Skip to content

स्वत:ला समजून घेणं ही एकमेव श्रीमंती !!

स्वत:ला समजून घेणं..


एकाकीपणा म्हणजे कायम कोणासाठी तरी भीक मागत राहणं, कोणाची तरी कायम आठवण काढत राहणं. एकाकीपणा ही एक दु:खी अवस्था आहे. मात्र, एकटेपणा म्हणजे स्वत:ला शोधणं. स्वत:ला शोधण्यात एवढं वैभव आहे, एवढं सौंदर्य आहे, तो एवढा मोठा आशीर्वाद आहे की, मग कोणती इच्छाच उरत नाही.

स्वत:ला समजून घेणे ही एकमेव श्रीमंती आहे. एकाकीपणात हरवून गेलो तर आपल्याला भिकाऱ्यासारखं वाटू लागतं. आपला एकटेपणा शोधता आला, तर आपण ‘बुद्ध’ होऊन जातो.

‘‘व्यक्ती ही एक कल्पना आहे – संपूर्ण विश्व हे वास्तव आहे. आपण तर केवळ कमळाच्या पानावरच्या दवबिंदूसारखे आहोत. सकाळच्या उन्हात खूप सुंदर दिसणारा दवबिंदू; पण वाऱ्याची एक छोटीशी झुळूक येते आणि हा दवबिंदू निसटून महासागरात सामावतो. तो नष्ट होत नाही, तो तर केवळ असीम होतो, अनंत होतो. एक दवबिंदू म्हणून तो कधी ना कधी नष्ट होणारच होता. एक व्यक्ती म्हणून आपण सगळेच एक दिवस नाहीसे होणार आहोत. आपली अनंतातली मुळं शोधून काढायची असतील, तर नाहीसे होण्यापूर्वी, एक आनंदाने आणि आशीर्वादाने भरलेले आयुष्य, एक कृतज्ञता आणि प्रार्थनेचे आयुष्य जगणे हाच एक मार्ग आहे. मग ती मुळं तुमच्या इतक्या जवळ, आवाक्यात येतील की, तुम्हाला ती शोधण्यासाठी कुठेच जावं लागणार नाही. काळाच्या पोटातही शिरावं लागणार नाही किंवा अन्यत्र कुठे फिरावंही लागणार नाही.’’

‘‘हा एक क्षण, ज्यात तुम्ही अवघ्या विश्वाचा श्वास घेत आहात, तुमच्या हृदयाचे ठोके या विश्वाशी सुसंगती ठेवून पडत आहे; याच क्षणाला तुमच्या मुळांची विश्व जोपासना करत आहे. तुम्ही ते ‘आत’ डोकावून कधी पाहिलं नाही एवढंच आणि तुम्ही उगाचच छोटय़ा गोष्टींसाठी भीक मागत राहता. तुम्हीच सम्राट असूनही भीक मागत राहता. तुमच्या ‘आत’ असलेलं वैभव कल्पनेच्या पलीकडचं आहे, तो खजिना मोजणीच्या पलीकडचा आहे. फक्त एकदा तुमच्या ‘आत’ कटाक्ष टाका आणि तुमच्या अस्तित्वाचं एक नवीन अंग खुलं होईल आणि तेच तुमचं वास्तव आहे, अस्सल वास्तव. ते इतकं आशीर्वादाने आणि हर्षांने भरलेलं आहे की, एकदा त्याची लज्जत चाखलीत तर ती कायम तुमच्या मनात राहील.’’

प्रत्येक जण ‘बुद्ध’ आहे..

‘‘झेनच्या भाषेत सांगायचं तर याला बुद्धाचा अनुभव म्हणतात. प्रत्येक जण ‘बुद्ध’ आहे. काही जण फक्त बाहेरच्याच गोष्टी बघत राहतात; त्यामुळे त्यांना त्यांच्या ‘आतल्या’ खजिन्याची आणि ऐश्वर्याची जाणीवच होत नाही. काही बुद्ध आतमध्ये डोकावून बघतात आणि ते अचंबित होतात: तुम्ही जे काही बाहेर शोधत होतात, ते किती क्षुल्लक होतं, खरा खजिना तर तुमच्या आतच आहे आणि तुम्ही तो घेऊनच जन्माला आला आहात- त्यात तुम्ही प्राप्त करावं असं काहीच नाही, त्याला केवळ मान्यता देण्याची गरज आहे, त्याचं स्मरण करण्याची गरज आहे. तो एखाद्या विस्मृतीत गेलेल्या भाषेसारखा आहे.’’

