Skip to content

सिंगल राहणारी लोक आणि त्यांच्या कामभावनांचा योग्य निचरा!

सिंगल राहणारी लोक आणि त्यांच्या कामभावनांचा योग्य निचरा!


सुधा पाटील

(समुपदेशक)


खरतर ज्ञान हे त्रिकालबाधीत सत्य आहे.मग ते कोणत्याही विषयाचे का असेना! जगाच्या पाठीवर कुठेही जा, वास्तव हे वास्तवच असतं.आता हेच बघा ना,आपल्या पृथ्वीवर अनेक देश आहेत.त्या प्रत्येक देशाची संस्कृती,विचारधारा,परंपरा भिन्न आहेत. कारण त्या प्रत्येक देशांच्या गरजा, परिस्थिती, मानवप्राणी यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. परंतू पृथ्वीवर कुठेही जा, नैसर्गिक तत्व एकच आहे. कारण ते वास्तव आहे. आणि वास्तव कधीही बदलता किंवा संपवता येत नाही. ते स्विकाराव लागत.

मानवी जीवनातील अनेक जैविक गरजा हे मानवी जीवनाचं नैसर्गिक तत्व आहे.तहान,भूक,झोप,काम या अगदीच नैसर्गिक गरजा आहेत.पण या मूलभूत गरजांमधीलच एक गरज….काम…सेक्स…याविषयी आजही खूपच अज्ञान आहे.याला संस्कृती,परंपरा यांच्यात अडकवून ठेवल्यामुळे मानवी जीवन अनेक मानसिक समस्यांमध्ये अडकत चालले आहे.आपल्या समाजात अनेक कारणांनी अनेक स्त्री किंवा पुरुष सिंगल राहतात.त्यात लग्न न झालेली किंवा जोडीदार मृत झालेली किंवा घटस्फोटीत माणसं असतात. पण म्हणून त्यांच्या सेक्सुअल भावना संपतात किंवा नसतात असं नाही.

अल्बर्ट एलीस… जगप्रसिध्द मानसोपचारतज्ञ…. ज्यांनी “मानवी कामजीवन” यावर सखोल अभ्यास केला,कामजीवनावर त्यानी स्वत: अनेक प्रयोग केले आणि जगातील सर्व लोकांना कामजीवनाच महत्त्व पटवून दिलं.त्यांनी सेक्स विषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘लँप’ नावाची संस्था उभारली.”मी अल्बर्ट एलीस ” या पुस्तकातील प्रकरण सात मध्ये त्यांनी कामजीवनावर सविस्तर माहिती दिली आहे. पण आज एकविसाव्या शतकातही याविषयी अज्ञान आहे, लोकं यावर बोलायला कचरतात याच वाईट वाटतं.काही मोजकी लोकं बोलतही असतील…पण हे प्रमाण खूपच अल्प आहे. मुळात एक स्त्री असो किंवा एक पुरुष त्याच्या कामभावनांची पूर्ती होणं हा त्यांचा एक नैसर्गिक हक्क आहे. जर व्यक्ती सिंगल असेल तर तिच्या कामभावनांचा निचरा कसा व्हावा… किंवा कसा केला जावा? यावर अनेक शंका मनात असतील.

एखादा पुरुष वेश्येकडे जाऊन आपली कामभावना पूर्ण करेल. पण एखादी विधवा, एखादी सिंगल बाई त्यांनी काय करावं? काहीजण मित्र,मैत्रीणी शोधतात.पण त्यातही कधी कधी विश्वासघात होतो.त्यात आपली सामाजिक बंधन! माणूस कोंडीत अडकतो.कारण जसं पोटाला भूक लागली की जेवन लागत, मनाला भूक लागली की, मानसिक आधार लागतो, अगदी तसंच सेक्सची भूक लागली की, ती भावना पूर्ण व्हावी लागतेच!नाहीतर माणूस अस्वस्थ होतो किंवा चिडचिड करतो किंंवा नैराश्यात जातो.

म्हणूनच कामभावनांचा निचरा होणं गरजेचं असतं. आज विज्ञान खूप पुढे गेलंय.विज्ञानाने हे सिद्ध केलंय की,हस्तमैथुन हा योग्यच आहे. तो शरीरास नक्कीच हानीकारक नाही. आणि फार पूर्वीच विचारवंतांनी लिहून ठेवलंय की,सेक्स भावनांची पूर्ती करण्यासाठी विरुध्दलिंगी पार्टनरची गरज लागतेच असं नाही. तसंही अल्बर्ट एलीस म्हणतो की,” कामजीवनाचा माझा अग्रक्रम हा भिन्नलिंगी कामजीवनालाच राहील!”

त्यान हे विधान अनेक प्रयोगांतून, अनुभवातून मांडले असले तरीही त्याने त्यांच्या पुस्तकात कामजीवनाच्या पूर्तीचे विविध मार्ग सांगितले आहेत. व्यक्ती सहजीवनात असो वा सिंगल त्यांच्या कामभावनांचा निचरा होणं गरजेच असतं. आपल्या भारतीय संस्कृतीने कामभावनांची पूर्ती लग्नानंतरच करावी अशी काहीशी मांडणी करून ठेवली आहे. पण विज्ञान हे वास्तववादी असत.त्यामुळे नैसर्गिक गरजा पूर्तीचे जे वैज्ञानिक मार्ग आहेत त्याचा समाजाने अभ्यास करावा. आणि सिंगल लोकांनी आपल्या कामभावनांची पूर्ती करावी.

कारण या भावनांचा निचरा वेळीच नाही झाला तर त्याचा आपल्या दैनंदिन कामावर,मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. मुळात कोणी कोणता मार्ग निवडायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न…पण कामभावनांचा निचरा करताना कोणाची फसवणूक करणं,एखाद्याचा गैरफायदा घेणं,अशा मार्गंचा अवलंब करु नये.जर दोघांच्या संमतीने सेक्सुअल रिलेशन निर्माण होत असतील तर ते विधायक असतात अस अल्बर्ट म्हणतो.पुढे तो असंही म्हणतो की,तुमच्यामुळे समोरच्याला गुप्त आजारांची देणगी देऊ नका.हे पूर्णत: विघातक आहे.

थोडक्यांत काय तर सिंगल व्यक्तींनी त्यांना योग्य वाटेल असा मार्ग निवडून आपल्या कामभावनांचा वेळीच निचरा करावा.त्या दडपून ठेवू नयेत. नाहीतर त्याचा कधीतरी होणारा उद्रेक समाज विघातक असतो. कामभावनांचा निचरा करण्यासाठी पार्टनरच लागतो असं नाही. हे विज्ञान समजून घेतल तर आयुष्य आनंदात, शांततेत जगता येतं.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “सिंगल राहणारी लोक आणि त्यांच्या कामभावनांचा योग्य निचरा!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!