Skip to content

आज एकमेकांचे वाभाडे काढा, उद्या तुमची मुलं तुम्हाला मनातून हाकलून देतील.

आज एकमेकांचे वाभाडे काढा, उद्या तुमची मुलं तुम्हाला मनातून हाकलून देतील.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


यश खूप घाबरलेला होता. सारखा दरवाजातून डोकावून आत पाहत होता आणि ते करता-करता तो अजुनचं घाबरत होता. तो जे बघत होता ते त्याच्या आई-वडिलांचं भांडण होतं. जवळपास हे रोजचंच झालं होतं. आपल्या ६ वर्षाच्या मुलावर याचा काय परिणाम होतं असेल यापेक्षा कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवणं जास्त महत्वाचं त्याच्या पालकांना वाटत होतं. आणि याचा खोलवर परिणाम त्या बिचाऱ्या यशच्या बालमनावर होतं होता. अशी कितीतरी यश सारख्या लहान मुलांची आज परिस्थिती आहे. प्रत्येक मुलावर कमी-अधिक प्रमाणात या गोष्टींचा परिणाम होतं असतो.

भांडणं ही प्रत्येक नात्यात होत असतात. मग नातं कितीही मजबूत असो, किंवा प्रेम आणि विश्वास यावर उभारलेलं असो कधीना कधी काही गोष्टींवरून खटके उडतात आणि जोडप्यांमध्ये भांडणं होतात. पण अशावेळी भांडणात आपण रागात काही चुकीच्या आणि कधी-कधी जास्त गोष्टी बोलून जातो. लहान मुले ही अनुकरणशील असतात. ती आपल्या अवतीभोवतीच्या परिसराचं , माणसांचं निरीक्षण करीत असतात. त्यांना आपण ज्या गोष्टी शिकवू त्यापेक्षा पाहून खूप गोष्टी ती शिकत असतात.

त्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी करू नये, शिकू नये असं आपल्याला वाटत, त्या गोष्टी आपण ही त्यांच्यासमोर करायच्या टाळायला हव्यात. जरी तुमची भांडणं झाली तरी मुले समोर असतील तर शांततेत तुम्ही ती कशी हाताळता हे जर मुलांनी बघितलं तर या गोष्टीचा त्यांच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. या गोष्टींना हाताळण्याची योग्य पद्धत त्यांना माहित होऊ शकते.

बरेच पालक मुलांशी अगदी आपुलकीने वागतात, त्यांना हवं नको ते बघतात. मात्र एकमेकांसोबत त्यांची सतत भांडणं होत असतात. त्यात कधी-कधी आपण आपल्या मुलांसमोर भांडत आहोत हे देखील ते विसरून जातात आणि मग नको ते शब्द तोंडून निघतात. एकमेकांबद्दल आदर ठेवून बोलण्यापेक्षा रागाच्या भरात निरादर होतो. मुले खूप लहान असतात तेव्हा ती भांडणं झाली असता घाबरतात, रडतात. त्यांच्या मानसिकतेवर देखील याचा खोल परिणाम होतो.

पण ती जेव्हा मोठमोठी होत जातात तसं त्यांच्या मनातला आई-वडिलांविषयी असणारा आदर जाऊन त्याजागी निरादराची भावना उत्पन्न होते. ज्या आई-वडिलांना भांडणात आपण आठवत ही नसतो, किंवा आपल्याला याचा किती त्रास होतो त्याच ही त्यांना काही वाटत नसेल तर अशा आई-वडिलांचा स्वीकार करणं ही त्यांना पसंत नसत.

कारण सगळ्यात सुरक्षित हे मुलांना आई-वडील जवळ असतानाच वाटत असत. पण ती भावना त्यांना जेव्हा मिळत नाही तेव्हा कुठेतरी त्यांचा त्या नात्यावरचा विश्वास उडू लागतो. रोजची अशी भांडणं बघून जवळपास त्यांचं बालपणच हिरावून घेतल्यासारखं होतं. मोकळ्या मनाने बागडणं, खेळणं, मजा करणं हेच विसरून ती मुलं कोडगी होतात, शांत-शांत राहू लागतात, चिडचिडी होतात.

घरातल्या अशा ताणतणावाच्या वातावरणाचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होतो. त्यांच्यात झोपेचे प्रॉब्लेम्स म्हणजेच शांत झोप न लागणे, अधूनमधून जाग येत राहणे, झोपच न येणे किंवा जास्त येणे, आणि झोपलेले असता वाईट स्वप्नांचं प्रमाण जास्त असणे अशा समस्या निर्माण होतात.

पालकांना भांडताना बघून त्यांच्या मनात भीती आणि असहाय्य्यतेची भावना निर्माण होते, त्यांना असुरक्षित वाटू लागते. आणि या भावना मुलांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात आणि ते परिणाम आयुष्यभर त्यांच्या सोबत राहतात. मेंदूची वाढ नॉर्मल मुलांसारखी न होणे, conduct disorder , anxiety , depression , self-harm असे प्रॉब्लेम्स ही त्यांना फेस करावे लागतात.

पालकांच्या भांडणाचे परिणाम मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात. ते जेव्हा मोठे होतात, तरुण असतात , किंवा जेव्हा स्वतः पालक बनतात तेव्हा देखील त्यांच्यावर त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टींचा परिणाम दिसून येतो. ताणतणावाच्या वातावरणात राहून मुलांनाही स्ट्रेस होतो आणि तो स्ट्रेस मोठं झाल्यावर डायबेटिस, बी.पी यांसारख्या आजारांना आमंत्रण देतात. जेवढे गंभीर वाद, आणि वापरले जाणारे वाईट शब्द मुलं ऐकतात,

पाहतात तेवढाच त्यांचा भावनिक, मानसिक गोंधळ वाढत जातो. अशा मुलांना समाजात गोष्टी अड्जस्ट करणं अवघड जात. ते मोठे झाल्यावर जेव्हा कोणत्या नात्यात येतात तेव्हा ते स्वतः देखील हिंसात्मक होऊ शकतात, किंवा जसे त्यांचे पालक होते तशाच पद्धतीने ते आपल्या पार्टनरशी वागू लागतात.

अनेकदा त्यांच्या दडपलेल्या भीती, राग आणि दुःखाच्या भावना या इतरांना धमकावणे, आक्रमक होणे आणि हट्टी, अवज्ञाकारी, भयभीत अशा माध्यमात बाहेर पडतात. आणि याचा परिणाम याच मुलांना भोगावा लागत नाही, तर त्यांच्या सोबत असणाऱ्या माणसांना देखील याचा त्रास होतो. त्यांच्या अशा स्वभावामुळेदेखील त्यांना समाजात स्वीकारले जात नाही किंवा त्यांचे फारसे मित्रही नसतात आणि यामुळे त्यांच्या वाट्याला एकाकीपणा येतो.

त्यामुळे शक्यतो मुलांसमोर भांडणे करणं टाळा, आणि कधी त्यांच्यासमोर वाद झालेच तरी शांततेने ते सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं मुलं न घाबरता त्यातून काहीतरी चांगलंच शिकेल अशा पद्धतीने गोष्टी हाताळा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!