Skip to content

‘ति’ ला सुद्धा जगू द्या, हे असं नेहमी मागावंच का लागतं ??

‘ति’ची कैफियत …..


सपना फुलझेले

(नागपूर)


कधी तिच्या कपड्यावरून, कधी तिच्या हसण्या-बोलण्यावरून, कधी तिच्या येण्याजाण्याच्या वेळेवरून तर कधी, तिच्या मुक्त वावरण्यावरून सतत वावटळं का उठवली जातात?

आपला समाज हा म्हणायला तर पुरुष प्रधान आहे; पण या समाजाची सो कॉल्ड मर्यादा आणि इज्जत ही तिच्या चारित्र्यावर सतत शंकेचं त्रिशून उगरत का असावी?

आपल्या तथाकथित संस्काराचा आणि परंपरेचा जू तिच्याच मानगुटीवर का? त्यातून काय साध्य करायचं असतं? कुणाला पाठीशी घालायचं असतं? प्रत्येक वेळी कुणाचं वर्चस्व सिद्ध करायचं असतं? आपला समाज जर पुरुष प्रधान मानसिकतेचा पुरस्कार करण्यातच पुरुषार्थ समजत असेल तर, तिच्या कपड्यांच्या नुसत्या लांबी-रुंदीवरूनच आपल्या संस्कृतीचे हनन कसे काय होते… ही कोणती विचारधारा आहे जी कपड्यांनुसार बदलते?
काय वाटतं… ‘स्त्री’चे स्त्रीत्व आणि अस्मिता इतकी तकलादू आहे की, इतरांच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून रहावी. फक्त शरीरापुरती मर्यादित राहावी; पण मग एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून तिच्या अस्तित्वाचं काय? तीचं जगणं तिची स्वप्नं तिच्या भावनांचा काय?

एक जिवंत व्यक्ती म्हणून तिच्या स्वातंत्र्याच काय? तीचे स्वातंत्र्य हे अजूनही आभासच समजावं का? स्त्री-पुरूष लिंगभेद न जुमानता समाज निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या बोलघेवड्या समाजसुधारकांनो आहे कुठे ही समानता?

‘त्या’च्या आत्मप्रौढी मानसिकतेतून… ‘त्या’च्या मानसिक व्यंगतेच्या खच्चीकरणातुन… ‘ त्या’च्या हिंसक प्रवृत्तीतून तिच्यावर अन्याय होतात, हल्ले होतात. मग ते कौटुंबिक असो, सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो. तेव्हा कुठे असतात या समान अधिकारांच्या वांझोट्या गप्पा?

तिच्यावर होणाऱ्या प्रत्येक अमानवीय घटनेमागे तिच्या कपड्यांचे, तिच्या चारित्र्याचे मोजमाप करणाऱ्या स्वयंघोषित न्यायपंडितांनो कुठं जातो तुमचा विवेक? जेव्हा 4 महिन्यांच्या बालिकेपासून तर 40 वर्षाच्या प्रौढेवर ही अत्याचार होत असतो. जेव्हा लहान लहान शाळकरी मुली बसमध्ये प्रवास करत असताना नको त्या नजरेने, किळसवाण्या स्पर्शाने स्वतःला आकसून घेतात. जेव्हा भेदरलेल्या नजरेने आधार शोधत असतात तेव्हा तुमचा मर्दानी बाणा शेपूट घालून मुर्दाड का होतो? वासनेने बरबटलेल्या नजरांना त्या मुलीत स्वतःची मुलगी, बहिण का दिसत नाही?

जेव्हा एखादी रोजी, कुणी शन्नो आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी चौकात अश्लील हातवारे करत उभी असते तेव्हा तुमच्यातला पुरुषार्थ नेमका काय करत असतो ? किती जणांना तिची कीव येते. तिच्याबद्दल कणव वाटते. निराधार गरीब मुली, एकट्या असणाऱ्या विधवा किंवा परित्यक्ता असणाऱ्या स्त्रिया इतकंच काय तर मनोरुग्ण असणाऱ्या असहाय स्त्रिया. किती पुरुष त्यांना जबाबदारी म्हणून बघतात हा यक्षप्रश्नच आहे.

‘ती’ का कधीच अशी उद्विग्न आणि उत्तेजित होत नाही. पुरुषी देह बघून… आक्रमक किंवा हिंसक होत नाही. रस्त्यात, चौकात, गल्लीत, अर्धनग्न कपड्यात फिरणाऱ्या मुलांवर, पुरुषांवर, इतकंच काय तर रस्त्याने फिरणाऱ्या बाबा- बुआ, साधू किंवा इतर पुरुष कुणावरच का अन्याय होताना आढळत नाही? की सुडबुद्धीतून हल्ले होताना दिसत नाही. मग ‘त्या’च्याच बाबतीत हे का घडावं? खरं तर ही एक विकृती आहे गलिच्छ मानसिकतेची. स्त्री म्हणजे उपभोगाचे साधन समजणारे, वाहत्या गंगेत हात धुवायचा विचार करणारे, स्त्रीला फक्त एक चालून आलेली संधी समजणारे, विकृत मानसिकतेचे वासनेने बरबटलेले मेंदू स्वतः पुरुष असल्याचा अभिमान बाळगतात. भारतीय संस्कृतीचे रक्षक समजतात हीच मोठी शोकांतिका आहे. स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व न समजता तिला गुलामासारखे वागवणं.

तिला तिच्या मूलभूत अधिकारापासून, हक्कांपासून वंचित ठेवणारी ही परंपरा खूप घातक आहे.मूळात आज गरज तिचे कपडे बदलण्याची नाही, तर त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्याला पाठीशी घालणं सोडून डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. परंपरेच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली तिला बंदिस्त करण्यापेक्षा त्याला संयमाचे, चारित्र्याचे, निकोप दृष्टीकोणाचे महत्त्व पटवून देण्याची खरी गरज आहे. नुसत्याच समतोल साधायच्या वैचारिक गप्पांची गरज नाही, तर त्याला कृतीची जोड असणेही गरजेचे आहे. लिंगभेदाच्या विषारी वृक्षाला खतपाणी घालण्यापेक्षा ते मूळातून कसं उपटता येईल याचे सखोल चिंतन करणे गरजेचे आहे.

समाजाचा सकारात्मक समतोल साधण्यासाठी कुणी एक वरचढ नाही तर दोघंही पूरक असायला हवेत. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला दुय्यम स्थान देऊन आदर्श समाजाची कल्पना करणे चुकीचेच नाही, तर निव्वळ बावळटपणाचे लक्षण आहे. अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर आत्मस्तुतीत मग्न असणाऱ्यांना राग आला असेल. येऊ दे! या रागाला विधायक कार्याची जोड दिली किंवा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व दिले तर आभाळाएवढा सन्मान ‘ती’च्या वाट्याला येईल. असो.


Online Counseling साठी !

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!