Skip to content

आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त होऊ शकतो, अशी कारणे पाहूया..

आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त होऊ शकतो, अशी कारणे पाहूया..


हर्षदा पिंपळे


संसार म्हणजे दोन जीवांचा सोबतीने प्रवास असतो.त्या दोन जीवांसोबत त्यांच कुटूंबही जोडलं जातं.सुरूवातीचे दिवस तर एकमेकांना समजून घेण्यात जातात. प्रत्येकाच्या आवडी-निवडी यामध्ये विचारात घेतल्या जातात.वर्तमानात जगता जगता भविष्याची स्वप्ने कधी डोळ्यांसमोरून जातात कळतही नाही.

हळुहळू एकमेकांना सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो. संसाराची गाडी तेव्हा कुठे सुरू होते.कालांतराने संसार सुरळीतपणे सुरू असतो.आयुष्यात वेगवेगळे बदल दिवसागणिक होत राहतात.थोडं मी थोडं तु असं समजुतदारपणे सगळं काही आनंदी आनंदाने घडत असतं.पण अचानकपणे संसारात अशा काही गोष्टी घडतात ज्याने हाच आनंदी संसार क्षणात उद्ध्वस्त होतो.

अनेकदा आपण म्हणतो इतका चांगला संसार चाललाय शेवटपर्यंत तरी असाच राहील. आपण सकारात्मक दृष्टीने अशा अनेक गोष्टी बोलतो.पण हेही तितकच खरं की आनंदी संसार हा पुढे जाऊन उध्वस्त देखील होऊ शकतो.अशी काही कारणे आहेत जी की आनंदी सुखाचा संसार उध्वस्त करू शकतात.

तर अशी काही कारणे पुढीलप्रमाणे—

संशयाचा विषारी वणवा जर आयुष्यात आला तर संसार निश्चितच उध्वस्त होऊ शकतो.आपलं संशयास्पद वागणं सुद्धा नात्यामध्ये वणवा पेटवू शकतं.

संसार सुरू झाला म्हणजे कितीतरी गोष्टी सहज बदलतात. संसार हा काही दोघांपुरता मर्यादित राहत नाही. त्यात घरातील सगळ्या गोष्टी येतातच. पण मग यामुळे अनेकदा एकमेकांकडे दुर्लक्ष होऊ शकतं.कमी वेळ एकमेकांसाठी मिळू शकतो. मग वेळेची तक्रार म्हणून नात्यात वितुष्ट यायला वेळ लागणार नाही.

व्यसन..व्यसन हे देखील संसार उध्वस्त होण्यामागच महत्त्वाच कारण आहे. खरतरं घरातील एखाद्या माणसाला असलेलं व्यसन हे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करत असतं.दारु, तंबाखू ,जुगार यांसारखी कितीतरी व्यसनं कित्येकांची आयुष्य पणाला लावतात.

व्यसनामुळे घरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून कलह होत असतात. आणि हाच कलह संसार उध्वस्त होण्याला कारणीभूत ठरतो.

लग्नानंतर घर -ऑफिस सगळच सांभाळाव लागतं , त्यामुळे कित्येकदा ताण येऊन एकमेकांवर कधी कधी विनाकारण राग काढला जातो.बोलायच काही नसतं परंतु ताणतणावाखाली येऊन अनेकदा जे बोलायला नको तेही बोललं जातं.आणि नात्यांमध्ये कटुता यायला एक ठिणगीही पुरेशी असते.

एकमेकांना पुरेसा वेळ देता न येणे , कामाच्या दगदगीत एकमेकांकडे दुर्लक्ष होणे, एकमेकांच्या शारीरिक, मानसिक गरजांकडे दुर्लक्ष होणे अशा कितीतरी गोष्टी सुखी संसार तुटायला कारणीभूत ठरतात.

कित्येक ठिकाणी तर मानपान या गोष्टींवरून तर आजही छळ होतो.केवळ सुनेच्या बाबतीतच नाही तर जावयाच्या बाबतीतही आज तीच परिस्थिती आहे. मानपानावरून कधीही मानसिक/शारीरिक छळ केला जातो. अशातच अनेकदा याला घरातील मोठी मंडळीच कारण असतात. पैशाच्या हव्यासापोटी सुखी संसाराचा गाडा दुःखाच्या खाईत केव्हा लोटला जातो कळतही नाही.

इतरांच्या संसाराशी तुलना करत असाल तर साहजिकच तुमच्या संसारात ठिणग्या पडणं स्वाभाविक आहे.

कित्येक कुटूंबात जोडीदार हा खूप चांगला असतो परंतु त्यांचे आईवडील मात्र यामध्ये वितुष्ट घालतात. विनाकारण अपमानास्पद वागणूक, नीट न वागणे यावरून दोन जीवांचा सुखी संसार केवळ त्या आईवडीलांमुळे उध्वस्त होऊ शकतो.

थोडक्यात काय तर अशी असंख्य छोटी मोठी कारणं आहेत जी की सुखी संसार क्षणात बेचिराख करू शकतात.आपणही आजुबाजूला अशा अनेक घटना रोज पाहतो,वृत्तपत्रात वाचतो.त्यातूनही आपण काहीतरी बोध घ्यायला हवा. काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे समजून घ्यायला हवं.

केवळ वाचून, बघून काही होत नसतं.ते आत्मसात करणं,त्याची अंमलबजावणी करणदेखील तितकच महत्त्वाच असतं. त्यामुळे शक्य होईल तितकं प्रत्येकानेच समजुतदारपणे घेणे आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक न होऊ देता गोष्टी योग्य रितीने हाताळण्याच कसब प्रत्येकाने शिकायला हवं.

संसार केवळ टिकवायचाय म्हणून नाही तर तो शेवटपर्यंत सुखी संसार म्हणून कसा होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. बाकी ज्याच्या त्याच्या संसाराची दोरी ज्याच्या त्याच्या हाती आहे.फक्त त्याने ती समजून उमजून घ्यायला हवी…संसाराच दोर कधी सैल सोडायचा कधी घट्ट पकडायचा हे जाणून घ्या.संसार सुखाचा होईल..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त होऊ शकतो, अशी कारणे पाहूया..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!