Skip to content

नवरा जेव्हा कॉलेजच्या मैत्रिणीकडे आकर्षित होतो….

नवरा जेव्हा कॉलेजच्या मैत्रिणीकडे आकर्षित होतो….


दिपाली मुळे

इमेज कन्सल्टंट ॲण्ड लाइफ कोच,


निरभ्र ………झाले मोकळे आकाश

राकेश आणि निशा सुखवस्तू जोडपे… आज त्यांच्या मुलीचे विशाखाचे लग्न झाले. दोघेही भावुक झाले होते.वर्‍हाडी मंडळी आपापल्या घरी गेली. राकेश निशाही आपल्या कुटुंबासोबत घरी आले. सर्व आवरासावर झाल्यावर दोघेही गप्पा मारत बसले. मुलगा नितेश आणि सून पूर्वा ,नातू कार्तिक झोपायला गेले होते. बाकी कुटुंबीय देखील झोपले .झोप येत नव्हती म्हणून दोघं गप्पा मारत बसले.

राकेश निशा ला म्हणाला “आज आपण मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे झालो. संसाराचा हा टप्पाही पार पडला….. खरं सांगू निशा, तुझ्यामुळे हा प्रवास फार सोपा झाला.. माझा……”
निशा हसली,” अरे पण मी तर काहीच केले नाही. तूच केले सगळे. मी फक्त घर चालवले, मुलांना सांभाळणे जे काही केले ते तर माझं कर्तव्य होते नाही का?”

राकेश तिच्याकडे बघत होता तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला,” मला तुझ्याशी काही बोलायचं आहे फार महत्त्वाचे…..”
निशा म्हणाली,” बोल ना”

“मी तुझ्याशी खूप खूप चुकीचं वागलो आज मला फार वाईट वाटते आहे. आणि पश्चाताप होतोय त्याचा. मी कधी तुला नीट समजून घेतले नाही, तुला कधी पाठिंबा दिला नाही, तुझा कधी आधार झालो नाही, तुझे कधी कौतुकही केले नाही,तुझी बाजू घेतली नाही, नितेश ला कायम पाण्यात पाहत राहिलो. माझ्या आईवडिलांनी जसं मला केलं तसंच मी नितीशला याबाबतीत करत राहिलो त्याचा दुस्वास करत राहिलो .माझ्या अशा वागण्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे याची मला जाणीव आहे.

आज विशाखाला अतुलसोबत पाहिल्यावर जाणवलं की मुलीसाठी किती अवघड आहे स्वतःचे घर सोडून दुसऱ्याच्या घरी अनोळखी माणसात कायमस्वरूपी राहायला जाण, कोणाच्या तरी घरी घराला, माणसांना आपलेसे करणे. केवळ काही दिवसांच्या ,काही महिन्यांचा किंवा वर्षाच्या ओळखीवर ..खरंच मी मनापासून माफी मागतो तुझी माझ्या सर्व वागण्याबद्दल……..” राकेश अगदी मनापासून बोलत होता.

ती शांतपणे म्हणाली,” जाऊदे आता! मी केव्हाच विसरले आहे या सर्व गोष्टी……”

” तुझ्या मनाचा मोठेपणा आहे ग! तुला एक विचारू? खरं खरं सांगशील……… राकेशने तिचा हातात हात घेऊन विचारले .तिने मानेनेच होकार दिला…..” मी चुकलो….. चुकलो …..पण मी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी कडे आकर्षित झालो .तुझ्याशी खोटं बोललो ,वाईट वागलो ,तुला दुषणे दिली, तुझा विश्वास तोडला तुला माझा राग नाही आला? माझं तोंडही पाहू नये, सोडून जावू घटस्फोट घ्यावा असे एकदाही मनात नाही आले?” राकेश च्या डोळ्यात हा प्रश्न विचारताना पाणी तरळले .

निशा अजूनही शांत होती . काही क्षण जीवघेण्या शांततेत गेले. निशा बोलू लागली,” खरं सांगू राकेश, मला माझ्या प्रेमावर खुप भरवसा होता. स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास होता .ज्यावेळी मला हे कळलं की तू सोन्याला डेट करतो आहे माझं मन हे स्वीकार करायला तयारच नव्हते पण मग समोर आलेल्या गोष्टी डोळसपणे पाहिल्यावर ते मात्र स्वीकार करावेच लागले.

तेव्हा मात्र मी पूर्ण कोलमडले. माझं सगळं जग फक्त तू आणि मुलं एवढंच होतं ना रे!! लग्नानंतर तू आणि घरच्यांनी मला पुढील शिक्षणाला परवानगी दिली नाही, नोकरीही करू दिली नाही. तुमच्या सगळ्यांचा विरोध पत्करून मी ‘बुटीक’चालू केलं तेव्हा किती गदारोळ घातला होतास तू घरामध्ये ….आठवतय ना ?

