) कसे होऊ शकतात. मी पाहिलय, जी लोकं एकमेकांना अनेक दिवस/महिने/वर्षे ओळखत असतात, ती एकमेकांबद्दल कधीही मतं मांडत नाहीत. पण ज्यांची वरवरची किंवा नीटशी ओळख नसते, ते मात्र बिनधास्त मतं मांडतात अथवा शेरे मारतात. ते म्हणतात ना की उथळ पाण्याला खळखळाट फार, त्या उक्तीनुसार हे चालतं. अरे त्याला काय कळतय, अरे याला डोक आहे का, अरे ह्याची लायकी तरी आहे का, असे शेरे आपण रोज ऐकत असतो. मला एक कळून चुकले आहे की जी माणसं अशी जजमेन्टल असतात ती जास्त मानसिक त्रास देणारी असतात.

तुम्ही एक निरीक्षण केलय का! जी माणसं उपदेश देत असतात, त्यांना लहानपणी फार बौद्धिक त्रासातून जावं लागलेल असतं. उपदेश हे उपरोधिक अर्थाने नाही तर चांगला उपदेश. अशा लोकांच शिक्षण एक तर कठीण परिस्थितीत झालेलं असतं किंवा अशी लोकं फार कडक शिस्तीत वाढलेले असतात. सायकॉलॉजीचा अभ्यास केलेले लोक वेगळे. तिथे उपदेश देण्याची कला विशिष्ट शिक्षणाने येते. परंतु इतर लोकं जी चांगला उपदेश करतात त्यांच्या बाबतीत असं असू शकतं.

आणखी एक मजेशीर निरीक्षण! ज्या माणसांकडे बर्‍यापैकी सगळ्या गोष्टींची माहिती असते, पण ज्याची माहिती नसते, ती जाणून घेण्यासाठी जी माणसं भुकेली असतात ते कोणे एके काळी बेफिकीर असतात. त्या काळी त्यांना माहिती असेल काय अन नसेल काय, काही फरक पडत नसावा. त्यांचा कुठेतरी माहितीच्या अभावी अपमान झालेला असतो. म्हणून ते पेटून उठले असतात आणि आपली बुद्धी म्हणजे विकिपीडिया करतात. कामानिमित्त एखाद्या क्षेत्राची सखोल माहिती असणे हे वेगळे. पण ह्या विशिष्ट लोकांना एक जनरल माहिती बरीच असते.

आणखीन एक! जी लोकं रागीट असतात ती साधारणपणे काळजी घेणारी असतात. इथे बाहेरच्या लोकांचा काही संबंध नाही. तुमचे आप्त स्वकीय, जवळची माणसे, हे रागावतात किंवा चिडतात तेंव्हा त्यात बहुतेकवेळा काळजी जास्त असते. आपले काही नुकसान होऊ नये अथवा आपण काही चुकू नये, म्हणून ही काळजी म्हणजे राग. ही चिडणारी माणसे खूपवेळा कडक शिस्तीची, अत्यंत काटेकोर असतात. त्या लोकांना अशी अपेक्षा असते की सर्व गोष्टी वेळेवर व्हाव्यात अणि त्यांत तुम्हाला अगदी कमी त्रास व्हावा.

अजून एक! जी माणसे काही ना काही कारणाने खूप दुखावली असतिल किंवा ज्यांनी आयुष्यात खूप दुःख भोगले असेल ती दुसर्‍याला सहसा दुखवत नाहीत अणि त्यांना आणखीन दुःखाची भीती वाटत नाही. अशा लोकांनी आयुष्यात ईतके भोगलेले असते की ‘दुःख म्हणजे काय’, त्याचे परिणाम काय होतात ह्याचा पूर्ण अनुभव त्यांना असतो. म्हणून ते सहसा कुणाला दुखवत नाहीत. अशी माणसे दुसर्‍यांच्या मनाला जपतात. (मी इथे फक्त सकारात्मक लोकांचा विचार करतोय. काही नकारात्मक विचारसरणीचे लोक म्हणतात, मला मिळालय मग ह्यालाही तसंच दुःख मिळायला हवे. त्यांच्या मनात सुडाची भावना असते)

विलक्षण! काही लोकं अशीही असतात, जी दुसर्‍याला कधीच समजून घेत नाहीत पण त्यांची अपेक्षा असते की ह्यांना मात्र सर्वांनी समजून घ्यावे. हे पण बघायला मिळते. वस्तुस्थिती, परिस्थिती, घटना, कधीकधी असहायता हे काहीही असे लोक कधीही समजून घेत नाहीत. फार हट्टी आणि हेकेखोर असतात. पण त्यांच्यावर ज्यावेळी हीच परिस्थिती येते तेंव्हा मात्र, तुम्ही कसे समजून घेत नाही हा आक्रस्ताळेपणा करतात.

आश्चर्यजनक! जी लोकं धाडसाच्या वल्गना करतात, बढाया मारतात, ती खर तर खूप डरपोक असतात. हे जरा ‘गर्जेल तो बरसेल काय’ ह्या म्हणी प्रमाणे आहे. मोठमोठय़ा गप्पा मारणारी अशी माणसं उंदराला सुद्धा घाबरतात. तुम्ही पहिलंच असेल, जोरजोरात भुंकणारे कुत्रे, जेंव्हा त्याच्या अंगावर दुसरं कुत्रे धावून गेले की, शेपूट घालून पळून जाते.

शेवटी! समारंभ, पार्टी, गॅदरींग अशा ठिकाणी एकटा एकटा राहणार्‍या माणसाला, दुसऱ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे असे वाटतं. हे अगदी अटेन्शन सिकर असतात. इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपली विचारपूस करावी, प्रत्येक गोष्टीत मीच आकर्षण बिंदू (सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन) पाहिजे असा आग्रह असतो.


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया


Online Counseling साठी !

क्लिक करा

2 thoughts on “आपल्या सर्वांमध्ये एक ‘बे’शिस्तपणा वावरत आहे !!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!