पत्नीला प्रेम मिळालं नाही तर ती compromise करेल, पण respect मिळाला नाही तर ती टोकाकडे जाईल.”
मधुश्री देशपांडे गानू
“आपला आत्मसन्मान हा आपल्या सर्व भावनांच्या सर्वोच्च स्थानी असायला हवा.”
या अर्थाचं इंग्रजी वाक्य नुकतंच वाचनात आलं. खरंच आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला आत्मसन्मान जपला जावा असं वाटत असतं. अगदी परिचित, कुटुंब, नातलग, मित्र-मैत्रिणी असो, कोणत्याही नात्यात मान देणे आणि घेणे ही नात्याची प्रथम गरज असते.
आपल्याला आपला आत्मसन्मान सगळ्यांनी जपावा, आपल्याला मानाने वागवावे असं वाटत असेल तर आपण ही सगळ्यांशी याच भावनेने वागायला हवं. जे तुम्हीं द्याल तेच तुमच्याकडे परत येतं.
आजचा विषय पती-पत्नीच्या नात्यावर आधारित आहे. मुळात अगदी भिन्न परिस्थितीत वाढलेल्या आणि स्वभाव, संस्कार, गुणदोष, आवडी-निवडी, विचारधारा, विचार प्रक्रिया, दृष्टिकोन, व्यक्त होण्याची पद्धत, निर्णयक्षमता, सगळ्याच बाबतीत वेगळेपण, भिन्नता असणार्या दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र बंधनात बांधल्या जातात.
मग ते love marriage असो नाहीतर arranged marriage. लग्न ठरल्यानंतरचे काही दिवस आणि लग्न झाल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस हे छान, गोड गोड, सुंदर असतात. पण हळूहळू संसारात रमताना संसारातील कर्तव्यं, जबाबदाऱ्या निभावताना,
नित्य नव्या अनुभवांना एकत्र सामोरे जाताना एकमेकांचा खरा स्वभाव कळू लागतो. प्रेम, राग, रुसवा, वाद-संवाद सगळ्याच भावना मोकळेपणे व्यक्त होऊ लागतात. पत्नी नोकरी, व्यवसाय करणारी असो अथवा गृहिणी तिच्या सहभागाशिवाय काहीच शक्य नसतं. भारतासारख्या देशात तर बहुतेक लग्नं ही घरातील ज्येष्ठ मंडळी ठरवतात.
आपल्या मनासारखा, इच्छे सारखा दिसणारा, वागणारा जोडीदार बहुसंख्य जोडप्यांना मिळालेला नसतोच. तरीही मनापासून समरसून कर्तव्य बजावत संसार होतातच. पती आणि पत्नीमध्ये प्रेमाची भावना नसली तरीही एकमेकांना सांभाळत, एकमेकांच्या साथीने, सामंजस्याने हजारो संसार यशस्वी होतात.
पती आणि पत्नी दोघांचीही संसारातील गुंतवणूक समान असते. असायलाच हवी. दोघांनी फक्त पैसा कमवून आणला म्हणजे संसार होत नाही. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र स्त्री असो अथवा गृहिणी तिला संसारातील अनेक जबाबदाऱ्या, अनेक आघाड्या सांभाळायच्या असतात. आणि बहुतेक स्त्रिया त्या उत्तम सांभाळतात.
आले गेले पाहुणे, नातेवाईक, त्यांचे मान-अपमान, मुलं, मुलांचे शिक्षण, मुलांवर उत्तम संस्कार अशा अनेक आघाड्या “स्त्री” पत्नी म्हणून, सून म्हणून लीलया सांभाळते. पती-पत्नी दोघांनाही अनेक वेळा मनाला मोडता घालत तडजोडी कराव्या लागतात. आवड बाजूला ठेवून कर्तव्य करावं लागते. तरच संसार सफल होतो.
एक उदाहरण घेऊ. लग्नाला तीस वर्षे झाली आहेत. पत्नी उत्तम गृहिणी आहे. घर-दार, मुलं-बाळं उत्तम आहे. जगाच्या दृष्टीने सुखाचा संसार आहे. पण पत्नी गृहिणी आहे. ती नोकरी करून पैसा कमवून आणत नाही म्हणून केवळ तिच्या पतीच्या दृष्टीने तिची किंमत शून्य आहे. “संसार माझा आहे. तुझं संसारात काय contribution आहे?? जे काही आहे ते माझं आहे. मी मिळवले. मी केलंय.” हे त्या पत्नीला पतीकडून सलग तीस वर्षं रोज ऐकावे लागत आहे.
याचा परिणाम म्हणून पत्नीने आत्मविश्वास गमावला आहे. नैराश्यग्रस्त झाल्यामुळे तिला मानसोपचार घ्यावे लागत आहेत. ही सत्य घटना नुकतीच अभ्यासली आहे. एका पत्नीसाठी तिच्या तीस वर्षांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गुंतवणुकीसाठी जर असं बोललं गेलं तर तिच्या मनावर केवढा आघात झाला असेल. केवळ कमावती पत्नी असेल तरच तिला मान??
