पार्टनर खूप तापट आहे, मग माझाही पारा चढतो अशावेळी मी नक्की काय करू???
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
मॅडम यांना अगदी छोट्याछोट्या गोष्टींचा लगेच राग येतो. यांचा स्वभाव पण मूळचा तापट आहे. पण माझाही कधी कधी ताबा राहत नाही. माझाही पारा चढतो. मीही काहीतरी बोलून जाते. पण हे किती दिवस चालणार? कारण अशा वादातून आम्हाला दोघांनाही त्रास होतो. यावर नेमकं काय करायला पाहिजे? मी नेमकं कसं वागू?
अनेक जोडपी जी समुपदेशनासाठी येतात त्यांची ही तक्रार असते. दोघांपैकी एकाचा कुणाचातरी स्वभाव हा तापट असतो आणि त्यातूनच या गोष्टी होतात, वाद होतात त्यामध्ये दुसऱ्याचा पण पारा चढतो, आवाज वाढतो. अशा वेळी परिस्थिती कशी हाताळायची, नेमक वागायचं कसं हे त्यांना समजत नाही.
तर यामध्ये बायको व नवरा तापट असतील आणि त्यांच्या काही वागण्याबोलण्याबद्दल आपला संयम सुटत असेल, ताबा जात असेल त्यातून आपला पारा चढतो. तर हे होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते कसे करायचे ते पाहू.
जेव्हा समोरचा व्यक्ती तापट असल्यावर तिच्या वागण्यावरून आपण पण तसे वागत असू तर इथे कुठेतरी आपल्या विचारांची चूक होत आहे. आपल्या विचारांची चूक आहे हे कसं समजणार? तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की या प्रसंगी माझ्यासारखे अजून १० जण असते तर त्यांनी काय केलं असत? त्यांना काय वाटलं असत? यातून आपल्या लक्षात येईल की इथे प्रत्येकाचं वागणं, वाटणं वेगळे असेल. का असेल?
कारण प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत जरी प्रसंग एक असला तरी. यातून आपल्याला समजेल की नवरा किंवा बायको रागीट आहे म्हणून आपल्याला राग येतो हे खरं नसून आपल्या विचारांची काहीतरी यात भूमिका आहे, काहीतरी दोष आहे.तो कोणता ते पाहू. तर इथे आपल्याला नवरा किंवा बायकोने रागावू नये, भांडू नये असं वाटत असत, अश्या पद्धतीचा एक आग्रह आपल्या मनात असतो आणि ते तसे वागतात तेव्हा आपला नियम/आग्रह/डिमांड मोडली जाते.
म्हणून आपल्याला राग येतो आपला पारा चढतो. तर इथे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणाकडूनही कसलीही डिमांड करू शकत नाही. आग्रह करू शकत नाही. आता काहींना वाटेल की समोरची व्यक्ती चुकीचा वागते, रागवत असेल तर त्यांनी तसं वागू नये असं वाटणं किंवा अशी अपेक्षा करण, असा आग्रह करण्यात काय चूक आहे?
मित्रांनो अपेक्षा करणे चूक नाहीये पण आग्रह करणे चूक आहे. का चूक आहे कारण त्यातून चांगलं काही होत नाही. आपण समोरच्या ने रागवूच नये असा आग्रह करतो आणि तो जेव्हा मोडला जातो तेव्हा आपल्याला राग येतो आपला पारा चढतो जी चांगली गोष्ट आहे का? यातून आपल्या हातून काही चांगल होत का? परिस्थिती परत नीट होते का? नाही.
अश्या आग्रहाने फक्त आपण आपलं मनस्वास्थ्य बिघडवतो, शब्दाला शब्द वाढतात आणि वाद होतात. म्हणून आपण त्यांनी रागावू नये, भांडू नये अशी अपेक्षा करू शकतो पण आग्रह करू शकत नाही. कारण त्यातून आपल्याला त्रास होणार.
आपला पारा चढण्यामागे आणि एक कारण म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला कंट्रोल करायला पाहतो. समोरचा माणसाचा स्वभाव माहीत असूनदेखील आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवायला बघतो जे घडत नाही म्हणून आपल्याला राग येतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण ते आपल्या हातात नाही. आपण कितीही ठरवलं तरी समोरच्या व्यक्तीला तिच्या स्वभावाला, वागण्याबोलण्याला कंट्रोल करू शकत नाही.
पण मग कंट्रोल करू शकत नाही तर काय करू शकतो? तर आपण influnece करू शकतो. म्हणजेच प्रभाव टाकू शकतो. म्हणजे ती परिस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबणे ज्यातून कमीत कमी नुकसान व जास्तीत जास्त दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. त्यातलाच एक मार्ग म्हणजे assertiveness म्हणजेच ठामपणा. Asertivenss म्हणजे मनात राग न ठेवता आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणे.
