नको असलेल्या नवऱ्याचा सहज स्वीकार करून पुढे कसे जगावे हे सांगणारे ९ टिप्स.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
नको असलेल्या गोष्टींचा स्वीकार करणे आधीच खूप अवघड असते. त्यात नवराच न आवडता किंवा मनाविरुद्ध असला म्हणजे स्वीकार अजूनच अवघड होऊन जातो. कारण काही परिस्थिती किंवा गोष्टी ह्या तात्पुरत्या आयुष्यात असतात, त्यामुळे त्या नको असल्या तरी त्या ठराविक फेज पुरत्या सहन कराव्या लागतात किंवा स्वीकाराव्या लागतात. पण नवरा ही काय फेज किंवा वस्तू किंवा परिस्थिती नव्हे. तो तर एक जिताजागता माणूस आहे.
आणि त्याचा सहवास तर आयुष्यभरासाठी आहे. म्हणजे त्याला मनाविरुद्ध आहे म्हणून सहन करण्यापेक्षा पूर्ण मनाने स्वीकार केला तर नक्कीच आयुष्य अधिक सोप्प बनू शकतं. पण या सगळ्यात सुद्धा लग्न मनाविरुद्ध झालंय की मनाप्रमाणे होऊन आता आपल्या अपेक्षांनुसार आपला नवरा वागत नाही म्हणून त्रास होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे.
त्यासाठी पाहुयात काही टिप्स :-
१. तुमच्या नवऱ्या विषयी तुमचे नक्की विचार काय आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा काय आहेत, आणि तुमचा नवरा त्या पूर्ण करू शकणार नाही असं तुम्हाला वाटत का याची पडताळणी करा. तुम्हाला वाटण्यात आणि खऱ्या वस्तुस्थिती नक्कीच फरक असू शकतो. नक्की तो न आवडण्या मागची कारणं काय-काय आहेत ते समजून घ्या. आणि त्यावर विचार करा. तुमच्या अपेक्षा खरंच realistic आहेत का, आणि नसतील तर नवऱ्याला त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला change करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अपेक्षा change केल्या किंवा त्यावर थोडे काम केले तर कधीही चांगले.
२.सकारात्मक विचार करा. ज्या गोष्टी हातातून निघून गेल्यात त्याचा विचार करून परिस्थितीत बदल होणार नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही हा लेख वाचता आहेत, त्या अर्थी तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तुम्हाला तुमच्या नवऱ्याला स्वीकारून आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा आहे हे उघड आहे. आणि त्यामुळे सढळ हातांनी प्रयत्न केले तर तो दिवस नक्कीच लवकर येऊ शकतो. तुमच्या जोडीदारात आणि असणाऱ्या चांगल्या गोष्टींवर फोकस करायचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार करायला असंही कष्ट लागत नाहीत, ते आपोआपच डोक्यात येत राहतात ते आत्मकेंद्रित असतात. आणि त्यामुळे तुमच्या जोडीदारामध्ये असणाऱ्या वाईट किंवा नको असलेल्या गुणांवर ते फोकस करायला भाग पाडतात. त्यामुळे सकारात्मक विचार करा. नवऱ्याला न स्वीकारण्यामागच्या कारणांवर फोकस न करता , त्याचा स्वीकार का करावा यावर फोकस करा. प्रत्येक माणसात काही चांगले काही वाईट गुण असतात. तुमच्या नवऱ्याला माणूस म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्या चांगल्या गुणांवर फोकस करा.
३. हे चूक आणि हे बरोबर असे विचार मनातून काढून टाका.(eliminate black and white thinking) सगळ्याच गोष्टी चूक किंवा बरोबर नसतात, त्यांना चूक किंवा बरोबर या तराजूत तोलता येत नाही. आयुष्यात काही वेळा grey shade पण असते हे लक्षात ठेवायला हवं. grey shade म्हणजे ज्यात चूक आणि बरोबर असं ठरवताच येत नाही, किंबहुना काही गोष्टी त्यापलीकडच्या असतात. तुम्हाला योग्य वाटत असणारी गोष्ट तुमच्या पार्टनरसाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी योग्यच असेल असं नाही. त्यामुळे गोष्टींना चूक आणि बरोबर हे लेबल्स देणं बंद करायला हवं. आणि काही वेळा गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायला हव्यात. कारणं चूक आणि बरोबर मध्ये प्रत्येक गोष्टीची विभागणी करणं हे unrealistic आहे.
