Skip to content

जोडीदाराने तुमच्यावर प्रेम करावं, म्हणून स्वतःला जोडीदाराच्या अपेक्षेनुसार बदलवू नका.

जोडीदाराने तुमच्यावर प्रेम करावं, म्हणून स्वतःला जोडीदाराच्या अपेक्षेनुसार बदलवू नका.


हर्षदा पिंपळे


(नेहा आणि निखिल)

…….आणि तिने त्याला आवडते म्हणून ती खणाची साडी नेसली. खरतरं तिला साडी वगैरे नेसायला बिलकूल आवडत नाही.हो आणि तिला चाफा आवडतो पण त्याला वाटतं तिच्या केसात मोगराच शोभून दिसतो. पण म्हणून काही तो तिच्याकडे तिने मोगराच माळावा असा अजिबात हट्ट करत नाही.

इतकच नव्हे तर तिने साडीच नेसावी असही तो बोलत नाही. तिला चाफा आवडतो तर तिने तो सहज माळावा. तिला ड्रेस आवडतो तर तिने ड्रेस घालावा. (उदाहरण म्हणून फूल वगैरे…. बाकी अशाच कितीतरी अपेक्षा रोजच्या जगण्यात असतात.त्यांना अनुसरूनच….) असं त्याचं अगदी प्रामाणिक मत.

तिने त्याच्या अपेक्षांप्रमाणे बदलावं असं त्याचं म्हणणं मुळीच नाही. याऊलट तिला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो , ज्या गोष्टी तिला स्वतःहून बदलाव्याशा वाटतात त्या तिने जरूर बदलाव्यात.कारण प्रेम हे कुठल्याही अपेक्षेनुसार होत नाही.आणि अपेक्षांनुसार होणाऱ्या प्रेमाला काय अर्थ आहे…??यामुळे तर प्रेम अपेक्षेनुसार वारंवार बदलत राहील. आणि याला प्रेम तरी कसं म्हणायच…???

प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी नेहा किंवा असा निखिल येतोच असं नाही.पण तो/ती आपल्याही आयुष्यात असावं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्याला आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती हवी असते.आपल्याला जे आवडतं ते ते करणारी व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते.

याचबरोबर आपल्या जोडीदाराने आपल्यावर भरभरून प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटतं.पण यासाठी या प्रेमासाठी जोडीदाराच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःत बदल करणं गरजेच आहे का…?? केवळ जोडीदाराने प्रेम करावं म्हणून स्वतःला बदलायच….?? प्रेम मिळवण्यासाठी त्याच्या अपेक्षेप्रमाणे चालत रहायच…?

का…आणि कशासाठी हा सगळा अट्टाहास..?

अगदी मान्य आहे की, नात्यामंध्ये थोडं तु थोडं मी असं समजून घेतलं तर सगळं काही सुरळीतपणे चालत राहतं. म्हणून कित्येक जोडपी एकमेकांना शक्य होईल तितकं समजून घेण्याचा प्रयत्न करतात.परंतु कित्येक जोडप्यांमध्ये अपेक्षांच ओझच प्रकर्षाने दिसून येतं.

अपेक्षांच्या ओझ्याखाली प्रेम केव्हा गुदमरुन जातं कळतही नाही. जोडीदाराने प्रेम करावं म्हणून एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच चढाओढ सुरू होते.पण यामध्ये प्रेम कुठे असते…?? असते फक्त ती अपेक्षा… आणि एक प्रकारची भीती…! सगळी धडपड खरतरं प्रेमासाठीच असते.

पण प्रेम मिळवण्यासाठी काही मर्यादा हव्यात नं…? आणि अपेक्षा पूर्ण केल्यावर प्रेम सिद्ध होतं का…?याऊलट एक अपेक्षा पूर्ण केली गेली की एकामागोमाग एक अशा अपेक्षा वाढतच जातात. आणि जर एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही तर खटके उडायला किंचितही वेळ लागत नाही. यामध्ये असलेलं प्रेमही विरून जातं.

