अतिस्पष्टीकरण द्यायची सुरुवात झाली की लोकं आपल्याला समजून घेणं बंद करतात.
गीतांजली जगदाळे
अति स्पष्टीकरण देण्याची सवय ही एक समस्या असू शकते. मी अर्थपूर्ण संवादाबद्दल बोलत नाहीए, कधीकधी आपण जे पटवून द्यायचं ते सांगायच्या नादात काहीतरी वेगळंच बडबडत बसतो. त्याची तिथे गरज नसते आणि आपण अशाच पद्धतीने अतिस्पष्टीकरण देत राहिलो तर समोरचा देखील आपल्या बडबडीला कंटाळून जातो.
आपण आपल्या हेतूसाठी जबाबदार असतो, ना की स्पष्टीकरण देण्यासाठी. आपल्या माणसांना कधी स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि जे आपले नसतात त्यांना स्पष्टीकरण देऊन ही उपयोग होत नसतो, असं म्हंटल जात. पण खरं सांगायचं तर,काही ठिकाणी आपल्या माणसांना ही स्पष्टीकरण देण्याची गरज भासते.
कारण आपले काही निर्णय कितीही बरोबर असले तरी त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना ते चुकीचे वाटू शकतात,आणि आपण आपला point of view सांगितला की त्यांना ते पटवून देता येतं, म्हणूनच इथे स्पष्टीकरण देण्याची गरज लागू शकते. स्पष्टीकरण देणं चांगलंच !
पण काही लोकांना अतिस्पष्टीकरण देण्याची सवय असते. मानसशास्त्रानुसार, अतिस्पष्टीकरण देण्याची सवय त्या लोकांना असते, जे emotionally लोकांसोबत कनेक्ट होऊ पाहत असतात, जे स्वतः self doubt ने ग्रस्त असतात.
अतिस्पष्टीकरण देण्याने ते कनेक्ट होण्याऐवजी बरोबर त्याच्या उलट परिणाम होतात. लोकांनी समजून घेणं , किंवा भावनिकरित्या आपल्या जवळ येणं तर लांबच राहतं त्यापेक्षा लोक आपलं ऐकून घेणंच टाळायला लागतात.
उदाहरणार्थ, अतिस्पष्टीकरण देण्याची सवय असणाऱ्या माणसांना जवळपास ‘नाही’ बोलणं फारसं जमत नाही. त्यांच्या आवडीची कामे, कार्यक्रम असं काही असल्यास ती आनंदाने हो म्हणतात, पण जेव्हा आवडीचं काही नसेल तेव्हा त्यांना ‘नाही’ म्हणणं, फार अवघड जात. जसे की, समजा एखाद्या संध्याकाळी कुठे बाहेर कार्यक्रमाला जाण्यासाठी कोणी मित्र बोलवायला आला.
पण आपल्याला मात्र संध्याकाळच्या शांत वातावरणात घरीच वेळ घालवावासा वाटत असेल, पण त्या मित्राला हे कारण देणं म्हणजे अगदीच व्यर्थ किंवा पुरेसं कारण वाटत नाही . आणि त्यामुळे योग्य कारण देण्याच्या प्रयत्नात आपण त्याला, अरे मी आज मी खूप थकलोय, आणि मला आत्ता थोडं काम सुद्धा आहे, आणि उद्याही लवकर जायचंय आणि … आणि… आणि… असं बरंच काही सांगायला लागतो ज्याची तिथे गरजच नसते.समोरच्याला आपलं म्हणणं पटावं, आणि त्याला वाईट ही वाटू नये या प्रयत्नात आपण अतिस्पष्टीकरण देऊ लागतो.
अतिस्पष्टीकरण देण्याची गरज किंवा सवय ही आपल्या काही मानसिक जडणघडणीमुळे तयार होते. जसे की low self esteem असणाऱ्या व्यक्तींमध्ये ही सवय असते. आधी पाहिलेल्या उदाहरणानुसार कधी कधी आपल्याला वाटते समोरच्या माणसाला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे.
पण बऱ्याचदा त्याची गरज नसते. जसे की, आपण त्या मित्राला नम्रपणे , आपल्याला आत्ता बाहेर जायची इच्छा नाहीए , आणि घरीच राहण्याचं मन आहे असं सांगितलं तरी ते पुरेसं असतं. आणि काही ठिकाणी एक वाक्य सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्यास पुरेसं असत, आणि जर त्या माणसाला काही कळलं नसेल तरच स्पष्टीकरणाची गरज असते. आपल्याला आपले प्रत्येक निर्णय, मते, विचार स्पष्ट करत बसण्याची गरज नसते, हे लक्षात घेतलं तर अतिस्पष्टीकरणाला सुरुवातच होणार नाही.
तुमच्या कृती आणि निर्णयांना समर्थन देण्यासाठी त्याची भली मोठी पार्श्वभूमी तयार केली जाते. खरंच पार्श्वभूमीची गरज आपल्याला किती वेळा आणि किती गोष्टींमध्ये पडते, आणि आपण कितीदा ते करत असतो? त्या माणसाने ते विचारलेलं तरी असतं का? आणि त्या माणसाला ते सगळं ऐकून घेण्यात इंटरेस्ट तरी असतो का? हे आपल्या लक्षात येत नाही.
कोणी आपल्याला खोटं बोलतोय असं समजू नये, किंवा कोणत्याही प्रकारचं judge करू नये म्हणून आपण कित्तेक गोष्टींचं अतिस्पष्टीकरण देत बसतो. लोकांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला स्वीकारावं यासाठी आपण अति स्पष्टीकरण देत बसतो. पण याच्या उलट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतोय किंवा विचारतोय , त्याला काय उत्तर अपेक्षित आहे, आणि आपण काय बोलतोय हा सगळा विचार केला गेला पाहिजे.
म्हणजे जिथे जेवढं उत्तर द्यायला हवं तेवढंच आपण बोलू. आणि मुद्देसूद , पाल्हाळ न लावता बोलण्याच्या सवयीने इतर माणसे आपला रिस्पेक्ट तर करतातच, पण कोणत्याही गोष्टीबद्दल बोलायचं असल्यास आवर्जून आपल्याकडे येतात, कारण आपल्या मुद्देसूद आणि स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
nice
Mast
Chhan
Khup chhan