Skip to content

सत्र सातवे :- सामान्य चिंता (Generalized Anxiety Disorder)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)


सत्र सातवे :- सामान्य चिंता (Generalized Anxiety Disorder)


Generalized Anxiety Disorder (GAD) हा चिंता विकृतीचाच एक मुख्य प्रकार आहे. या विकृतीमध्ये व्यक्ती दिर्घकाळ आणि तीव्र स्वरूपाची चिंता व भिती अनुभवत असते. परंतु अशा प्रकारची चिंता व भिती होण्यामागचे कारण व्यक्तीला विचारले असता तिला ते सांगता येत नाहीत. व्यक्तीच्या ठिकाणी असणारी ही अवास्तव चिंता किंवा भिती ही कोणत्याही विशिष्ट समस्येशी किंवा तणावाशी संबंधित नसते. तर दैनंदिन जीवन जगत असताना किरकोळ असणाऱ्या समस्या म्हणजेच आज खूप कडक ऊन आहे माझे डोके दुखेल, आज ट्रेन खूप जोरात धावत आहे पुढे ती रुळावरून खाली घसरेन, आज ५ मिनिट उशीर झाला बॉस सर्वांसमोर ओरडेन इ. किरकोळ आणि धोक्याची पातळी अत्यंत कमी तीव्र असतानाही या व्यक्तींच्या मनाची धांदल उडून अवास्तव चिंता त्यांचे दैनंदिन जीवन उध्वस्त करते.


केस :-

रेखा ही २९ वर्षाची एक अविवाहीत तरुणी गेल्या काही वर्षांपासून खूप अस्वस्थ असल्यासारखी वागत आहे. याच अस्वस्थतेमुळे तिला तिचा जोडीदारही अद्याप निवडता आलेला नाहीये. सतत लहान-लहान गोष्टीपासून आपल्या भावंडांना रोखून धरणे आणि अनिवार्य सल्ले देणे हे तिला बरेच जमते. परंतु एखादी कृती करण्याची वेळ किंवा महत्वाचा निर्णय घ्यायची वेळ आली की ती चिंतातुर आणि भयभीत होत असे आणि भावंडांच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावून काही गोष्टी त्यांना करण्यापासून रोखत असे. त्यामध्ये तिची भावंडांच्या बाबतीत अतिपराकोटीला गेलेली काळजी कारणीभूत ठरत असे. एके दिवशी तर तिची लहान बहीण तिच्या शिक्षकांना महत्वाच्या कामानिमित्त भेटायला जाणार तेवढ्यात रेखाने तिला बाहेर जाण्यापासून रोखले. ‘आज वातावरण काही ठीक नाहीये भूकंप येऊ शकतो’, रेखाच्या या उद्गारापुढे तिच्या बहिणीने तिला जोरात बाजूला सारून पुढे प्रस्ताव केला. रेखा एवढ्यातच थांबली नाही तिने तिला एका मागोमाग एक असे अनेक फोन केले, आणि एकच वाक्य, ‘सर्व ठीक आहे ना’ ! रेखाच्या अशा वागण्यामुळे घरातली मंडळी तिच्यापासून दुरावले होते, तिच्याविषयी इतरांच्या मनात काळजी कमी आणि द्वेष जास्त निर्माण झाला होता. जसजसे दिवस पुढे सरकत होते, तिच्यातला अस्वस्थपणा वाढत होता. रेखाला सामान्य विकृतीने ग्रासले होते. चक्कर येणे, एखाद्या लहानश्या आवाजाने छातीत धडधड होणे, दचकणे, घाम फुटने इ लक्षणांनी तिच्या ठिकाणी जन्म घेतला होता. या शारीरिक तक्रारी लक्षात घेऊन रेखा डॉक्टरकडे गेली. आणि म्हणाली, “मला कशाना कशाची तरी खूप काळजी वाटते, कधी भावंडांविषयी, माझ्या नोकरीविषयी, आपल्या देशाचे पुढे कसे होईल, ग्लोबल वार्मिंग ते ग्लोबल कूलिंगपर्यंत मला सारखी सगळ्यांचीच काळजी वाटत राहते.” यावर डॉक्टर म्हणाले, “एवढी काळजी करने योग्य नाही, त्यामुळे उच्च रक्तदाब, पचनात बिघाड, तसेच प्रतिकारशक्ती कमी होऊन गंभीर शारीरिक आजार उद्भवतात.” क्लिनिकमधून बाहेर पडताना रेखा पुटपुटली. “अरे बाप रे, डॉक्टरांनी चिंतेचे किती दुष्परीणाम सांगितले.” आता रेखाला चिंतेची सुद्धा चिंता वाटू लागली होती. असा हा रेखाचा मानसिक आजार डॉक्टर आणि घरचे मंडळी ओळखतील काय ? जरी ओळखला तरी ते तिला मानसशास्त्रज्ञाकडे नेतील काय ? कोण जाणे ?


