Skip to content

वयात आलेल्या मुलांची प्रेम प्रकरणं आणि पालकांसमोरचं आव्हान!

वयात आलेल्या मुलांची प्रेम प्रकरणं आणि पालकांसमोरचं आव्हान!


सोनाली जे.


वयात आलेल्या मुलांच्या मध्ये जसे हार्मोन मध्ये बदल घडू लागतात तसे मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांविषयी आकर्षण वाटू लागते. अगदी पुढं जावून माझे त्याच्यावर प्रेम आहे , तिच्यावर प्रेम आहे असे मित्र मैत्रिणी , आई वडील यांना सांगतात ही मुले मुली .

१. बाह्य रूपाचे आकर्षण आणि प्रेम :

काही वेळेस या मुला मुलींच्या मध्ये केवळ बाह्य रूपाचे आकर्षण असते. जसे की एखाद्या मुलाची उंची , दिसायला handsome असा तो . नाक सरळ , किंवा त्याने मेन्टेन केलेली त्याची body ..physic . जिम असेल किंवा फिटनेस क्लब. एखाद्याची दाढी मिशी असेल . किंवा त्याचा नीट नेटका पेहराव असेल त्याकडे मुली आकर्षित होतात. आवाज बोलणे मंत्रमुग्ध करणारे असेल.

तसेच एखादी सुंदर , आकर्षक फिगर असलेली मुलगी असेल, तिचे डोळे पाणीदार काळेभोर असतील, नाक चाफे कळी असेल , पेहराव आकर्षक असेल , रंगसंगती ,हलका मेक अप असेल, तर चालणे बोलणे , असेल.

आणि त्यातून ओळख करून घेण्याचा प्रयत्न . बोलणे सुरू झाले की तेच प्रेम ही अशी समजूत करून घेतात.

२. अंतरंग स्वभाव आणि प्रेम

हुशारी , कर्तबगारी , समजूतदारपणा, भावना समजून घेणारी , कायम मदतीस तत्पर , अश्या मुला मुलींच्या मध्ये ही हळूहळू आकर्षण आणि मग स्वभाव जुळू लागतात म्हणजे प्रेम ही भावना निर्माण होते.

खरे तर जेव्हा वयात आलेल्या मुलांची प्रेम प्रकरणं घरी समजतात तेव्हा ते पालकांसमोरचं आव्हान च असते. का बरे ?

अल्लडपणा : या वयात येणाऱ्या मुलांना असे वाटत असते की आपण आता मोठे झालो आहोत. आपण करतो ते बरोबर आहे. व्यक्तींची पारख नसते. जगाचा अनुभव नसतो. प्रवाह वाहत जातो तसे वाहत जातात . आई वडिलांना जेव्हा त्यांची प्रेमप्रकरणे समजतात तेव्हा ते मुलांना समजविण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा immature वयात मुलांना ते accept होत नाही.

आई वडील जे सांगतात ते तात्पुरते त्यांना पटते. पण परत, ” ये रे माझ्या मागल्या अशीच अवस्था होते. ”

बरं प्रत्येकवेळी आई वडिलांनी विरोध केला , मुलांना सतत समजावले , ओरडले ,रागावले त्यांच्यावर बंधने घातली गेली तर, किंवा बोलण्यावर , भेटण्यावर जेवढी कडक restrictions घालतील तेवढे ते त्यातून पर्याय शोधतात. चोरून भेटण्याचा , बोलण्याचा किंवा प्रसंगी आई वडिलांशी खोटे बोलून ही ते प्रयत्न करत असतात.

आई वडील आपल्या हिताचा विचार करतात किंवा आई वडील यांना जास्त अनुभव आहेत , वयाने ही प्रगल्भ आहेत . आपल्या पेक्षा जास्त पावसाळे खाल्ले आहेत याचा विचारच करत नाहीत. वयात आलेली मुले प्रेमात पडली की आई वडील जो विरोध करतात मुलांना तो बघून आई वडील आपले शत्रूच आहेत असे समजू लागतात ही मुलं आणि त्यांना काही सांगणे ही बंद करून टाकतात.

आई वडील जरी सांगत असतील की हे शिक्षणाचे वय आहे, आपल्या पायावर उभे राहून आधी काही तरी goal achieve करा हे सांगणे असते. प्रेम हे योग्य वयात आणि योग्य व्यक्तीशी होणे गरजेचे. नुसते वरवर दिखावा असतो त्यावर भुलून प्रेम होत नसते.

आई वडील हेच पदोपदी सांगण्याचा प्रयत्न करत असतात की , ” दुरून डोंगर साजरे ” जशा दुरून चांगल्या गोष्टी दिसतात तसे अतिशय जवळ गेल्यावर , रोजचे झाल्यावर किंवा बंधनात अडकले की मग एकमेकांचे गुण दोष दिसू लागतात. समजू लागतात.

मग वाद विवाद , भांडणे , एकमेकांशी न पटने अशा गोष्टी होतातच , शिवाय कमतरता , उणिवा असतात त्याही जाणवू लागतात. मग जसे कधी आर्थिक गोष्टीत स्थैर्य नसेल, भावनिकदृष्ट्या समजून घेत नसेल, एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेत नसतील तर असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. त्यातून मग वाद , कधी चुकीचे मार्ग , व्यसने असे विविध प्रकार घडू शकतात.

