Skip to content

अति लक्ष दिल्यामुळे सुद्धा एखादं नातं उध्वस्त होतं.

अति लक्ष दिल्यामुळे सुद्धा एखादं नातं उध्वस्त होतं.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


काही नाती अति लक्ष देण्यामुळे तुटतात, तर काही अजिबात लक्ष न दिल्याने. काही माणसे मुळातच इतरांपेक्षा प्रेमळ असतात, आणि ते जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात तेव्हा कोणत्याच मर्यादेचा विचार न करता, स्वतःचाही विचार न करता त्या माणसासाठीच सगळं करू लागतात.

ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्यांनी आपलं सगळं आयुष्यच व्यापून टाकलंय अशी भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे या व्यक्ती त्या माणसाच्या प्रेमात इतके गुंतून जातात की स्वतःला विसरून सगळं काही त्या माणसाच्या आवडीनिवडीनुसार करू लागतात. आपलं सर्व लक्ष , वेळ, सगळं काही त्या माणसासाठी अर्पण करून टाकतात.

पण प्रत्येक माणसाचं असं नसत. आणि असं नसत म्हणजे तो आपल्यावर प्रेम करत नाही असं देखील नसत. कारण प्रत्येक गोष्ट एका मर्यादेतच ठीक असते, अगदी आपण आपल्या पार्टनरला , आपल्या नात्याला देणारं लक्ष देखील एका मर्यादेतच असावं, अति नसावं.

नात्यात कधी ना कधी अशी जाणीव होते की आपण जितकं या नात्यासाठी करतोय तितकं समोरच माणूस करत नाहीए. आणि कदाचित आपण सामान्य माणसांपेक्षा जास्तच झोकून देऊन या नात्याला सगळं देतोय. आणि कधी कधी काही माणसे याची कदर करीत नाहीत असं जाणवतं. त्यांना स्वतःला तर इतकं जमत नाहीच पण आपण एवढं करतोय याचीही त्यांना किंमत राहत नाही असं वाटू लागत.

नाती उध्वस्त होण्याची बरीच कारणं असतात. त्यातलंच एक कारणं अति लक्ष देणे हे ही आहे. आता अति लक्ष देणे यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आपल्या पार्टनरलाच आपलं जग मानून, जे काय आपलं आहे ते तोच/तीच आहे असं मानून जगणे. आणि असं मानून चालल्याने आपल्या आयुष्यात खुप मोठा बदल होतो हे खूप लोकांच्या लक्षात ही येत नाही.

जो बदल होतो त्यात आपलं संपूर्ण अस्तित्व विसरून, प्रत्येक गोष्टीत पूर्णपणे, अगदी निर्णयात गरजेपेक्षा जास्त आपल्या पार्टनरचा विचार आपण करू लागतो, कधीकधी स्वतःवर अन्याय ही करतो. ते म्हणतात ना, लोक तुम्हाला कसं बघतात हे तुम्ही स्वतः ला कसं बघता यावर अवलंबून असत.

आपण स्वतःची रिस्पेक्ट केली तर लोक आपली रिस्पेक्ट करतात. त्याचप्रमाणे तुम्ही गरजेपेक्षा आपल्या नात्याला किंवा पार्टनरला दिलेल्या अटेंशन मुळे त्याच्या नजरेत आपली इमेज बदलून नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण अशा वेळी तुम्ही इतकं लक्ष नात्याकडे किंवा त्या माणसाला देत असता की तुम्हाला स्वतःकडे बघायला, स्वतःकडे लक्ष द्यायला फुरसतच मिळत नाही. आणि माणसाच्या गुणधर्मानुसार जो आपल्याला गरजेपेक्षा जास्त अटेंशन देतो, स्वतःपेक्षा महत्व आपल्याला देतो, स्वतःपेक्षा वर आपल्याला मानतो, जास्त प्रेम करतो, काळजी करतो अशा माणसाला आपण कधी ना कधी आयुष्यात गृहीत धरायला लागतो.