लक्षणे :-
१) GAD ग्रस्त व्यक्ती कुठल्यातरी काळजीने, चिंतेने ग्रासलेले असतात. काहीतरी वाईट घडणार आहे, असे त्यांना सतत वाटत असते.
२) सततच्या काळजीमुळे झोपेवरही परिणाम होऊ शकतो. शिवाय चिडचिडेपणा व नैराश्यही येऊ शकते.
३) GAD व्यक्ती अतिदक्षता, अतिसतर्कता व अति सावधगिरी बाळगतात. त्यांच्या या अतिमुळे त्यांचे रोजच्या कामकाजातील लक्ष उडते व मन एकाग्र होऊ शकत नाही.
४) तोंडाला कोरड पडणे, घाम येणे, छातीत धडधडणे, नाडीची आणि श्वासाची गती वाढणे, पोट बिघडणे, जुलाब होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, हात-पाय थंड पडणे व घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, अशी शारीरिक लक्षणे दिसतात.
५) तसेच स्नायू ताणल्यासारखे होणे, हात किंवा पाय अस्वस्थपणाने हलवत राहणे व चटकन दचकायला होणे हि लक्षणे दिसतात.


कारणे :-
या विकृतीची कारणे पाहता शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाबींचा समान वाटा असल्याचे लक्षात येते.
१) सुप्त मनातील (unconscious mind) दबलेल्या इच्छा व भावनिक संघर्ष या विकृतीला कारणीभूत ठरते.
२) दररोजच्या अतिदक्षता स्वभावामुळे त्यांच्या ठिकाणी पुढे चालून हा आजार उद्भवू शकतो.
३) बालपणापासून भयभीत आणि चिंतातुर वातावरणात वाढल्याने तरुणपणी हा आजार जडू शकतो.
४) मेंदूतील GABA रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार उद्भवतो. परिणामी वस्तुनिष्ठ कारण नसतानाही व्यक्ती चिंतेचा अनुभव घेते.
५) तसेच अनुवंशिकता, मेंदूच्या विशिष्ट कार्यातील बिघाड हे एक कारण असू शकते.


उपचार :-
१) GABA रसायनांची कमतरता भरून काढण्यासाठी काही औषधोपचारांचा वापर केला जाऊ शकतो.
२) अशा व्यक्तींना चिंता निर्माण झाल्यास त्या घटनेची नोंद ठेवण्यास सांगितले जाते. जसे चिंता कधी वाटली, किती काळ व कशामुळे वाटली, कोठे असताना वाटली, इतर काय लक्षणे दिसली, त्यांची तीव्रता काय होती इ. या थेरपीला Self Monitoring असे नाव आहे.
३) व्यक्तीला स्वतःच्या वाटणाऱ्या चिंतेबद्दल Generalization आणि Discrimination हे तंत्र शिकविले जाते.
४) तसेच मेडिटेशनचाही फार मोठा परिणाम या व्यक्तींवर होतो.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते 

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!