Skip to content

पतीचा किंवा पत्नीचा बाहेर कोणाशीतरी संबंध आहे या अवास्तव विचारांपासून स्वतःची सुटका करा.

पतीचा किंवा पत्नीचा बाहेर कोणाशीतरी संबंध आहे या अवास्तव विचारांपासून स्वतःची सुटका करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


लग्न ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. समाजतही लग्नाला एक वेगळे स्थान आहे. दोन व्यक्ती एकमेकांना ओळखत असल्या, प्रेम असले तरी देवाच्या साक्षीने तसेच कायद्याच्या चौकटीत पालन करून त्यांचे लग्न लावून दिले जाते तेव्हा त्यांना त्याला अधिकृत तसेच पवित्र मानलं जातं. समाजमान्य मानलं जातं.

असे म्हणतात की नवरा-बायकोच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तसच त्या सात जन्मीच्या असतात. त्यासाठी वेगवेगळी व्रतही केली जातात. पती-पत्नीचे एकमेकांवर असलेले प्रेम, त्यांच्याविषयीचा आदर, एकमेकांचा सहवास अखंड लाभू दे अशी इच्छा दर्शवण्याकरता या सर्व प्रार्थना असतात. त्यातून हे नातं बळकट होत असतं.

पण या सुखी संसार मध्ये ठिणगी पडते जेव्हा संशयाच बीज तयार होत. संशय जसा की माझ्या पत्नीचा किंवा पतीचा बाहेर कोणाशीतरी संबंध आहे, त्याच बाहेर कुठेतरी प्रकरण चालू आहे. अशा संशयाने अनेकदा चांगला हसता खेळता संसार खराब होतो. आता हे विचार जे बरेचदा अवास्तव असतात ते येतात कुठून? तर त्याला अनेक कारण आहेत. त्यातल एक कारण आपल्या व्यक्तिगत तसेच सामाजिक जडणघडणीत दडलेले आहे. अगदी पूर्वीपासूनच लग्न करताना मुलीला असे सांगितले जाते की नवरा पाण्यासारखा असतो कधीही हातातून निसटू शकतो. त्यामुळे तुला मुठीत ठेवलं पाहिजे तसेच बायकोला घरातच राहिले पाहिजे.

लग्न झाल्यावर परपुरूषाशी बोलण हे चांगले संस्कार नाहीत. अशी बीज अगदी आधीपासूनच रुजवली जातात व तीच पाहत आपण सर्व मोठे झालेलो असतो. त्यामुळे माणूस वरून किती आधुनिक झाला तरी मनाच्या तळाशी हे विचार राहतातच. अशावेळी आपली पत्नी इतर कोणाशी तरी सहज बोलताना दिसली किंवा आपला पती फोनवर बोलताना आढळला, हसताना आढळला तर त्यावर संशय घेतला जातो. चारित्र्यावर बोट दाखवलं जातं. ज्यातून बाकी काही नाही तर नात्यावर वाईट परिणाम होतो.

कारण अनेकदा नवरा-बायको याविषयी काही बोलतच नाहीत मनातच गोष्टी ठेवून देतात आणि जेव्हा दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरून वाद होतो तेव्हा हे विषय खूपच वाईट पद्धतीने बाहेर पडतात. दोघेही एकमेकांच्या हालचालींवर विनाकारण संशय घेऊ लागतात. ते खरं तर तसं काही झालेले नसतं कारण वेगळीच असतात. ती समजून घ्यायला लागतात. म्हणून या अवास्तव विचारांपासून स्वतःची सुटका करायची असेल तर काही गोष्टी जाणीवपूर्वक करणं गरजेचे आहे.

