Skip to content

जुळणाऱ्या गुणांपेक्षा न जुळणाऱ्या गुणांबरोबर आपलं लग्न होत असतं.

जुळणाऱ्या गुणांपेक्षा न जुळणाऱ्या गुणांबरोबर आपलं लग्न होत असतं.


मेराज बागवान


‘लग्न’ आपल्या भारतीय संस्कृतीमधील अतिशय महत्त्वाची गोष्ट.कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी ‘लग्न’ ही संकल्पना उदयास आली.आणि आजही याचे महत्व आपल्याकडे अनन्यसाधारण आहे.लग्न म्हटले की , ज्योतिष, गुण , पंचांग वगैरे देखील गोष्टी आपल्याकडे खूप सर्रास पहावयास मिळतात. फक्त घरातील रीती-रिवाज, परंपरा याप्रमाणे यामध्ये थोडाफार बदल बघायला मिळतो.३६ गुण जुळले की जोडी छान जमेल, लग्न यशस्वी होईल याची जणू शाश्वतीच मिळते. आणि सर्व जण त्यावर विश्वास ठेवून लग्न ‘उरकून’ टाकतात.हा झाला संस्कृतीचा भाग.पण खरे पहावयास गेले तर ,जुळणाऱ्या गुणांपेक्षा न जुळणाऱ्या गुणांबरोबर आपलं लग्न होत असतं. ते कसे यावरच आपण चर्चा करणार आहोत.

मुलगा आणि मुलगी दोघे खूप विभिन्न असतात.अगदी प्रत्येक बाबतीत.लग्न जुळवत असताना त्यांची पत्रिका जुळेल देखील.किंवा पत्रिकेतील सर्व च्या सर्व गुण जुळतील देखील.पण वैचारिकदृष्ट्या मात्र दोघांमध्ये खूप तफावत असू शकते.खरे तर प्रत्येक व्यक्ती एकमेव असते.एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी असूच शकत नाही.मग लग्न ठरवित असताना , कौटुंबिक पार्श्वभूमी, मुलगी /मुलगा काय करतो, व्यवसाय/नोकरी, घर ह्या मूलभूत गोष्टी पाहिल्या जातात. आणि दोन्ही कडच्या मंडळींना ह्या गोष्टी पटल्या , तर लग्न जुळते.आजही ह्याच गोष्टींच्या आधारे लग्न ठरविली जातात.आणि हे सहजीकच आहे.पण ह्या जुळलेल्या गोष्टी वरवरच्या असतात.खरे तर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे , स्वभाव, आवडी-निवडी,विचार आयुष्यातील ध्येय आणि मने जुळणे.पण ह्या सगळ्या गोष्टी कधीच एकावेळी कोणाच्याच बाबतीत जुळून येत नाहीत.कारण दोन्ही व्यक्तींच्या ह्या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असतात आणि ह्याच न जुळलेल्या गुणांबरोबर लग्न होते.

आपल्याकडील जवळपास सर्वच लग्ने ही अशी जुळतात.ज्या मध्ये मुलाला प्रवासाची आवड असते तर मुलीला वाचनाची.काही वेळेस मुलगी खूप मोकळ्या विचारांची असते मात्र मुलगा खूपच ‘अंतर्यामी’ असतो.कधी मुलगा खूप बोलका असतो तर मुलगी अगदीच शांत असते.जवळपास सर्वच जोडपी आपल्याकडे अशीच पहावयास मिळतात. पण तरी देखील लग्न होते, टिकते आणि यशस्वी देखील होते. कधी कधी वाटते, लग्न ह्या संकल्पनेचा आधारच ‘वेगळेपण स्वीकारणे’ असा आहे.

मानसिकदृष्टया, वैचारीकदृष्ट्या नवरा-बायको मध्ये खूप फरक असतो.नवरा खूप सामाजिक असतो तर बायको घर कोंबडी.कुठे बायको खूप सामाजिक असते तर नवरा खूप अलिप्त राहणारा. सगळीकडे हेच पहावयास मिळते. पण असे सगळे असले तरी देखील ‘लग्न संस्था’ आजही टिकून आहे.जरी न जुळलेल्या गुणांबरोबर लग्न झालेले असले तरी देखील ,’समजूतदारपणा, सामंजस्य, सहवास, तडजोड, त्याग ह्या काही गोंष्टींमुळे प्रेम वाढीस लागते आणि दोघे पूर्णपणे वेगळे असूनही संसार बहरतो.