स्वतःत बदल करणे निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु आपण का बदल करतोय…त्यामागील हेतू देखील तितकाच महत्त्वाचा असतो.असं प्रेम मिळवण्यासाठी कुणाच्या अपेक्षेनुसार स्वतःत बदल करणं कितपत योग्य आहे…? बदल करायचा असेल तर स्वतःला वाटतं म्हणून बदल करायला हवा.आपल्याला जर त्या अपेक्षा योग्य वाटत असतील, आपल्याला ते मान्य असेल, आणि त्यात आपण आनंदी असू तर निश्चित बदल केला पाहिजे.

सतत अपेक्षांच्या दबावाखाली येऊन प्रेमासाठी स्वतःत बदल करणे योग्य नाही. अशाने प्रेम प्रेम राहत नाही. सातत्याने तिथे अपेक्षांची ओझीच वहायला लागतात.
अपेक्षा नसतात असं नाही पण असल्या तरी त्यांना काही मर्यादा असायला हव्यात.

मान्य आहे की जोडीदार म्हणजे आपलं सर्वस्व असतं.त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो.अगदी त्याच्या/तिच्या म्हणण्यानुसार, अपेक्षांनुसार स्वतःला बदलायलाही तयार असतो.पण कुठे, केव्हा हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे.

नाहीतर कायम त्या प्रेमासाठी आपण जोडीदाराच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःला बदलत राहतो.आणि कळत नकळतपणे स्वतःच अस्तित्व, स्वतःची खरी ओळखच हरवून बसतो.स्वतःसाठी म्हणून काहीच बदल करत नाही. म्हणून त्याला वाटत असेल नं की आज पांढरा शर्ट घालावा तर त्याला तो खुशाल घालू द्यावा. तिला चाफा आवडतो तर तिला तो माळू द्यावा.

असही एकमेकांना आवडतं म्हणून आपण काही न काही करतोच.तिला नसेल आवडत तरी त्याच्या आनंदासाठी ती साडी नेसतेच.त्याला मोगरा कितीही आवडत असला तरी तिच्यासाठी तिच्या आनंदासाठी तो तिला चाफा आणून देतो.हे असं म्हणजे निव्वळ प्रेम…निव्वळ सुख!

एकमेकांच्या आनंदासाठी काही अपेक्षा पूर्ण कराव्याशा वाटतात तर त्या निश्चित करा.त्यासाठी थोडे बदल केले तर काही हरकत नाही. कारण प्रेम मिळवण्यासाठी उगाचच जबरदस्तीच्या अपेक्षा पूर्ण करत बसण्यात काहीच अर्थ नाही. हे हे केलं तरच तुला प्रेम मिळेल अशा अपेक्षांसाठी स्वतःला बदलणं अजिबात योग्य नाही.

त्यामुळे एकमेकांच्या आनंदासाठी स्वतःला काही करावसं वाटत असेल तर जरूर बदल करा.केवळ प्रेम मिळवण्यासाठी जोडीदाराच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःला बदलवू नका.आणि कोणतीही गोष्ट स्वतःच्या अंतरंगातून बाहेर यायला हवी.

जबरदस्तीने, कुणाच्या सांगण्यावरून, वाटण्यावरून नाही. त्यामुळे आनंद, प्रेम अपेक्षांमध्येच असतोच असं गृहीत धरू नका. त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. एकमेकांच्या आनंदासाठी,प्रेमासाठी केवळ निखळ मार्ग निवडायचा प्रयत्न करा.

आपल्या अपेक्षांप्रमाणे इतरांना बदलायला भाग पाडू नका.आणि इतरांच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःला बदलायला भाग पाडू नका. अपेक्षेप्रमाणे सतत बदलत राहिलात तर कधी कोमेजून जाल कळणारही नाही. त्यापेक्षा एकमेकांच्या कलाने घेतलं की प्रेम आपोआपच बहरत जातं…फुलत जातं… प्रेमाच्या व्याखेला तिथेच नवं उधाण येतं…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “जोडीदाराने तुमच्यावर प्रेम करावं, म्हणून स्वतःला जोडीदाराच्या अपेक्षेनुसार बदलवू नका.”

  1. Khup chan aahe ha lekh ज्यांनी पण हा लेख लिहिला आहे.
    तो खरच खूप महान आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!