बायकोला नको त्या ठिकाणी समजून घेत असाल, तर ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आज सकाळी माझ्याकडे एक केस आली. नवरा-बायको होते. समस्या ही होती की नवरा स्वतःच्या बायकोच्या वागण्याला कंटाळला होता. आल्यावर त्याने स्वतःची तक्रार सांगायला सुरुवात केली. “मॅडम मी पुरता कंटाळून गेलो आहे हिच्या वागण्याने, तिला जे हवं ते मी आणून देतो, कधी काही बोलत नाही तरी सध्याचं हीच वागणं मला त्रासदायक झालय.
न सांगता बाहेर जाण, वारेमाप खर्च करणं, आधी काहीही न सांगता काहीतरी ठरवून मोकळ होण. यातून मला आयत्या वेळी किती प्रॉब्लेम होतात हे तिच्या लक्षातच येत नाही. बरं मी सांगायला गेलो तरी काहीतरी उत्तरे ठरलेलच असतं. तुम्हीच सांगा मी काय करू?”
समस्या जरी बायको बद्दल असली तरी मला तिची बाजू ऐकून घेणं भाग होतं. यावर तिचही काही म्हणणं असणार होतं. म्हणून मी त्यांचं बोलण ऐकुन घेतल व त्यांना थोडा वेळ बाहेर पाठवलं व बायकोशी बोलायला सुरुवात केली. त्यावर तिचं म्हणणं असं-
“मॅडम हे खरं आहे की मला शॉपिंग करायला, पार्टी वगैरे करायला, बाहेर जायला आवडतं. आय लव यु टू एन्जॉय मायसेल्फ आणि माझा हा स्वभाव पूर्वीपासूनच आहे. त्यावेळी तर त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. त्याने कधी साध विचारलं देखील नाही. त्यानेच मला हे freedom of choice दिल. मग आता त्याला हा त्रास का होत आहे? आणि प्रत्येक गोष्ट मी त्याला सांगून का करावी? मी आधी कधी सांगत नव्हते मग आता मी का सांगावं? त्याने मला समजून घेतले पाहिजे.”
मला दोन्ही बाजू बऱ्यापैकी लक्षात आल्या. मी परत नवऱ्याला आत बोलावले बायकोला थोडा वेळ बाहेर पाठवून दिले. बायकोने जे काही सांगितले त्याबद्दल एकदा खात्री करून घेण्यासाठी मी त्यांना त्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं, “हो मला आधीपासूनच तिच्या कोणत्याही बाबतीत ढवळाढवळ करायची सवय नाही.
मी या मताचा आहे की माणसाला त्याच स्वातंत्र्य असावं. तसा तिच्याकडून काहीतरी चूक झाली असली तरी मी त्याकडे माणूस आहे चुका होणार म्हणून दुर्लक्ष करायचो. पण असं चांगल वागून मी काय चूक केली म्हणून आता अस होत आहे?” त्यांचं बोलणं झाल्यावर मी त्यांना म्हणाले, “तुमचा त्रास मी समजू शकते आणि तुम्ही म्हणताय त्यात चूक काही नाहीये.
पण तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल. एक मुलगा लहानपणी एक वस्तू चोरून घरी घेऊन येतो व आईला दाखवतो. आई त्याला काही म्हणत नाही ती गोष्ट कुठून आली याबद्दल काही प्रश्न विचारत नाही. त्यामुळे त्याचं हे वागणं वाढतं. या सगळ्याचा परिणाम असा होतो तो मोठेपणी अटल चोर होतो आणि जेव्हा पोलीस त्याला पकडायला येतात तेव्हा तो आईच्या कानात काहीतरी सांगायचे आहे असे म्हणून आईजवळ जातो व तिचा कान जाऊन तोडतो. त्याच्या वागण्याबद्दल विचारले असता तो असं म्हणतो की, आई लहानपणी मी जेव्हा पहिल्यांदा चोरी केली तेव्हा तू माझा कान पिळला असतास तर मी आत्ता चोर झालो नसतो.”
मला काय म्हणायचे होते हे त्या माणसाला बरोबर समजले. त्याच्या लक्षात आले की बायकोच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याचा, तिच्या अति लाड करण्याचा हा परिणाम होता जो त्याला त्रास देत होता.
मी पुढे म्हणाले, “आपल्या पार्टनरला माणूस म्हणून स्वातंत्र्य देणे, तिची हौस पुरवणे, काही वेळा चुका झाल्या तर दुर्लक्ष करणे त्यात गैर काही नाही. जवळच्या माणसासाठी आपण या गोष्टी करतोच. परंतु या सर्व गोष्टींचा पुढे पण काहीतरी परिणाम होऊ शकतो हेही लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा बायकोकडून चुका होतात तेव्हा तिला रागावून, ओरडून सांगावे का? नाही.
चांगल्या भाषेत सांगून ती चूक पुन्हा होणार नाही याबद्दल काळजी घेता येऊच शकते. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केली होती त्याचे तोटे होतात. मग ती चांगली असू दे किंवा वाईट. जर आपण एकादशी बिनदिक्कत वागत राहिलो तेव्हा त्यांना तसेच सोडुन दिली तर ती व्यक्ती आपल्याला गृहीत धरण्याची शक्यताही वाढते. समोरची व्यक्ती आधी काही बोलली नाही आता ही समजून घेईल हा विचार पक्का बसतो.
त्यातून या गोष्टी होतात. आपण ते काही वागत असतो त्याचा समोरचा व्यक्ती काहीना काही ना काही अर्थ काढतच असते. जो तिच्या दृष्टीने योग्य असतो. तुम्ही त्यांच्याशी कठोरपणाने वागावं, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला, आवडीनिवडीला मुरड घालावी असं अजिबातच नाही. पण जिथे मार्ग चुकत आहेत तिथे एक पार्टनर म्हणून त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे तुमचं कर्तव्य आहे. ज्यातून तुमच्या दोघांचा संसार नीट होऊ शकतो.” आमच्या बोलण्यातून त्यांना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या.
अर्थात ही समस्या एका भेटीत सुटणारी नव्हती. समस्या दोघांमध्ये होती त्यामुळे दोघांचे त्यात सहभाग असण आवश्यक होतं. बायकोचे नवऱ्याबदलचे जे विचार पक्के झाले होते तेही बदलायला लागणार होते. जसे की मी काहीही केलं तरी तो बोलणार नाही, त्याने समजून घ्यायला हवं. पण इथे आपण त्याच्या चांगुलपणाचा गैरसमज तर करून घेत नाही ना? आपल्या वागण्यातून काय समस्या निर्माण होतील? हेही लक्षात आणून द्यायला लागणार होत आणि त्यासाठी अजून काही भेटी आवश्यक होत्या ज्या मी केल्या व त्यातून ही समस्या सोडवली.
नवरा-बायकोचं नातं हे समानतेवर आधारलेल असत. ज्यात एकमेकांबद्दल आदर, प्रेम, विश्वास, स्वातंत्र्य या सर्व गोष्टी येतात. परंतु कोणतीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत ठीक असते. पूर्णपणे चांगलं किंवा पूर्णपणे वाईट झालं की त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जवळची व्यक्ती म्हणून आपण त्यांच्या चुका पोटात घालत असू, अतीलाड, अतिप्रमाणात स्वातंत्र्य देत असू तर त्यातून आपले आणि त्या व्यक्तीचे नुकसान होणार आहे. म्हणून नवरा-बायको म्हणून राहत असताना हे नातं फुलवायला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहे त्या प्रमाणात असू द्या त्याचा अतिरेक झाला तर नुकसान होणार.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला