Skip to content

सत्र आठवे :- अति अवलंबून राहणे (Dependent Personality Disorder)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)


सत्र आठवे :- अति अवलंबून राहणे (Dependent Personality Disorder)


या विकृतीच्या नावाप्रमाणेच त्रस्त व्यक्ती मानसिकदृष्ट्या विविध प्रकारे परावलंबी असते. अशा व्यक्तीमध्ये काही प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात. ते म्हणजे अशा व्यक्तींना आत्मविश्वास कमी असतो. त्यामुळे ते स्वतःच्या आयुष्याबाबतचे अगदी महत्वाचे निर्णय सुध्दा स्वतः घेत नाहीत, ते इतरांवरच हि जबाबदारी सोपवतात. आपण स्वतंत्रपणे काही करू शकतो, याची त्यांना खात्री वाटत नाही. करिअर कोणते निवडू, लग्न कोणाशी करू ते अगदी मुले कधी व्हावीत व किती असावीत, यांसारखे विविध निर्णय ते खुशाल इतरांवर सोपवतात. महत्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शन लागणे, इतरांशी सल्ला-मसलत करणे साहजिकच असते. परंतु याबाबत अशा व्यक्तींचे वर्तन वाजवीच्या पलिकडे जाते. कोणताही निर्णय घेताना शेवटी स्वतःला काय योग्य-अयोग्य वाटतंय याचा ते फारसा विचार करीत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्ती स्वतःची काळजी स्वतः घेण्यास सक्षम नसतात.


केस :-
पंकज, वय ३० वर्षे, हा एका सरकारी ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून काम करतो. खरं तर पंकज हा अत्यंत मेहनती, मन लावून काम करणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. पण हल्ली पंकजचे कामात लक्ष लागत नाही. तो सारखा कोणत्यातरी विचारात मग्न असतो. जरा निराशही वाटतो. झाले असे कि, पंकजचे ऑफिसमधल्याच एका मुलीवर प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्नही करायचे होते. पण जेव्हा तिच्याबद्दल पंकजच्या आईला समजले तेव्हा त्यांनी लग्नास साफ नकार दिला. पंकजची आई सोडल्यास दोन्ही घराच्या इतर वडीलधाऱ्यांना या लग्नास काहीच आक्षेप नव्हता, पण पंकज आईच्या शब्दाबाहेर कधीच जात नाही. त्यामुळे केवळ आईच्या म्हणण्यावरून त्याने त्या मुलीशी नातं तोडलं. अर्थात, यामुळे त्याला मानसिक त्रास नक्कीच झाला. पंकज तसा लहानपणापासूनच आईचा पदर धरूनच वाढलाय. पंकजचे वडील नोकरीसाठी नेहमी बाहेरगावी असत. तसेच पंकज हा एकुलता एक असल्याने काळजीपोटी आईने त्याला अतिशय जपून व लाडाने वाढविले, जमेल तेवढ्या सुरक्षित वातावरणात ठेवले. त्यामुळे “आई हेच विश्व” असे पंकजचे होत गेले. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तो आईवर अवलंबून राहू लागला. आईशिवाय पान हालत नाही, अशी त्याची स्थिती झाली. पुढे त्याला १० वीत उत्तम मार्क्स मिळाले. पण आईने सांगितले म्हणून वाणिज्य शाखा घेऊन तो पदवीधर झाला. त्यानंतर त्याला फायनान्समध्ये शिक्षण घ्यायची इच्छा होती, पण आईला दुखवायला नको म्हणून तिच्या म्हणण्यानुसार त्याने सरकारी नोकरी स्वीकारली. पंकज आता ३० वर्षाचा आहे, तरी तो लहान गोष्टींबाबतीत आईवर अवलंबून असतो. तिच्यापासून दूर जायची कल्पनाही त्याला सहन होत नाही. आई नसेल तर आपले कसे होणार, अशी भीती त्याला भेडसावत राहते. आपण स्वतंत्रपणे काही करू शकतो, याबद्दल पंकजला अजिबात आत्मविश्वास वाटत नाही. लहान मूल जसे आईचा पदर धरून चालते त्याचप्रमाणे पंकज मोठे झाल्यावरही जगतो आहे. पंकज Dependent Personality Disorder ने पिडीत आहे. हे त्याच्या आईला आतातरी समजेल का ? आणि त्यापद्धतीने पुढची पाऊलं टाकली जातील का ? कोण जाणे ?