लग्न ठरण्यापूर्वी किंवा लग्न होण्यापूर्वी मुले-मुली एकमेकांशी संवाद साधत असतात, कधी भेटी-गाठी देखील होतात.त्यावेळी एकमेकांच्या चुका, वेगळेपण, विचार अगदी सहजपणे स्वीकारल्या जातात.त्यावेळी ‘तो खूप वेगळा आहे/ती खूप वेगळी आहे’ हा विचार सहसा येत नाही.तसेच कुटुंबाचा आधार असल्यामुळे देखील मुले-मुली एकमेकांना स्वीकारतात देखील.मात्र लग्नानंतर सहवास हा रोजचाच असतो.तेव्हा पुन्हा नव्याने एकमेकांची ओळख होते.आणि मग ते वेगळेपण जाणवू लागते.मात्र त्यावेळी खरे तर त्या वेगळेपणामुळेच दोन जीव आणखीन एकमेकांच्या जवळ येऊ लागतात आणि नाते हळूहळू घट्ट होते आणि म्हणूनच अशा प्रकारे न जुळणाऱ्या गुणांबरोबरच लग्न हे होत असते.

तसेच ह्याच न जुळलेल्या गुणांमुळे लग्न मोडकळीस आलेले देखील पहावयास मिळते. मात्र त्याची कारणे विविध असू शकतात.सर्वात महत्वाचे म्हणजे ,’एकमेकांचा आदर करणे आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे’.एक वेळ प्रेम नसेल तरी चालेल पण आपल्या पती/पत्नी बद्दल मनात कायम आदर ,मान असला पाहिजे.आणि तरच त्या वेगळेपणाला एक अर्थ प्राप्त होतो.खाण्या-पिण्याच्या सवयीपासून ते कपड्यांच्या आवडी-निवडी बाबत सर्वच गोष्टी ह्या वेगळ्या असतात आणि हेच वेगळेपण सर्वार्थाने , खुल्या दिलाने स्वीकारता आले की नाती आपोआपच फुलू लागतात, आणि संसार बहरू लागतो.

प्रत्येक मुलाच्या-मुलीच्या अपेक्षा ह्या असतातच.लग्नावरून काहींनी अनेक स्वप्ने देखील पाहिलेली असतात.पण कोणाच्याच अपेक्षा, स्वप्ने जशीच्या तशी सत्यात उतरत नाहीत.लग्न संस्थेत तर मुळीच नाही.’जिथे दोन वेगळेपण एकत्र येते तिथे लग्न जमते’.म्हणूनच हेच वेगळेपण स्वीकारता आले पाहिजे, एकमेकांसाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी असली पाहिजे, आपला अहंकार नात्याहून मोठा होणार नाही, आपला राग आपले लग्न मोडकळीस नेणार नाही,आपल्या स्वभावातील काही त्रुटी जोडीदारास दुखावणार नाहीत, आपल्या वैयक्तिक अपेक्षा, इच्छा त्या व्यक्तीवर लादल्या जाणार नाहीत याची मात्र प्रत्येक दामपत्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि तशी वागणूक ठेवली पाहिजे.

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते.प्रत्येकाला आपले असे विचार, मत असते.किंबहुना ते असायलाच पाहिजे.फक्त हे आपले विचार जगत असताना आपल्या जोडीदाराला आपण नकळत का होईना ‘कमी तर लेखत नाही ना ? तिचा अपमान तर करत नाही ना ? हा विचार जरूर केला पाहिजे.आणि हे सर्व करायला जमले तर हेच न जुळलेले गुण आपले ‘सहजीवन’ जुळवतील यात काही शंका नाही.

‘वेगळेपण स्वीकारा आणि संसार गुण्यागोविंदाने करून आयुष्य सुखी बनवा’.
आनंदी लग्न जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!