माझ्या सगळ्या गोष्टी असहकार पुकारला तरीही मी ठाम पणे पुढे चालत राहिले. कि कधीतरी तुला तुझी चूक कळेल पण तू मात्र माझ्या या वागण्याचा वेगळा अर्थ काढला. तुझे आणि घरातील बाकी माणसांचे वागणे स्वभाव सारे मी न भांडता सहन केले. वाद नको मुलांवर वाईट संस्कार होतील म्हणून चुकीच्या गोष्टींना जाहीर प्रतिकार केला नाही .

पण तू मात्र माझ्या चारित्र्यावर कायम संशय घेत राहीलास आणि तुझ्या घरच्यांनी ही या सर्व गोष्टींना खतपाणी घातले .माझ्या माहेरच्यांच्या ही गोष्ट लक्षात आली होती पण तुला आणि तुझ्या घरच्यांना त्यांच्याशी नीट बोलायचं देखील नसायचे ते आलेले आवडत नसायचे मग त्यांनी तुला कसे काय समजून सांगायचे होते हे म्हणजे जरा अवघडच होते. मग काय करणार होते मी ?तुला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तुला ते आवडत नव्हते मग मीच स्वतःमध्ये बदल करण्याचे ठरवले.

बायको आई म्हणून मी माझ्या कोणत्याच कर्तव्यात कसूर केली नाही लक्षा मुलांवर केंद्रित केले. स्वभाव शांत ठेवण्याचा प्रयत्न करत राहिले .याचा अर्थ मला मनात त्रास होत नव्हता असं नाही…. कुठे ना कुठे येते माझ्या तब्येतीवर परिणाम करत होत्या या गोष्टी…… पण तरीही मी शांत करण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्या गोष्टीत माझ्या माहेरच्यांनी हि मला तन-मन-धनाने साथ दिली.

वेगवेगळी वळणं,टप्पे,संघर्ष याला मोकळ्या मनाने सामोरे गेले. नितीशवर तुझा कायम राग काढणे, त्याला मारहाण करणं मी पण सहन केलं आणि त्यालाही समजावत राहिले की रे बाबा तुझ्या चांगल्यासाठी रागवत होते,तु त्यांचे ऐकत जा . खोडकर पणा करू नको ,उलट उत्तर देऊ नको त्याला समजावत होते.

तसं तुलाहि समजावत होते लहान आहे एवढे कडक वागून, कठोरपणे वागून चालणार नाही थोडंसं समजून घे ,समजून सांग. तसं स्वतःलाही समजावत होते…. कधी ना कधी या दोघांमध्ये सुसंवाद नक्की होईल. तुमच्या दोघांमधला दुवा होण्याचा प्रयत्न करत होते.

पण तू मात्र माझ्या अस्तित्वावरच घाव घातला सोनियाला डेट करून .मग मी चिडले रडले कित्येक रात्री मी रडून जागून काढल्या मग मात्र तुझ्याशीच स्पष्टच बोलले. मात्र तू कबूल होत नव्हता. तेव्हा क्षणभर वाटलं होतं की आता आपल्या आयुष्याला काही जगण्यासारखे राहीले नाही तर जगून काय फायदा? आत्महत्याच करावी……

पण लेकरांचा विचार करून पुन्हा शांत होत होते .तुला स्पष्ट बोलले तर तू भांडायचं वेळप्रसंगी हात उचलायचा .तुझं तुलाच कळत नव्हतं की तू काय वागतोय!!मग मी ठरवलं की फक्त मुलांकडे बघून जगायचं…..

मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं नव्हतं कारण मी खूप मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावर पण मुलांना जशी आईची गरज असते ना तसे वडिलांची असते हा विचार करून फक्त मुलांकडे बघून जगायचे ठरवले .नितीश आणि विशाखा तेही भेदरलेले होते या सर्व प्रकारांना घरातील वातावरण, वाद विवाद आणि तणाव, अबोला याला ….सगळं असं होत होतं…

मग मात्र संकल्प केला की काही झाले तरी आत्महत्या आणि घटस्फोट हे पर्याय निवडायचे नाही. सगळं काही सोडून नव्याने सुरुवात करायची आणि तुलाही एक संधी मात्र नक्की द्यायची.असं वाटलं कि कधीतरी तुला कळेल की आपण चूक करतोय कुटुंबाला सोडून कुटुंबाशी विश्वास घात करून……..”

” खरच निशा आज मला त्या सर्व वागण्याचा पश्चाताप होतो आहे. तुम्हाला याबद्दलची शिक्षा द्यायची ते मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे.” राकेशच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या…….

” शिक्षा, बदला या सर्व गोष्टी पिक्चर टीवी नाटक साहित्य यातच बर्‍या वाटतात फार फार तर पुस्तकांमध्ये…. वाचायला……. प्रत्यक्ष जीवनात मात्र प्रत्येक क्षण जगून पुढे जावे लागते रे !!!!!तुला मी शिक्षा द्यायची ठरवून दर जिवाचे काही बरे वाईट केले असते तर पुढे मुलांचं तुझं घरच्यांचं काय झालं असतं???

