Skip to content

सत्र तिसरे :- वजन वाढण्याची विकृती (Anorexia Nervosa)

(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)


सत्र तिसरे :- वजन वाढण्याची विकृती (Anorexia Nervosa)


या विकृतीलाच इंग्रजीत Anorexia Nervosa असे नाव आहे. हा Eating Disorder (खाण्यासंबंधित विकृती) या विकृतीचाच एक प्रकार आहे. तरुण-तरुणींमध्ये ही विकृती जडण्याची शक्यता दाट असते. वय वर्ष १४ ते १८ ही या विकृतीची सुरुवात होण्याची ‘हाय रिस्क एज’ मानले जाते. हा मानसिक आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. या विकृतीने ग्रस्त असणा-या व्यक्तींना वजन वाढण्याची अवास्तव आणि अवाजवी भिती असते. तसेच वास्तविक जाड नसतानाही आपण जाड आहोत अशी त्यांची कल्पना असते. त्यामुळे वय आणि उंचीनुसार जरी त्यांचे वजन नॉर्मल असले तरी त्यांना आपण आणखी वजन कमी करायला हवे असे सारखे वाटत राहते.


केस :
प्राजक्ताने (वय १६, उंची ५.३, वजन ३६ किलो) नुकतीच १०वी ची परीक्षा दिली आहे. ती फारच जाड आहे अशी तिची समजूत आहे. त्यामुळे ती सतत स्वतःच्या वजनाबाबत अतिशय चिंताग्रस्त असते. जेवणाचे टेबल म्हणजे प्राजक्ताच्या घरात एक रणांगनच असते. कारण तिच्या कमी जेवणावरून तिचे दररोज आई-वडिलांसोबत प्रचंड भांडणे, वादविवाद होतात. खाण्या-पिण्यावर तर ती अवाजवी नियंत्रण ठेवतेच, परंतु तेवढ्याने तिचे समाधान होत नाही. ती व्यायाम म्हणून दररोज दिवसातून तिन वेळा पोहायला जाते. खरेतर दोन वर्षापूर्वी तिचे वजन ५० किलोच्या आसपास होते, पण असे सर्व प्रयत्न करून प्राजक्ताने तिचे वजन ३६ किलोवर आणले आहे. पण एवढे सर्व करूनही आपण पाहिजे तितके बारीक़ नाही असे तिला वाटते. म्हणुनच अलीकडे तिने पोहण्याबरोबरच व्यायामाला जाण्यासही सुरुवात केली आहे. तिचे हे सर्व रूटीन चालू असताना कित्येक वेळा तिला भूक लागते, प्रचंड थकवा जाणवतो व चिडचिड होते. पण तरीही कशालाही न जुमानता ती तिचे डाएटिंग वा व्यायाम यांच्या रूटीनमध्ये जराही खंड पडू देत नाही. या सर्वांचा तिच्या अभ्यासावर तर परिणाम होतोच आहे पण आता तब्येतीवरही गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. तिने fashion designing किंवा ग्लोबल वर्ल्डमध्ये आईसारखं करियर करावं अशी स्वप्नं तिच्या आईवडीलांची आहेत. आज प्राजक्ताचे वय २८ वर येऊन पोहोचले आहे. एकेकाळी सुंदर, आकर्षक शारीरिक ठेवण असलेल्या प्राजक्ताला आज दिवसातून ५ वेळा calsium च्या गोळ्या खाव्या लागत आहेत. कारण तिला आता भूकच लागत नाही. नातेवाईक तसेच मित्र परिवारांनाही प्राजक्ता पटकन ओळखता येत नाही. इतक्या प्रमाणात शरिरावरील हाडे दिसू लागली आहेत. अशा या fashion designing च्या पाय-यांचे स्वप्न भंग होऊन इस्पितळाच्या पाय-या चढत असलेल्या प्राजक्ताला हरवलेली शारीरिक सौंदर्यता किंवा निदान सामान्य सौंदर्यता तरी लाभेल का ? कोण जाने !