लक्षणे :-
१) अशा व्यक्तींना आपण एकटे पडू अशी चिंता असते. त्यांची काळजी घ्यायला कोणीतरी त्यांच्याजवळ सतत हवे असे त्यांना वाटते.
२) इतरांना आपल्यामुळे काही त्रास झाला तर ते आपल्याला सोडून जातील, या भितीपोटी  ते त्यांच्याशी अतिशय गोडीगुलाबीने वागतात.
३) अशा व्यक्ती स्वतः ला नेहमी दुय्यम स्थान देतात, स्वतःच्या इच्छांचा सहज त्याग करतात.
४) ज्या व्यक्तीवर अवलंबून आहोत, ती व्यक्ती दूर गेली किंवा ते नातं संपुष्ठात आलं, तर अशा व्यक्ती तितक्याच तीव्रतेने नवा आधार शोधू पाहतात. त्यांना स्वतंत्रपणे राहण्याची कल्पनाच सहन होत नाही.
५) अशा व्यक्तींची प्रेमाची, आपुलकीची गरज ही न भागणारी असते.


कारणे :-

वेगवेगळ्या Personality Disorder च्या कारणांमध्ये असे दिसून येते की, वेगवेगळी कारणे एकत्रितपणे येऊन या विकृतीस कारणीभूत ठरतात. त्यापैकी अनुवंशिकता आणि बालपणातील अनुभव हे दोन महत्वाचे पैलू आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे टप्पे म्हणजे बाल्यावस्था व पौगंडावस्था. या दोन्ही टप्प्यांच्या दरम्यान असलेले घरातील वातावरण, पालकांची मुलांशी असलेली वागणूक, बालसंगोपन पद्धती, पालकांचे आपआपसातील नाते इ. सारख्या बाबींचा मुलांच्या उमलत्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. तसेच अन्य सभोवतालीन अनुभवांचाही व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. एकंदरीत शारीरिक पातळीवरील कारणे, कौटुंबिक वातावरण आणि अन्य सामाजिक अनुभव हे सर्व एकत्रितपणे हा आजार उद्भवण्यामागे कारणीभूत होऊ शकतात.


उपचार :-

अश्या काही Personality Disorder च्या उपचारांमध्ये औषधोपचारांव्यतिरिक्त Psychodynamic Therapy, Behavioral Therapy, Cognitive Therapy यांमधील विविध तंत्रे वापरता येतात. कारण अशा आपल्या मित्रांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याने स्वतःच्या आयुष्यातले महत्वाचे निर्णयही ते दुसऱ्यांवर सोपवितात. अशांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी Assertiveness Training हे तंत्र उपयुक्त ठरते. यामध्ये प्रथम म्हणजे स्वतःला गुण-दोषांसकट स्वीकारणे, स्वतःच्या पडत्या बाजू लक्षात घेणे, अति अवलंबून राहून आपले काय नुकसान झाले आहे, आणि पुढे होणार आहे, या दोन्ही टोकांचा तार्किक विचार करून प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात त्याची अंमलबजावणी करण्याचे ध्येये ठरवली जातात. जेणेकरून आपल्या त्या मित्राच्या ठिकाणी स्वतःच्या आजाराविषयी मर्मदृष्टी प्राप्त होऊन लवकरच त्यावर त्याच्याकडून दखल घेतली जाते.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!