१. मोकळा संवाद: संवाद ही कोणत्याही चांगल्या नात्याची किल्ली आहे. नवरा-बायकोच्या नात्यात तर संवाद खूपच गरजेचा आहे. म्हणूनच आपल्याला एखादी गोष्ट खटकत असेल किंवा लक्षात येत नसेल तर त्याविषयी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या कामाबद्दल, दिवसभरात काय काय झाले, आपला मित्रपरिवार, काम याविषयी नवरा बायकोमध्ये बोलणे झाले पाहिजे. आताच्या काळात संसार बसविण्यासाठी जिथे नवरा बायको दोघेही काम करतात तिथे एकमेकांना पुरेसा वेळच देता येत नाही. जिथे वेळ मिळत नाही तिथे बोलण तरी कसं होणार?

आणि म्हणून बरेचदा गैरसमज होतात. म्हणून मोकळा संवाद असला पाहिजे. कारण कितीही पैसे कमावले तरी ज्या गोष्टीसाठी आपण इतकी मेहनत घेतो तो संसार जर विस्कळीत होत असेल तर याचा काय उपयोग? म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवण, बोलण ठेवलं पाहिजे. यातून आपल्याला माणूस अजून चांगला समजतो.

२. आपल्या विचारांना तपासा: जस आधी म्हटलं आपल्या मनात आधीपासून काही गोष्टी रुजवल्या गेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपण विचार करतो. इथे ते विचार तपासले पाहिजेत. आपल्या लहानपणापासूनच चालत आलेल्या विचारा विरुद्ध एखादी गोष्ट घडली म्हणजेच बायकोने दुसऱ्या कोणाशी तरी बोलणे, नवऱ्याची मैत्री असणे तर त्याबद्दलचे पुरावे आपण गोळा करतो. म्हणजेच दिवसभरात कोणा कोणाशी बोलते, फोन चेक करणे, मागे जाण.

इथे आधी आपण जे विचार करत आहोत त्याला कितपत आणि काय पुरावा आहे हे पाहिलं पाहिजे. नुसत हसून बोलण म्हणजे काहीतरी असणार याला काय पुरावा आहे? नवऱ्याला दुसऱ्या एका बाईसोबत हॉटेलबाहेर पडताना पाहिलं म्हणजे त्या दोघांचं काहीतरी आहे असा विचार करणं याला काय पुरावा आहे? कदाचित ते दोघं कामानिमित्त पण भेटेल असतील. तर या बाकीच्या शक्यता कारण पण लक्षात घेतली पाहिजेत.

आता काळ बदललेला आहे. नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात, तसच दोघांचाही मित्रपरिवार असतोच. त्यामुळे त्यातून एकमेकांशी बोलणं आलं, फिरणं आलं. म्हणूनच आपल्या विचारांना लवचिक करता आलं पाहिजे. बायकोने नवऱ्याला सोडून इतर कोणाशी बोलणे चुकीचे आहे हे डोक्यातून काढल पाहिजे.

३. आपल्या पार्टनर वर नात्यावर विश्वास ठेवा: नातं चांगले ठेवायचे असेल तर त्यात पुरेशी मोकळीक ठेवायला लागते. तुम्ही जितका एकमेकांना बांधून टाकायचा प्रयत्न कराल तितका ते तुटत जात. यासाठी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पार्टनरचा, त्याच्या कामाचा इतर नात्यांचा आदर केला पाहिजे. पार्टनर वर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जी नात खराब करायला पाहतात, डोक्यात उलटसुलट विचार भरवतात. पण आपला आपल्या माणसावर विश्वास असणे गरजेचे आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही जर नीट बोलू शकाल.

अशा पद्धतीने आपल्या विचारांना योग्य प्रमाणात लवचिक करणे, नवरा-बायको सोबत मोकळा संवाद करणे, नात्यावर विश्वास ठेवणे या गोष्टी आपल्या चुकीच्या अवास्तव विचारांपासून सुटका मिळवून देऊ शकतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “पतीचा किंवा पत्नीचा बाहेर कोणाशीतरी संबंध आहे या अवास्तव विचारांपासून स्वतःची सुटका करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!