क्षणे :

या विकृतीमध्ये आणि डिप्रेशनमध्ये भुकेच्या बाबतीत फार मोठा फरक आहे. तो म्हणजे डिप्रेशनमध्ये व्यक्तीला खरोखरच कमी भूक लागते, किंबहुना भूकच लागत नाही, तर या विकृतीमध्ये मात्र भूक लागुन व इच्छा असून देखील खाल्ल्याने वजन वाढेल म्हणून केवळ व्यक्ती कमी खाते.
१) वजन कमी करण्याची नवनवी उद्दिष्टे ते स्वतःपुढे आणतात. अगदी हाडं दिसण्याएवढे वजन कमी झाले तरी ते डाएटिंग करणे चालूच ठेवतात.
२) व्यायामाबद्दल त्यांच्या ठिकाणी एकप्रकारचा अतिरेक असतो. ते ठरवतील तेवढा व्यायाम एखाद्या दिवशी जरी काही कारणाने झाला नाही, तरी अशा व्यक्तींना अतिशय अस्वस्थ वाटते.
३) वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर करणे, मुद्दाम उलटी काढ़ने असे प्रकारही दिसून येतात.
४) असे व्यक्ती स्वतः जरी खात नसले तरी इतरांसाठी पंचपक्वानाचे जेवण बनवतात, इतरांच्या खाण्याबाबतीत असामान्य असा रस घेतात.
५) काही केसेस मध्ये विचित्र लक्षण म्हणजे जेवताना पोळीचे अगदी छोटे-छोटे तुकडे करून खाणे व काहीही खाण्यापूर्वी ते मोजुन मापून खाणे.
६) भुकेच्या नियंत्रणाचा ताबा सुटला की अशा व्यक्ती इतरांपासुन लपवुन गुपचुप खातात.


कारणे :

या विकृतीमध्ये काही मानसिक कारणे महत्वाची ठरतात. बहुतांश केसेसमध्ये विकृतीची सुरुवात पौगंडावस्थेत (adolescent) होते. यादरम्यान मनोशारीरिक पातळीवर महत्वाचे बदल घडत असतात. पौगंडावस्थेतील मुलांचे सामाजिक स्थान अस्पष्ट असते. म्हणजे मूल लहानही नसते आणि तितके मोठेही नसते. अशामुळे आपल्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत, आपण कसे वागावे, कसे नको इ. सारख्या अनेक बाबतीत मुलांचा गोंधळ उडतो. याचा एक परिणाम म्हणजे या वयातील मुलांना स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होते, परंतु कौटुंबिक ताण-तणाव, घरात अगदी कड़क शिस्त किंवा मुलांना अति जपणे इ. गोष्टींमुळे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड विकृत पद्धतीने व्यक्त होवू शकते. य़ा विकृत व्यक्तींचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे त्यांना खाण्यावर बंधन ठेवणे, काटेकोरपणे व्यायाम करणे यामध्ये आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, याचे प्रचंड समाधान वाटते. मित्र मंडळीने आपल्याला स्विकारावे ही पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे प्रचलित fashion चा या मुलांवर खुप प्रभाव असतो आणि ज्या संस्कृतीमध्ये बारीक म्हणजे आकर्षक असे समीकरण असते, तेथे वजनाबाबत मुले-मुली (विशेषतः मुली) अधिक दक्ष असल्याचे दिसून येते. तसेच काही जैविक कारणही असू शकते. जसे मेंदूतील सेरोटोनिन रसायनाची कमतरता आणि मेंदूतील हायपोथालेमस या भागातील बिघाड ही या विकृतीची शारीरिक पातळीवरील कारणे असु शकतात.


उपचार :

१) प्रथमतः या विकृतीची मुळ कारणे ही पौगंडावस्थेत जन्मली गेलेली असल्याने केस स्टडी मार्फत संपूर्ण माहिती प्राप्त करून त्याची जाणीव ही पालकांना आणि व्यक्तीला करून दिली जाते.
२) अशा व्यक्तींच्या मनात सतत अतार्किक विचार त्यांना खात असतो, त्याचा वास्तवतेशी काय संबंध आहे का ? याबद्दल व्यक्तीला मर्मदृष्टी प्राप्त करून दिली जाते.
३) अशा व्यक्ती स्वतः ला वारंवार आरशात पाहत असतात, तर काही आरशात पहायला घाबरतात, अशा विविध गोष्टी, घटनेकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोण बदलला जातो.
४) जराही काही खाल्ले की माझे वजन वाढते, अशी तक्रार त्यांच्या ठिकाणी असते, नक्की त्यामधला गुंतागुंत त्यांना समजावून सांगावा लागतो.
५) या विकृतीमागे जैविक कारण आहे, जर असे निदान झाले तर औषधोपचारामार्फत यावर नियंत्रण ठेवता येते.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते 

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !

1 thought on “सत्र तिसरे :- वजन वाढण्याची विकृती (Anorexia Nervosa)”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!