वैवाहिक नातं असं सांभाळा की ते दिसलं नाही तरी चालेल, पण जाणवलं पाहिजे.
मयुरी महेंद्र महाजन
विवाहसारख्या रेशमी बंधनात, जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा फुलले….. रे …..क्षण… माझे….. फुलले…. रे ….अशा काहीश्या रंजकतेने त्याची सुरुवात होताना दिसते ,जेव्हा नातं नवीन असतं…, किंबहुना लग्न ठरल्यापासून ते लग्न होण्यापर्यंतचा तो प्रवास इतक्या काही रंजकतेने संपतो, की कळत सुद्धा नाही, परंतु खऱ्या अर्थाने प्रवास सुरू होतो तिथूनचं….. वैवाहिक नातं हे दोन जीवांचे मिलन नसून, ते दोन परिवारांचे मीलन असतं,…
आपण आधी या गोष्टीला सुद्धा समजून घ्यायला हवे…, दोन जीव जोडल्यामुळे झाडाच्या मुळ्या प्रमाणे असंख्य नाती तिथून पुढे सांभाळायची असतात .,तितक्याच आपुलकीने जपायची असतात, आता नात्यांची इतकी मोठी साखळी तयार झाल्यावर प्रत्येकाशी जुळेलचं याची मात्र खात्री नसते, कारण प्रत्येक व्यक्तिपरत्वे नाते जसे वेगळे आहे, तसेच त्यांना त्याला मर्यादा ,बंधन आणि त्याचबरोबर त्याला मिळणारी आपुलकी, स्नेह हा तसा वेगळा आहेचं….
नात्यांच्या संपूर्ण परीखंडाचा जर आपण विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, प्रत्येक नात्याची जवळीकता, आणि जाणीव ही आपल्याला प्रत्येक वेळी होतेचं… आजकाल बरेच जण नातं दाखवण्यात आपला उत्साह दाखवतात, पण वैवाहिक नातं असं सांभाळा की दिसलं नाही तरी चालेल ,पण ते जाणवलं पाहिजे,… असे म्हटल्यावर येथे कितीतरी प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू, जसे की नातं आहे, तर दाखवायला नको का ????!किंवा नाही दिसलं तरी चालेल असं कसं बरं ????बघा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा शब्दांच्या खोलावर दडलेला अर्थ आणि शब्दांच्या पाठी मागची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केलात ,तर बरीच उत्तर आपलीच आपल्याला मिळतात.
तसं पाहिलं तर आपली कोणावरती ठिका नाही, पण कधीतरी, कुठेतरी, नकळत कानावरती बातमी पडते, की विवाहबंधनात कितीतरी वर्ष असणारे जोडपे ,ज्यांचे बाह्यरुपी तर कधी त्यांच्यात काही वाद किंवा भांडणे असतील ,असे वाटले नव्हते ,किंबहुना त्यांची सोशल मीडियावर दोघांचे नेहमी सोबत असलेले फोटो असायचे, त्यावरून दोघात कधी त्यांच्यात असे मतभेद होऊन गोष्टी ईतक्या थराला जातील, असे वाटले नव्हते, असे शब्द कानावर येतात. आणि कुठेतरी तिचे रुपांतर एका मोठ्या ज्वालामुखीत कधी होते ते कळतही नाही, आणि शेवट करताना आपण सुरुवातच का केली होती, यावर विचार सुद्धा शिवत नाही, इतकी मानसिकता टोकाला जाताना दिसते,
मित्रांनो एकच सांगणे आहे…, नात्यांच्या परिघात बाह्यरुपाने नातं सजवण्यापेक्षा ते जर अंतरंगाने सजवण्याचा ध्यास घेतला, तर कधीच आपल्याला कुठल्या देखाव्याची गरज भासणार नाही, एकमेकांच्या मनात एकमेकांना सजवता आलं पाहिजे ,तसेच गोंजारता आलं पाहिजे, दिखाव्याची गरज त्या लोकांना वाटते, ज्यांना नसलेले दाखवायचे असते, ज्यांच्याकडे आहे, तो कधीच देखावा मांडत बसतच नाही, कारण वैवाहिक नाते हे दाखवायचं नसून अनुभवायचे असते, हे त्यांना माहिती असते आहे,
हा एक सांगायचं राहून गेलं, बऱ्याचदा त्यात एकाला दुसऱ्याला गमावण्याची भीती असते, जर तू मला सोडून गेलीस तरं…. आणि तू मला सोडून गेलास तरं…. माझे कसे होईल ????मी स्वतःला कसं सावरणार????? अशी कितीतरी प्रश्न नाही म्हटलं तरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबरोबर नकळत मनात मनात येऊन जातात, आणि त्यामुळे दोघांपैकी एक जण समोरच्या व्यक्तीला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर मलाही हे सांगायला जरूर आवडेलं,
जर आपल्या वैवाहिक नात्यामध्ये पारदर्शकता असेलं, विश्वास असेल, आणि एकमेकांच्या प्रेमाप्रती सन्मान असेलं, तर बंधनाला तिथे जागा नाहीचं, तर लग्न हे एक बंधन आहेचं, पण शब्दशः अर्थ जोडू नका, जसे की पाळलेला एखादा पक्षी असो, किंवा प्राणी जरी तो दिवसभर कुठेही असला तरी आपले ठिकाण आणि जी व्यक्ती आपल्याला भाकरतुकडा टाकते, त्यांच्याकडे परतणारचं असते, अगदी तसेच ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ,त्या व्यक्तीला स्वातंत्र्य देणेही महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक व्यक्ती आपले व्यक्तिमत्त्व घेऊन जगत असते,
सोबत राहणं आणि सोबत असणं यामध्ये फरक आहे, अगदी तसंच नातं दाखवण्यापेक्षा त्या नात्यांची ती भावना जाणवणे महत्त्वाचे आहे, तो आधार, ते प्रेम या प्रत्येक गोष्टींनी ते नातं परिपूर्ण होत जाते ,ती प्रत्येक गोष्ट नात्यात असणे गरजेचे आहे, सर्वात महत्त्वाचे कि टाळी ज्याप्रमाणे एका हाताने वाजत नाही, त्याप्रमाणें आपण फक्त समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणे हे सुद्धा बरोबर नाही, त्याच प्रकारे आपण सुद्धा आपल्या कडून ते द्यायला हवे,
जाणिवेच्या स्थळावरती चाले सारा खेळ याप्रमाणे ते जाणवले पाहिजे ,कारण जाणिवेच्या पातळीवरती समायोजन करताना तिथे असलेली कमतरता भरून काढताना खूप नाजूक पद्धतीने उसवलेल्या धोरणाप्रमाणे एक एक गाठ सोडावी लागते, वळण घेतलेली वाट कुठल्या वळणावरती येऊन थांबेलं,याचा ब्रेक मात्र हातून सुटुन गेलेला असतो, त्यासाठी वेळीच वैवाहिक नातं असं सांभाळा जे जाणवलं पाहिजे…….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chan samjun sangtila hai.. Mast lihala hai.