परस्त्रीबद्दल संशय घेऊन सतत नवऱ्याला त्रास देत असाल तर…
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
जान्हवी व नितेशच्या लग्नाला आता जवळपास १०वर्षे होत आली होती. संसारात प्रेमाबरोबरच कधीकधी रुसवे-फुगवे, राग लोभ हा चालतोच. पण कोणतीही गोष्ट जर ठराविक प्रमाणात असते तर त्याची मजा असते. नवरा-बायकोमध्येही आपल्या जोडीदाराबद्दल पजेसिव असण, कधी कधी त्याला दुसऱ्या कोणासोबत पाहिलं की जेलस होण हे नॉर्मल आहे. जोपर्यंत यातून दोघांपैकी कोणालाही किंवा त्यांच्या नात्यात कुठे ताण येणार नाही, त्रास होणार नाही.
पण जान्हवी या सर्वाच्या पलीकडे गेली होती. तिचा स्वभाव तसा पहिल्यापासून पझेसिव्ह होता. पण नात्यात इतकं होतच म्हणून नितेश त्याकडे दुर्लक्ष करायचा. नितेशचा मित्र परिवार होता. आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत फिरण्यात वेळ घालवायला त्याला आनंद वाटत असे. पण जान्हवीला मात्र तिच्या नवऱ्याच दुसऱ्या मुलीसोबत फिरण, गप्पागोष्टी करणे अजिबात आवडत नसे.
तो जरा जरी कुठे कोणासोबत गेला तर ती लगेच संशय घेऊ लागे. जर तो एखाद्या मुलीसोबत बोलत असला तर त्यांच्यात काहीतरी आहे असे तिला वाटे. कुणाचा मेसेज येऊ दे किंवा कामाच्या निमित्ताने तरी कोणत्या स्त्री चा फोन आला तरी तिच्या मनात संशयाचे भूत जाग होत असे.
जान्हवीला तिच्या नवर्याने कोणत्याही परस्त्रीशी साधे बोललेले देखील खपत नव्हतं. त्यातून ती नको नको ते संशय घेणं, फोन चेक करणं असं करे. याव्यतिरिक्त नितेशशी भांडण,त्याला उलटसुलट प्रश्न विचारणं या सर्व गोष्टी ही व्हायच्या. नितेश तर पुरता कंटाळून गेला होता. कारण तो काही सांगायला गेला तरी ती ऐकून घेत नसे व त्याच्यावर उलट सुलट आरोप करत असे.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की त्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागली. करण नितेश एका मर्यादेपर्यंत हे सर्व सहन करत होता पण त्यानंतर तो काहीही ऐकून घेईनासा झाला. कारण ज्यात त्याची काही चूक नव्हती त्यासाठी त्याला ऐकून घ्यावे लागत होते.
ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला. दहा वर्षे झाल्यावर नात्यांमध्ये जो एक बंध, घट्टपणा विश्वास यायला हवा तो जान्हवीच्या संशयी स्वभावामुळे तुटू लागला व त्यातून त्यांचे नाते हे कमकुवत बनत गेले.
जसं आधी म्हटलं, एका नात्यात असताना आपल्या व्यक्ती बद्दल थोडासा पझेसिव्हनेस असणे चांगले आहे. त्यातून समोरच्या व्यक्तीला आपल्यावर कुणीतरी इतकं प्रेम करणार आहे याची जाणीव होते.
पण नात्यांमध्ये जर संशयाने जागा घेतली तर तो खूप घातक ठरू शकतो. यातून अनेक वर्षांचे संसारही कोलमडू लागतात. अनेकदा एका क्षेत्रात काम करत असून देखील नवऱ्याचे प्रोफेशन, त्याचा स्वभाव माहित असून देखील अनेक बायका नवऱ्यावर परस्त्रीबद्दल संशय घेतात. पण यातून नुकसान तुमच्या व तुमच्या नात्याच होणार आहे.
म्हणून जर तुम्ही विनाकारण नवऱ्यावर संशय घेत असाल तर सुरुवातीला काही गोष्टी लक्षात घेणं, विचारात घेणे गरजेचे आहे. त्या कोणत्या तर, पहिली गोष्ट म्हणजे मी जो असा संशय घेत आहे त्याला काय पुरावा आहे? अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींना पण खूप मोठं केलं जातं.
उदाहरणार्थ, खूप रात्री एखाद्या बाईचा मेसेज येणं, एखाद्या वेळी नवऱ्याला बाईशी बोलताना पाहण, यातूनही बायका पराचा कावळा करतात व संशय घेतात. पण इथे माझ्या संशयाला काय पुरावा आहे? आणि जरी असला तरी तो माझ्या या संशयाला धरून आहे का? तितकी मोठी गोष्ट आहे का? की त्याची काही वेगळी कारण असू शकतात. या प्रसंगाची काही वेगळी बाजू असू शकते का? खरं कारण काय असू शकेल? जे वास्तवाला धरून असेल. हे सर्व प्रश्न आपण त्या वेळी स्वतःला विचारले पाहिजेत. बरेचदा गैरसमजातून पण अनेक गोष्टी होतात.
पण हा गैरसमज कधी दूर होणार? तर त्यावर बोलल्यावर. पण काही बायका जसं जान्हवी नवऱ्याचा ऐकून घ्यायला, त्याच्याशी बोलायला देखील तयार नसतात. पण या प्रसंगांमध्ये त्याची पण काहीतरी बाजू असू शकते, या गोष्टी मागे काहीतरी कारण असू शकते जे तो चांगल्या पद्धतीने सांगू शकतो हेही लक्षात घ्यायला पाहिजे.
बऱ्याचदा नात तुटण्याच कारणं हे दोघांमध्ये असलेला संवादाचा अभाव असतो. म्हणून जी गोष्ट खटकत आहे, चुकीची वाटत आहे ती तेवढीच ठेवून, त्याची तीव्रता न वाढवता त्याबद्द्ल नवऱ्याशी बोलले पाहिजे. कारण दरवेळी जसं आपल्याला दिसतं तसं नसतं. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण असतं. ती समजून घेण्यासाठी आपल्या मनातील संशय दूर करणं महत्त्वाचं.
आणि असा संशय कधी दूर होईल तर बायकोने नीट परिस्थितीचा विचार केला. वास्तवाला धरून विचार केला तर. कारण जी गोष्ट अस्तित्वात नाही त्यासाठी विनाकारण संशय घेणे त्यावरून वाद करणे हे चांगल्या नात्यालाही खराब करू शकते.
म्हणून नात्यावर पुरेसा विश्वास ठेवा. आपल्या मनात जे काही आहे ते मन मोकळेपणाने, विचार करून बोला. समोरच्याचं ऐकून घ्या आणि नातं अजून बळकट करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