४. स्वतःवर आणि इतरांवर टीका करणे थांबवा. खूपदा आपण काही गोष्टी आपल्याकडून योग्य व्हाव्यात म्हणून स्वतःवर दबाव टाकत असतो, स्वतःला judge करताना देखील आपण फार विचार करत नाही. पण त्यामुळेच इतरांकडून देखील योग्य गोष्टी होण्यासाठी दबाव टाकला जातो आणि त्या तशा नाही झाल्या की प्रॉब्लेम होतो. त्यामुळे स्वतःला judge करणं आणि स्वतःवर दबाव टाकणं बंद करणं हा एक जोडीदाराला स्वीकारण्यासाठी महत्त्वपूर्ण पायरी आहे.
५. तुमच्या वर्तमानावर फोकस करा. जेव्हा आपण भूतकाळाशी आत्ताची परिस्थिती compare करतो (तुलना करतो) तेव्हा आपली स्वीकारण्याची क्षमता कमी होते. आपल्या सगळ्यांकडून चुका होत असतात, त्यामुळे मागच्या चुका आठवून त्रास करून घेण्यापेक्षा आत्ता हातात काय आहे आणि ते अजून बेटर कसं बनवता येईल याकडे लक्ष देऊयात.
६. एक वेगळ्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहायचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जागी आणि तो तुमच्या जागी असता, आणि तुमचा पार्टनर तुम्हाला स्वीकारू शकत नाही असं असेल, तर तुम्हाला कसं वाटेल याचा विचार करून बघा. हा प्रश्न या स्विकारण्याच्या प्रोसेस मध्ये नेहमी लक्षात ठेवा.
७. जेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून आनंदी आणि परिपूर्ण असता, तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराची कमी टीका करता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास 100% सक्षम असता. यामुळे तुमच्या लग्नावर खूप दबाव येत नाही. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल आणि तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी जबाबदार असाल, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला गरजा पूर्ण करणारा म्हणून पाहण्याऐवजी फक्त तुमचा जोडीदार म्हणून पाहता आणि प्रेम करू शकता.
८. आपल्या आनंदासाठी आपण जबाबदार असतो, आपल्या आनंदाची जबाबदारी दुसऱ्या माणसावर टाकणे हा त्या माणसावर अन्याय आहे. जेव्हा ही जबाबदारी आपण आपली घेऊन शकतो, तेव्हा आपण निस्वार्थीपणे आपल्या जोडीदारावर प्रेम करू शकतो. आयुष्यात पुढे आलेली गोष्ट एकतर स्वीकारावी लागते, नाहीतर बदलावी लागते. जिथे बदलणं शक्य नसतं, तिथे ती स्वीकारणं हाच पर्याय उरतो. मग ती नाईलाजाने स्वीकारण्यापेक्षा मोकळ्या मनाने स्वीकारली तर आयुष्य अजून सुखकर आणि सोप्प होऊन जातं.
९. तुमच्या नवऱ्याला रिजेक्ट करण्या आधी त्याला एक चान्स द्या, तुमच्या या नात्याला चान्स द्या. कदाचित तुम्ही तुमच्या पार्टनरला जस judge करताय , ज्या प्रकारचा माणूस समजताय तो , तो नसून वेगळाच आणि भारी व्यक्तिमत्व असू शकतो. पण त्यासाठी तुम्ही थोडा धीर धरून तुमच्या नात्याला, पार्टनरला आणि स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

काही फारसा आवडला नाही
Very bad….
अगदी बरोबर आहे लेख..!👍💐
अतिशय सुन्दर 🙏🌹👍👌☝️