Skip to content

सत्र सहावे :- आजार असल्याची बनावट विकृती (Factitious Disorder)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)

सत्र सहावे :- आजार असल्याची बनावट विकृती (Factitious Disorder)


ही विकृती म्हणजेच कृत्रिम, बनावट, ओढूनताणून आणलेला किंवा बळच उत्पन्न केलेला मानसिक आजार ! उदाहरणाद्वारे स्पष्ट करायचे झाल्यास, काही व्यक्ती या मनोशारीरिक आजाराने (Psychosomatic Disorder) ग्रस्त असतात. जसे की, डोकेदुखी, पोटदुखी, चक्कर येणे, पोटात मळमळणे इ. परंतु ही सर्व शारीरिक लक्षणे जेव्हा कोणत्यातरी मानसिक आजाराने उद्भवतात तेव्हा त्यास मनोशारीरिक आजार असे म्हणतात. तरीही मला कोणतातरी शारीरिक आजार झाला आहे, असेच व्यक्तीला वाटते व ती प्रत्यक्ष ते अनुभवतही असते, म्हणजेच याठिकाणी व्यक्ती खोटे बोलत नाही. याउलट या विकृतीने ग्रस्त व्यक्ती खोटे बोलतात. स्वतः च विविध लक्षणे उत्पन्न करीत असतात किंवा खरोखरच्या पण अगदी किरकोळ अशा तब्येतीविषयक तक्रारी अतिशय फुगवून व नाट्यमय पद्धतीने इतरांपुढे मांडत राहतात. अशा व्यक्तींना रुग्णांच्या व पेशंटच्या भूमिकेत रहायला फार आवडते. म्हणून मला काहीतरी झाले आहे किंवा होणार आहे, याबद्दलच ते इतरांना सांगत बसतात.


केस :

कदम काकु (वय वर्ष ५६) आजकाल इतरांशी बोलायला फारसे उत्साह दाखवतात. उत्साह म्हणजेच सतत स्वतः च्या नसलेल्या दुखणीवर तक्रार करीत असतात. कदाचित अशी खोटी तक्रार केल्याने त्यांना समाधान मिळत असे. परंतु कदम काकूंचा हा खोटारडेपणा समोरचा व्यक्ती काही कालावधीनंतर लगेचच ओळखत असे. पण तरीही समोरच्या व्यक्तींकडून आपला खोटारडेपणा पकडला गेला आहे, याची चाहूलही त्यांना लागत नसे. त्यांच्या अशा वागण्यामुळे सहसा कोणीही त्यांच्याशी बोलायला मागत नसत. त्यांना एक मोठा मुलगा, सुनबाई आणि दोन नातवंड होती. घरात एखादा महत्वाचा प्रसंग आला कि, डोकेदुखी, चक्कर, ताप, मळमळ इ. खोटी कारणे देऊन ते त्या प्रसंगातून बाजूला होत असे आणि इतरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होण्याचा प्रयत्न करीत असे. परंतु त्यांच्या या खोट्या तक्रारींपुढे घरातल्या व्यक्तींनी पाठ फिरवल्याने आजकाल कदम काकू डॉक्टरांच्या भेटीगाठी घेऊ लागल्या. ते त्यांच्या बोलण्यातून डॉक्टरांवर अशी काही छाप पाडत असत कि डॉक्टरही सुरुवातीला त्यांच्या बोलण्याला भुलत असे, पण सतत त्याच तक्रारींमुळे आता डॉक्टरांनीही त्यांना हवी तशी दाद देणे थांबविले. हळू हळू इतर व्यक्ती माझ्यापासून दूर जाताहेत याचा प्रचंड त्रास कदम काकूंना होऊ लागला. याच उदासिनतेतून मग स्वतःला शारीरिक इजा करणे, जेणेकरून इतर व्यक्तींचे लक्ष माझ्याकडे राहील, असे प्रयत्न सुरु झाले. थोडक्यात कदम काकूंचा हा मानसिक आजार हळू हळू वाढू लागला आणि आज कोणीही तक्रार ऐकायला नसल्याने तासंतास कदम काकू आरशापुढे स्वतःशी बोलत असताना आढळतात. त्यांच्या एका मानसिक आजाराबरोबर त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या एका मानसिक आजाराने जन्म घेतला आहे आणि तो वाढतो आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार होणे अत्यंत महत्वपूर्ण होते. त्यांचा खोटारडेपणा हा सामान्य नसून तर मानसिक विकृतीमधला खोटारडेपणा आहे आणि यासाठी त्यांना मानसशास्त्रज्ञाची गरज आहे, हे आप्तस्वकीय आणि इतर मंडळी समजून घेतील का ? कोण जाणे ?