‘‘झेनचा सारांश एका छोटय़ा व्याख्येत करता येईल- झेन तुम्हाला विसरलेली भाषा शिकवतो. तो तुम्हाला आतल्या जगाची भाषा शिकवतो. याच्या पायऱ्या खूप सोप्या आहेत; कोणतीच गुंतागुंत नाही. यासाठी तुमच्याकडे खूप बुद्धिमत्ता असण्याची गरज नाही, तुमच्याकडे जर काही हवं असेल तर ते आहे थोडंसं धैर्य.. तुम्हाला बाहेरच्या जगात घेऊन जाणाऱ्या सर्व इच्छा विसरण्यासाठी लागतं ते थोडंसं धैर्य; हा आतला प्रदेश अज्ञात आहे, ही वाट आपण कधी तुडवलेली नाही. सुरुवातीला हा प्रदेश खूप काळोखा वाटेल आणि तुम्ही त्यात खूप एकटे असाल.’’

सिंह होण्याची हिंमत ठेवा..

‘‘बहुतेक लोक आयुष्यात कधी तरी आतमध्ये डोकावून बघतात, पण ते तत्काळ बाहेर येतात आणि पुन्हा बाहेरच्या जगातच राहतात. त्यांना कळपातलं मेंढरू होऊन जगणं खूपच सवयीचं झालेलं असतं. सिंह होण्याची, एकटं राहण्याची हिंमत त्यांच्यात नसते. त्यांना एकटेपणातलं सौंदर्यच कळत नाही; त्यांना एकाकीपणा आणि एकटेपणा यातला फरकच कळत नाही.’’

‘‘एकाकीपणा म्हणजे कायम कोणासाठी तरी भीक मागत राहणं, कोणाची तरी कायम आठवण काढत राहणं. एकाकीपणा ही एक दु:खी अवस्था आहे. मात्र, एकटेपणा म्हणजे स्वत:ला शोधणं. स्वत:ला शोधण्यात एवढं वैभव आहे, एवढं सौंदर्य आहे, तो एवढा मोठा आशीर्वाद आहे की, मग कोणती इच्छाच उरत नाही. अगदी मेघ तुमच्या पायाखाली उतरतात, दूरवरचे तारेही अवचित तुमच्या जवळ येतात, कारण तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या अधिकाधिक समीप जाऊ लागता.’’

स्वत:ला समजून घेणं ही एकमेव श्रीमंती

‘‘स्वत:ला समजून घेणाऱ्याला एक गोष्ट समजते. ती म्हणजे आपण म्हणजे केवळ एका विस्तृत आणि असीम विश्वाकडे घेऊन जाणारं एक कवाड आहोत; अनंतापर्यंत आणि अमर्त्यांपर्यंत जाणारा दरवाजा आहोत. यातला विरोधाभास म्हणजे ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला ओळखता, त्या क्षणी तुम्ही स्वत: उरतच नाही, उरतं ते केवळ विश्व. तो दवबिंदू नाहीसा होऊन जातो आणि भोवताली असतो तो केवळ महासागर.’’


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

सौ. पाटील यांनी online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा

7 thoughts on “स्वत:ला समजून घेणं ही एकमेव श्रीमंती !!”

  1. सुजाता

    लेख छान आहे. पण आत डोकावून पाहण्याची पद्धत सांगितली, शिकवली तर लेखाचा उपयोग होईल असे वाटते. अजून सोप्या भाषेत समजावले तर योग्य असेल असे मला वाटते. आत डोकावण्याच्या वाटा कोणत्या। ते लिहिलेत तर छान वाटेल…. स्वतः म्हणजे एकांत मधे रडणं नाही हे पटते पण संसारात राहून स्वतःला समृद्ध कसे करायचे….

  2. लेख खुप छान लिहीला आहे. प्रेरणादायी आहे

  3. Narendra pednekar

    छान….पण आत पहायची पद्धत नक्की कशी आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!