“एकमेकांचे काही गुण जुळणार नाहीत, हे न स्वीकारल्यामुळे जोडप्यांमध्ये भांडणं होतात.”
मधुश्री देशपांडे गानू
“लग्न”. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडणारी, संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी महत्वाची घटना!! म्हणतात ना! “शादी का लड्डू. जो खाये वो भी पछताये, और जो ना खाये वो भी पछताये ” तरीही अत्यंत उत्साहाने, आनंदाने, वाजत गाजत लग्नं होतातच की!
आपल्याकडे तर लग्नसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी पत्रिका जुळवून, छत्तीस गुण जमून लग्नं होतात. प्रेम लग्न असो नाहीतर ठरवून केलेली असोत. आपल्यासाठी एक उत्सवच असतो. आजही कित्येक लग्नं ही मुला-मुलींचं मत विचारात न घेता ही होतात. पत्रिकेतील ग्रहतारे, कुटुंबीय, नातेवाईक, पैपाहुणे, कितीही सजावट लग्नात असली तरीही शेवटी खरा संसार दोघांनाच करायचा असतो.
आता तर खूप मोकळेपणाने लग्नं होतात. आधी “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहून मग एकमेकांचे पटलं तर लग्नं होतात. तरीही खरा संसार सुरू झाल्यावरच खरी कसोटी असते. नुसतं एकत्र राहणं वेगळं आणि नवरा-बायको हे समाजमान्य नातं स्वीकारून एकमेकांच्या साथीने संसार करणं संपूर्ण वेगळं. अगदी कागदावर कितीही गुण जुळत असले तरीही प्रत्यक्षात मात्र स्वभावातले गुण-दोष कळायला वेळ जावा लागतो. सुरूवातीचे नव्या नवलाईचे फुलपाखरी दिवस संपले की एकमेकांचे खरे स्वभाव कळायला सुरुवात होते.
संपूर्णपणे भिन्न कुटुंबात, परिस्थितीत, अनुभवांत, संस्कारात, भिन्न स्वभावाच्या दोन व्यक्ती जीवन भरासाठी एकत्र बांधल्या जातात. तुम्हीं अगदी चोवीस तास एकत्र राहात असलात तरीही तुमचा जोडीदार नेमक्या प्रसंगी नेमका कसा वागेल, कसा व्यक्त होईल याची खात्री तुम्हीं देऊ शकत नाही. प्रत्येकात गुणदोष असतातच. एकमेकांचे काही गुण जुळणार नाहीत हे सर्वात प्रथम मान्य करायला हवं.
पती-पत्नी हे नातंच असं आहे ना! म्हटलं तर चिकटवलेलं, म्हटलं तर सर्वात जवळचं. अद्वैताचं नातं.. मग या नात्यात अपेक्षाही आल्या. आणि अगदी नैसर्गिक सहाजिकच आहे हे. आपल्या जोडीदाराने, सहचराने आपल्याला सगळ्याच बाबतीत पूर्ण साथ, पूर्ण पाठिंबा द्यावा अशीच प्रत्येकाची इच्छा असते. अर्थात इच्छा असणं वेगळं आणि त्याचा अट्टाहास असणे वेगळे. दोघेही भिन्न स्वभावाचे, भिन्न विचारसरणीचे, भिन्न निर्णय क्षमतेचे, भिन्न व्यक्ततेचे असतात. त्यामुळे मी म्हणेन तसं वागलं पाहिजे असा अट्टाहास असेल तर भांडणं होणारच. एकमेकांना स्पेस ही देता आली पाहिजे. छंद, आवडी यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करायची नावड असते. अशावेळी आर्थिक सक्षमता असेल तर तुम्ही मदतनीस ठेवू शकता. कित्येकदा पतीही उत्तम स्वयंपाक करणारा असतो. इथे दोघांचं सामंजस्य महत्त्वाचं आहे. कित्येकदा आपण पाहतो पती-पत्नी दोघेही उच्चपदस्थ नोकरी करणारे असतात. अशावेळी पत्नी जर आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम असेल तर पतीचा पुरुषी अहंकार जागा होतो. कित्येक पती-पत्नीमध्ये केवळ मत्सरामुळे भांडणं होतात. पती-पत्नीमध्ये प्रत्येकाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक गरज ही वेगवेगळी असते. हे सुद्धा समजून घेऊन दोघांनी एकमेकांना दोष न देता समजून घेणे गरजेचे आहे.
स्त्री आणि पुरुष हे परस्पर पूरक आहेत. प्रतिस्पर्धी नाहीत. एकदा पती पत्नी हे नातं स्वीकारलं की जोडीदाराला गुणदोषांसकट स्वीकारावं. जिथे एक जण कमी पडेल तिथे दुसऱ्याने उभं रहावं. म्हणजे संसार सुरळीत चालतो. अर्थात हे मी सामान्य, संसाराचं महत्त्व असलेल्या जोडप्यांविषयी लिहिते आहे. प्रत्येकात काहीतरी उणीव असतेच. कोणीही सर्वगुणसंपन्न नसतो.
काही जण घर कामात तरबेज असतात. तर काहींची निर्णयक्षमता अचूक असते. काहींचे आर्थिक आडाखे अचूक असतात. तर काहींना कुटुंब, नातेवाईक, माणसं जोडून ठेवण्याची हातोटी असते. एकमेकांच्या साथीने, मदतीने, जोडीने एकत्र संसार करण्यातच खरं कसंब आहे. येणारे सुखदुःखाचे अनेक प्रसंग, घटना यांना एकमेकांच्या हातात हात घालून, एकमेकांना सांभाळत, सावरत सामोरं जायचं असतं.
एकमेकांचे दोष न दाखवता, गुणांचं कौतुक करून, एकमेकांना प्रोत्साहन देत, समजून घेत एकत्र चालणं यालाच तर संसार म्हणतात. क्षुल्लक गोष्टींवरून वाद, भांडणं न करता सामोपचाराने, सुसंवादाने, वेळप्रसंगी तडजोड करून प्रश्न सोडवता येतात. काहीही झालं तरी एकमेकांच्या साथीने पुढे जात सुखी संसार करण्यातच खरा आनंद आहे….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख अतिशय प्रबोधनात्मच आहे,समाजाला अशा दिशादर्शनाची खरी गरज आहे
फार छान असेच लेख पाठवित जाने म्हणजे आपली नवी पिढी सुधारेल