हे अनुभव माहिती असतात, बघितले असतात म्हणून पालक आपल्या मुलांना योग्य वयात म्हणजे जेव्हा तारतम्य येईल , maturity वाढेल , थोडे फार अनुभव येतील लोकांचे , स्वभावाचे अंदाज येतील , कोण कसे वागते हे समजेल. आपण कसे वागावे हे कळेल अशावेळी त्यांनी प्रेम , लग्न या गोष्टींचे विचार करावेत असे पालकांचे मत असते.

आता जे वय आहे ते नवनवीन गोष्टी शिकण्याचे , ते उपयोगात आणण्याचे आहे. अनुभव घेण्याचे आहे.

आणि योग्य त्या वयात त्या त्या गोष्टी करणे , होणे गरजेचे असते. अर्थात अगदी शाळेपासून एकत्र असणारी मित्र मैत्रीण ही पुढे जावून लग्न बंधनात अडकली आहेतच. आणि छान ही सुरू आहे त्यांचे. पण सगळ्यांच्या बाबतीतच असे घडेल असे नाही ना. त्यामुळे व्यक्ती आणि त्यांचा स्वभाव , गुण दोषांची पारख करता येणे जरुरी असते.

बरं काही मुलं आणि मुली यांची मानसिकता अशी आहे सध्या त्यात काय होते आमचे प्रेम पण आता पटत नाही , जुळत नाही , जमत नाही , दिले सोडून , आणि सोडले याची खंत राहते बाजूला. उलट दोन दिवसात यांना अजून कोणाबरोबर प्रेम होते ..कसे शक्य आहे ? असे म्हणतात की अगदी जवळची व्यक्ती कायम साथ , सोबत असेल तरी कित्येकवेळा समजत नाही .

तर एखाद्या क्षणी ती पटकन ही समजते. पण आजकालचे हे इन्स्टंट जग त्यात कोणाकडे पेशंस च नाहीत. भातुकलीच्या खेळात जसे क्षणात संसार मांडतात तसे हे क्षणात तोडतात ही. वाईट राहिले बाजूला पण भावना दुखावणे , मानसिक त्रास या गोष्टी अनेकदा क्षणिक असतात. दुसऱ्या क्षणी सगळे विसरून मुले दुसऱ्या मुलीच्या मगीगतील तर मुली दुसऱ्या मुलाचा शोध घेतील.

आई वडिलांचे प्रयत्न हेच असतात की नाती , जोडीदार हे विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. प्रेम हे ठरवून जरी होत नसले तरी प्रेमात मुलांनी एव्हढे ही आंधळे होवू नये की सर्वस्व गमावले तरी त्यांना काही फरक पडू नये .

अशी पिढी घडू नये. याकरिता पालकांच्या समोर कायम आव्हान असते. कोणतीही नाती लाँग टर्म असावीत . म्हणजे त्या नात्यात आपलेपणा , काळजी , प्रेम , माया आणि काही वेळेस द्वेष ही जसे आपल्या पार्टनर कडे दुसऱ्या कोणी बघितले की तो द्वेष निर्माण होतो. माझे आहे ही भावना , possessiveness जागा होतो. पण हेतू वाईट नसतो त्यात प्रेम , हक्कच , आपलेपणा व्यक्त होत असतो.

पण हे पालकांना खूप मोठे आव्हान असते की मुलांना समजून सांगणे . आणि मुलांनी ते समजून घेणे. क्षणिक गोष्टीच्या मोहात पडू नये याकरिता ते समजावत असतात. होणारे परिणाम , पुढचे भवितव्य , आपत्कालीन प्रसंग याकरिता सिद्ध होण्याची गरज हे आई वडील सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

वयात आलेल्या मुलांची प्रेम प्रकरणं आणि पालकांसमोरचं आव्हान! हे दोन्ही हाताळणे कठीणच असते. मुलांना आपले आई वडील कट्टर वैरी आहेत असे वाटत असतें. अर्थात जर ते मुलांच्या बाजूचे असतील. हो ला हो करणारे तर ते चांगले. पण पालकांनी थोडा जरिविरोध केला किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते वाईट असेच अनुभव येत जातात.

वयात आलेल्या मुलांची प्रेम प्रकरणं आणि ते नाजूक पद्धतीने हाताळणे , भावना न दुखावता हाताळणे , मुलांनी कोणते आक्रमक पावूल उचलू नये याची काळजी ही घ्यावी लागते. जसे घरातून पळून जाणे असेल , व्यसनाधीन, किंवा पळून जावून लग्न असेल किंवा विरोध होतो म्हणून आत्महत्या यासारखे घातक प्रकार होवू नयेत ते टाळले जावे म्हणून या गोष्टी खूप नाजूकपणे हाताळणे गरजेचे असते. आणि खरे तर ते असते ते सगळ्यात मोठे पालकांसमोरचं आव्हान!

आयुष्य सुंदर आहे. प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार जगण्याचा , करण्याचा अधिकार आहे. खरे प्रेम आणि नुसते बाह्य आकर्षण यातला फरक समजून सांगणे म्हणजे पालकांना आव्हानच असते.

पण आपले पालक हे कायम आपल्या हिताचा विचार करणार ही गोष्ट कायम लक्षात ठेवणे गरजेचे. ते आपले आहेत म्हणून त्यांना आपली काळजी असते. परक्या लोकांना काय गरज आहे काळजीची ??


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “वयात आलेल्या मुलांची प्रेम प्रकरणं आणि पालकांसमोरचं आव्हान!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!