आणि जरी तुला घटस्फोट द्यायचा ठरवला असता तरी मुलांचे भविष्य त्यांचा भावनिक मानसिक जडणघडणीचा काळ फार वाईट गेला असता……….. आपल्या नात्यातील दरीचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून मी यापैकी कोणताच निर्णय घेतला नाही. विचारपूर्वक निशा बोलत होती.

राकेश नी मात्र तिला सगळं खरं सांगायचं ठरवलं तो म्हणाला,” मला सगळ्या गोष्टींची कबुली द्यायची आहे माझी आणि सोन्याची मैत्री अकरावीला असताना झाली .मला सोनिया खूप आवडू लागली. नकळत मी तिच्यावर प्रेम करू लागलो नंतर ती बारावी झाल्यानंतर अचानक दुसऱ्या शहरात राहायला गेली.

माझा प्रेमभंग झाला मला माझ्या प्रेमाची कबुली तिच्याजवळ द्यायची होती आणि ती देता आली नाही सगळे जागच्या जागीच राहील. पण मी तिला कधीच विसरू शकलो नाही. कारण मी तिला माझ्या मनात कायम जागं ठेवलं .पुढे तू माझ्या आयुष्यात आलीस आणि नकळतपणे मी मात्र तुझी आणि तिची तुलना करत राहिलो. तुझ्याशी फटकळ वागत राहिलो…

एक दिवस अचानक तिची बदली माझ्या कॉलेजला झाल्याचे समजले .मी मनातून हरखलो तिला रोज पाहून पुन्हा तिच्याकडे आकर्षित झालो. तिचे उच्च शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, तिच्या मुलांचे परदेशी असणे याची तुलना तुझ्याशी करायला लागलो त्यामुळे तू आयुष्यात काहीच केले नाही असे वाटू लागले मी दुर्लक्ष केलं की तू संसारासाठी ,माझ्यासाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी काय काय केलं !!काय काय सोसलेस!!

तिचे आयुष्य इतके छान असण्यामध्ये तिच्याबरोबर तिच्या नवऱ्याचा ही कुटुंबाचाही मोलाचा वाटा होता हे मात्र मी विसरलो ……तुझ्या या प्रवासात मी तुला काहीच मदत केली नाही. तुला कायम कमी लेखत राहिलो .तिच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी मी तुझ्याशी खोटं बोलत राहिलो .माझ्या त्यावेळच्या पूर्ण प्रेमाची कबुली मी तिला दिली. अनेकदा खोटे बोलून तिला भेटत राहिलो …………

तेवढ्यात निशाने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली ,”राकेश मला माहिती आहे तू माझ्याशी खोटं बोलून तिला भेटत होता तु तिला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या. अजूनही तू अधून-मधून तिच्याशी बोलतो……. मला सगळं माहिती आहे हे सर्व तुला पुन्हा सांगण्याची गरज नाही……..

आश्चर्यचकित होऊन राकेश तिच्याकडे बघत होता,” मग तु मला काही बोलली नाही की असं करू नकोस? असं का करतोयस? वगैरे ……

“मी प्रेम केले तुझ्यावर…… तुझ्या गुणदोषांसहित स्वीकारले होते तुला आणि प्रेम ना बळजबरीने नाही मिळत. तुझ्यावर मला कोणतीही बळजबरी करायची नव्हती. मला असा बळजबरीचा प्रेम नको होते .रोज वाद भांडण नको होती मला…… मला मुलांना शांत सुरक्षित जीवन द्यायचे होते त्यांच्या आयुष्याची फरपट केवळ माझ्या अहंकार जपण्यामुळे मला नको होते.

आता दोघेही आपापल्या विश्वात रमलेत ….मी आता खऱ्या अर्थाने मोकळी झाले. आता मात्र मी स्वतःसाठी जगणार स्वतःवर प्रेम करणार….. तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस…….”

” मी…. मी …….माझा निर्णय घ्यायला मोकळा म्हणजे म्हणजे काय ?मला माझ्या चुकीचे प्रायश्चित्त करायचे आहे .तुला साथ देऊन, आनंद देऊन, वेळ देऊन, तुझ्या पाठीशी उभा राहून……. करून देशील ना मला एवढं तरी तुझ्यासाठी ?मी ज्या मागे धावत होतो ते मृगजळ होतं ते कळलंय ग मला!!!!!

राकेश रडत होता लहान मुलाप्रमाणे तीही त्याला थोपटत होती. दोघांच्याही डोळ्यात त्या खारटपाण्याने त्यांच्या जीवनातले सारे काळे ढग दूर झाले होते आणि आता सारे कसे स्वच्छ झाले होते ……….झाले मोकळे आकाश …………..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “नवरा जेव्हा कॉलेजच्या मैत्रिणीकडे आकर्षित होतो….”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!