समोरचा माणूस कितीही रागीट असला तरी आपण शांतपणे तर न रागवता नेमक्या कोणत्या गोष्टीची समस्या आहे, काय करायला हव आहे हे बोलू शकतो. यामध्ये पण आपण त्याच्याकडून आग्रह करायचा नाही तर आपलं म्हणणं फक्त मांडायच आहे.त्याच्याकडून पण संमती घायची आहे. Assertiveness मधून त्या माणसाचा स्वभाव बदलेल अशी खात्री नसते.
पण यातून आपला आपल्या मनावर ताबा राहतो, आपल्याला काय सांगायचं आहे ते समोरच्याला समजत आणि जेवढ आपणही रागावून समस्या वाढतात त्या यातून म्हणजे शांतपणे बोलून कमी होण्याची शक्यता वाढते. त्याचा स्वभाव जरी बदलणार नसेल तरी त्या प्रसंगात का होईना त्याचा पारा कमी होण्याची शक्यता वाढते.
पण मग कधीच रागवायचं नाही का? राग येऊच नये का? तर assertiveness ही एक राग व्यक्त करण्याची पद्धत आहे. कारण रागात आपण आपल्याला जे पटत नाही त्यावरच प्रतिक्रिया देत असतो. इथेपण आपण आपल्याला जे काही पटत नाही, मांडायचे आहे त्याबद्दलच बोलत असतो. फक्त चांगल्या पद्धतीने, शांतपणे. म्हणून यात जो राग आहे तो आहे healthy anger.
यामध्ये मनात जो राग न ठेवता स्पष्टपणे बोलायचे आहे तो राग म्हणजे unhealthy anger. तर आपण रागावू शकतो पण तो राग healthy असला पाहिजे. त्यातून काहीतरी चांगलं झालं पाहिजे. याची अजून एक पद्धत म्हणजे त्या प्रसंगाला योग्य असा, गरजेचा तितका राग व्यक्त करणे. तो कसा करायचा? तर रागाची सारणी तयार करणे.
बरेचदा काय होतं आपण त्या प्रसंगाला नको तितक मोठ करून तीव्र प्रतिक्रिया देतो. म्हणजे तिथे एवढा राग येणे स्वाभाविक आहे त्याहून कितीतरी पटीने जास्त आपण तो प्रसंग मनात मोठा करतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया देतो. इथे मला दहा टक्के राग कधी आला पाहिजे आणि शंभर टक्के राग कधी आला पाहिजे व त्यामधील त्या त्या टक्त्यातील घटना अशी सारणी करायची.
दहा टक्के राग कधी येऊ शकतो? एखादी सुई टोचल्यावर. तसंच 100% राग येणे पाहायला गेलो तर आपल्यावर कोणीतरी प्राणघातक हल्ला केला तर रास्त असू शकत. पण इथे गंमत अशी होते आपण बहुतेक बऱ्याच प्रसंगांना शंभर किंवा त्याच्या आसपास रागवून किंवा त्यानुसार प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. त्यातील एक म्हणजे नवरा किंवा बायकोने तापट असणं. तिथे आपण व्यवस्थित सारणी तयार केली.
खरोखरच दहा आणि शंभर टक्के त्यामध्ये त्या-त्या टक्क्यांवर किती राग येणे स्वाभाविक आहे,नवरा किंवा बायकोने तापट असल्यावर आपण किती रागावण योग्य आहे, स्वाभाविक आहे. त्याहूनही मोठे प्रसंग असू शकतात अस विचार केला, त्यानुसार सारणी करून वागलो तर आपला आपल्यावर ताबा राहील. आपण योग्य तितका आणि योग्य पद्धतीने म्हणजे assertively वागून राग व्यक्त करू शकतो. जो healthy असेल.
आता या सर्व म्हणजेच assertiveness, विचारांवर काम करणे, त्यांना सुधारणे हे सरावातून जमणार. प्रयत्न लागणार. हे सर्व करताना सुद्धा असे काही प्रसंग होऊ शकतात ज्यात आपण काही करू शकत नाही. अश्या वेळी काही वेळा करता तिथून बाजूला जाणे, दुसरीकडे जाणे योग्य ठरते. तसेच राग आल्यावर आपले ठोके वाढतात, श्वास फुलतो हे सर्व कमी करण्यासाठी, आपली शारीरिक स्थिती ताब्यात ठेवण्यासाठी दीर्घ श्वासाचे व्यायाम फायदेशीर ठरतात.
अ
शाप्रकारे आपण आपल्या मनावर, शरीरावर व्यवस्थित ताबा ठेवून परिस्थिती हाताळू शकतो आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
ग्रीक तत्त्ववेत्ता Aristotle च्या म्हणण्याप्रमाणे,
“Anybody can become angry- that is easy; but to be angry with the right person, and to the right degree, at the right place, and for the right purpose in the right way is not within everybody’s power and is not easy.”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

🙂😊
खूपच छान
Khup chan