पतीचं आपल्यावर प्रेम नाही हे मान्य करूनही, सहन करूनही एक स्त्री निष्ठेने, ताकदीने, मुलांकडे बघून, स्वतःचा हक्क म्हणून, कर्तव्य म्हणून संसार करत राहते. पण संसारातील तिच्या अस्तित्वाचाच सन्मान होत नसेल, तिचं अस्तित्व नाकारले जात असेल तर ती कशी सहन करणार?? आणि का?? अशावेळी एखादी निर्णयक्षम, समर्थ स्त्री या नात्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. घटस्फोट घेऊन मोकळी होईल.
नाहीतर आज सोशल मीडियाच्या भडिमारामुळे सगळं काही सहज उपलब्ध होत असताना तिने बाहेर आसरा शोधला तर??? आणि यामुळे तिची शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशी ही एक केस कालच पाहण्यात आली आहे. आज सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीमुळे नैराश्यग्रस्त होऊन मानसोपचार घेणार्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे.
पती आणि पत्नी हे समान पातळीवर परस्परपूरक आहेत. कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. रक्ताचं नसूनही सर्वात जवळचं नातं आहे खरं तर हे. परस्परांविषयी प्रेम, विश्वास, आत्मीयता, काळजी, स्नेह, आदर, मोकळीक हे सगळे आयाम हवेतच. एकमेकांचा आत्मसन्मान जपणं तर सर्वात महत्त्वाचं.
एकमेकांना आधार देणं, समजून घेणे, मतभिन्नतेचाही मान राखणं, क्षमा मागणे, क्षमा करणे हे सारं फार फार गरजेचे आहे. केवळ स्त्री आणि पुरुष असं न मानता एक स्वतंत्र माणूस म्हणून दोघांचाही सन्मान व्हायला हवा. तर आणि तरच पती-पत्नीचं हे पवित्र नातं टिकेल, फुलेल, बहरेल. प्रत्येक पुरुषाने असा विचार करायलाच हवा की जर माझ्या पत्नीने मला सन्मानाने वागवावे असं मला वाटतं तर मीही तिचा सर्वतोपरी सन्मान करायला हवा.
हे नातं असं आहे की भांडणं होतात, वाद होतात, रुसवेफुगवे होतात, गैरसमज होतात पण ते वेळीच बोलून, समजावून शांतपणे सोडवलेही जातात. एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं हेही आवर्जून करायला हवं. आपल्या समाजात पुरुषी अहंकार फार आहे. स्त्री ही भोग्य वस्तू आहे असं सरसकट मानलं जातं.
यामुळेच आज आधुनिक शहर असो किंवा गाव, खेडं, स्त्री अशिक्षित असो किंवा सुशिक्षित तिच्याकडे याच संकुचित, दूषित नजरेने पाहिले जातं. मग समाजात प्रतिष्ठित, सन्माननीय, यशस्वी व्यावसायिक, उच्च पदाधिकारी, गृहिणी असणाऱ्या स्त्रियांही घरगुती हिंसाचाराला सहज बळी पडतात..
यासाठी मुळात प्रत्येक स्त्रीने स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची नितांत गरज आहे. ती स्वतः याबाबत जागरूक, समर्थ हवी. काय, का आणि किती सहन करायचं?? किंवा करायचं नाही हा निर्णय घेण्यासाठी ती सक्षम आहेच. असायला हवी. यासाठी समाजमन, सामाजिक बांधणी, दृष्टिकोन मुळातूनच बदलण्याची आज आवश्यकता आहे. तरच स्त्रीला योग्य सन्मान मिळेल. फक्त देवी म्हणून मंदिरात तिची पूजा न करता प्रत्यक्ष जीवनात तिला मानाचे स्थान मिळेल.
संसार हा पती-पत्नी दोघांसाठीही समान गुंतवणुकीचा असायला हवा. दोघांनीही कोणताही अहंभाव न बाळगता एकमेकांच्या साथीने, प्रेमाने संसार आणि आयुष्य आनंदाने, सुखाने बहरण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही दोघांची समान जबाबदारी आहे.. हो ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप सुंदर लेख आहे
पण स्त्रीला कित्ती दिवस शोशिक म्हणून बघणार,
या वागणुकीचा परिणाम खरचं सुखी जीवन होवू शकेल का?
One sided article
हो खरंच छान आहे. पण हे स्री आणि पुरुष दोघांना applied आहे. फक्त पतीने पत्नीचा रेस्पेक्ट करायचं आणि पत्नी ने नाही.
True, nice 👍
Any writing should not be one sided.
Apratim
proud of you that you are my daughter in law.
खूपच सुंदर वाटला हा लेख.अगदी बरोबर विचार मांडले आहेत या लेखात.
खूप छान
अगदी काळजाला भिडणारा लेख आहे खूप सुंदर
Very nice