लक्षणे :

१) पेशंटच्या भूमिकेत या व्यक्तींना फार समाधान मिळते. त्यासाठी पेशंटच्या हुबेहूब हावभावांचे  त्यांच्याकडून काटेकोरपणे निरीक्षण झालेले असते.
२) या व्यक्ती सतत स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आजाराविषयी अवास्तव तक्रार करत असतात.
३) आपण आजारी आहोत याविषयी वातावरण तयार झाले आहे, असे वाटल्यास ते इतर जवळीक व्यक्तींच्या आजराबाबतीतही उघडपणे बोलतात.
४) या व्यक्तींना बऱ्यापैकी वैद्यकीय ज्ञान असल्याचे दिसून येते. कोणत्या आजारात कशा प्रकारची लक्षणे उद्भवतील याचा त्यांना अंदाज असतो, त्यामुळे आजारी असल्याचे नाटक इतरांना खरे वाटेल, असे ते वागतात.
५) अनावश्यक शस्त्रक्रीया करवून घेण्यापर्यंतसुद्धा या मंडळींची मजल जाऊ शकते.


कारणे :
१) या विकृतीचे उगमस्थान बाल्यावस्थेत उत्पन्न होत असून तरुणपणी या विकृतीला एक आकार प्राप्त होतो.
२) बालवयात असताना आजारी पडल्यानंतर आई-बाबा माझी जास्त काळजी घेतात, शाळेला सुट्टी मिळते, आवडते नातलग भेटायला येतात इ गोष्टी व्यक्तीच्या ठिकाणी केंद्रित होऊन हळू हळू या प्रकरणाला सभोवतालीन परिस्थितीकडून खत पाणी मिळते.
३) काही केसेस मध्ये तरुणपणी ही विकृती जन्म घेते, पेशंट होण्याचे फायदे लक्षात घेऊन व्यक्ती तसे वागण्याचा आव आणते.
४) अनुवांशिकतेमार्फत ही विकृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत संक्रमित होऊ शकते.
५) मेंदूतील रसायनांमध्ये असमतोल झाल्याने हा आजार उद्भवू शकतो.


उपचार :
१) अशा व्यक्तींच्या जीवनशैलीत बदल करण्याचा प्रयत्न केला जातो. आजाराविषयी खोटे बोलण्याची तात्कालीक  सुखप्राप्तीतुन उद्भविणाऱ्या असंख्य समस्या याबद्दल व्यक्तीला आत्मचिंतन करण्याचे वेगवेगळे उपाय दिले जातात.
२) इतरांनी माझी काळजी करावी आणि माझ्याकडे लक्ष द्यावे यामधल्या अवास्तव अपेक्षांबद्दलची तार्किक बाजू प्रत्यक्ष अनुभवामार्फत स्पष्ट केली जाते.
३) वेगवेगळ्या सायकोथेरपी याठिकाणी वापरू शकतो. जसे REBT, CBT, Existential & Logo Therapy इ.
४) काही Meditation चाही महत्वपूर्ण उपायोग होऊ शकतो.
५) आणि शेवटी मेंदूतील दोष आणि रसायनांमधील असमतोल यासाठी औषधोपचारही फायदेशीर ठरते.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते 

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!