आणि आता अति लक्ष देण्याचा दुसरा प्रकार बघू.. तो म्हणजे आपल्या पार्टनरच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीत गरज नसताना नाक खुपसणे, तो/ती कोणाशी बोलतात , कोणाशी कसे वागतात, आणि असेच का वागतात आणि तसेच का बोलतात , हा विचार करत बसणे, याविषयी त्यांच्याशी वाद घालत बसणे. यामुळे ही नात्यात प्रॉब्लेम्स निर्माण होऊन नातं तुटण्याची वेळ येते.

कारण इथे देखील तुम्ही अति लक्ष घालून छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये काहीतरी संकट आहे अशा पद्धतीने गोष्टी बघू लागता. कधी कधी अशा वागण्याने आपल्या पार्टनरला आपण संशय घेत आहोत असही वाटू लागते. आणि हे कारण देखील नात्याला तडा जायला पुरेसे ठरते.

अति लक्ष देणं याने इमोशनल थकवा येऊ शकतो. पहिला अति लक्ष देण्याच्या प्रकाराने आपला पार्टनर आपल्याला गृहीत धरू लागतो आणि दुसऱ्या अति लक्ष देण्याच्या प्रकारामुळे आपला पार्टनर फ्रस्ट्रेट होऊ शकतो. पण दोन्ही गोष्टींमुळे नातं नॉर्मल राहणं अवघड होऊन जातं.

निरोगी नातेसंबंधासाठी तुमचे 24/7 लक्ष असण्याची गरज नसते. तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा. त्याला त्याचा थोडा वेळ घेण्याची गरज आहे या गोष्टीची रिस्पेक्ट करा आणि तो वेळ तूम्हाला ही घेण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. आणि याने नातं चांगलं राहायलाच मदत होते. आपलं नातं टिकवण्यासाठी, फुलवण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज असते त्या गोष्टी करायची तयारी असली की नात्याला कधीही तडा जातं नाही.

अति लक्ष दिल्याने जे परिणाम दिसू लागतात त्याने एका पॉईंटला माणसाला हे प्रयत्न सोडून द्यावेसे वाटू लागतात, पण तो ज्याला प्रयत्न समजत असतो ते प्रयत्न नसून आपण उलट गोष्टीच नात्याला पुरवतोय हे लक्षात घ्यायला हवे. ‘अति तिथे माती’, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कोणत्याही ठिकाणी अति झाल्याने तिथे माती होते, ती गोष्ट खराबच होते.

त्यामुळे अशावेळी त्या माणसाची अति लक्षच काय नॉर्मल लक्ष देण्याची इच्छा ही निघून जायला लागते. आपण एवढं करून ही समोरचा माणूस असा वागतोय म्हंटल्यावर मन नाराज होत. पण अति लक्ष देणाऱ्या पार्टनरने ही हे समजून घ्यायला हवं की आपण कितीही एका माणसावर प्रेम करत असलो तरी प्रत्येकाला ज्याची त्याची स्पेस असण्याची गरज असते.

एका पॉईंटला आयुष्यात तुम्हाला ही जाणवेल की पार्टनर शिवाय सुद्धा आयुष्यात इतर गोष्टींमध्ये वेळ घालवणं महत्वाचं असत. आपला पार्टनर हा आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असू शकतो पण आपलं संपूर्ण आयुष्य असू शकत नाही.

आपण अति लक्ष देतोय का, हे कसे ओळखावे? नात्यात परस्पर (भावनिक) गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सतत “पाठलाग” करत आहात असे तुम्हाला वाटते. तुम्हाला हवे असलेले भावनिक कनेक्शन देण्यासाठी, तुमच्यासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी किंवा तुमच्या शारीरिक जवळीकमध्ये अधिक ऊर्जा घालण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराला सतत दबाव टाकावा लागत असल्यास, यामुळे कदाचित नाराजी होऊ शकते.

त्यामुळे वेळीच सावरून आपण जर योग्य ती पावलं उचलली असता आपलं नातं टिकू शकत. आणि नात्याकडे किंवा आपल्या माणसाकडे अति लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतःवर थोडं लक्ष दिल्यास आपल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “अति लक्ष दिल्यामुळे सुद्धा एखादं नातं उध्वस्त होतं.”

  1. फारच उत्तम लेख, डोळ्यात अंजन घालणारा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!