एकानेच नात शेवटपर्यंत टिकवण्याची वेळ का यावी?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
रुही आणि विहान, दोघे एकमेकांवर खुप प्रेम करत होते. जवळपास चार वर्षं नात्यात राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस, तो काळ छान जात होता. परंतु जसजसा काळ पुढे जात होता तसतसे वरचेवर खटके उडू लागले. जे स्वभाव, आवडीनिवडी त्यांना सुरुवातीच्या काळात आकर्षित करत होत्या, एकमेकांच्या जवळ नेत होत्या त्यातूनच आता वाद होऊ लागले.
इतकं होऊनही रुहीला मात्र त्यांच नातं पूर्वीसारखं व्हावं, चांगल टिकाव असं वाटत होतं. त्यासाठी ती प्रयत्न पण करायची. जरी वाद झाले तरी त्यातून काही मार्ग काढण असेल किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये समजून घेणं असेल, माघार घेण असेल अस ती करायची. तिच्यामध्ये हे नातं टिकवण्यासाठी धडपड दिसून येत होती. परंतु विहानमध्ये हे दिसून येत नव्हत. जितके प्रयत्न रूही करत होती या नात्यासाठी तितका प्रयत्न, तसा प्रतिसाद विहान कडून येत नव्हता. असं का होत असावं?
जे रूही आणि विहान बाबत दिसून येतं, आपल्याला बऱ्याच नात्यांमध्ये पाहायला मिळत. अनेक वर्ष नवरा-बायकोमधील कुणीतरी एकच व्यक्ती नात टिकवण्याची धडपड करत असते व ती एकटीच ते नातं टिकवून ठेवते. परंतु समोरच्या व्यक्तीकडून तसं काही होताना दिसत नाही. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये जरी कितीही भांडण असली, मतभेद होत असले त्रास होत असला घरी त्या नवरा-बायकोचं नातं कधी तुटत नाही. कारण दोघांमधील एकाला तरी हे नात टिकाव अस वाटत असतं. तिच्या दृष्टीने प्रयत्न करत राहते. पण असं का व्हावं? फक्त एकाच व्यक्तीवर नातं टिकवण्याची वेळ का येत असावी? याला पण काही कारणे आहेत.
पहिल म्हणजे जेव्हा दोन व्यक्ती एखाद्या नात्यामध्ये असतात तेव्हा केवळ एका व्यक्तीला हे नातं महत्त्वाचं वाटतं असतं तितकं समोरच्या व्यक्तीला वाटत नाही. तेवढे महत्त्व त्यांना त्याला दिलं जात नाही. त्या व्यक्तीला दिलं जात नाही. जर एखाद्या माणसाला त्या गोष्टीचं महत्त्व नसेल तर त्यासाठी ती प्रयत्न तरी का करेल? नात्यांमध्ये असंच होतं.
बायकोला ते नातं खूप महत्त्वाचं वाटत असेल तर ती ते टिकवून ठेवायचा प्रयत्न शेवटपर्यंत करते. परंतु नवर्याला त्यातील गांभीर्य, महत्त्व कमी असेल तर तो त्यासाठी प्रयत्न करणार नाही. हे चित्र उलटही असू शकत. म्हणजे नवऱ्याला जेवढे नात महत्वाचं वाटत असेल तेवढे कदाचित बायकोला वाटत नाही आणि म्हणून जेव्हा मतभेद होतात तेव्हा ते कमी करण्याचे प्रयत्न पण एकाकडून होतात.
ही झालं नात्याबद्दल महत्त्व असण. अजून एक गोष्ट म्हणजे जर नातं टिकवायचं असेल तर मुळात आपल्यामध्ये कितीही मतभेद झाले, तणाव निर्माण झाला, वाद झाले तरी ते सोडवून पुढे जाता आलं पाहिजे. तर ते नात टिकत.
पण इथेसुद्धा अनेकदा गोंधळ होतो. ते कसं? तर जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा जसे समोरच्या व्यक्तीकडून चूक होऊ शकते, त्याचे विचार वेगळे असू शकतात तसे माझे विचार, माझं वागणं पण चुकू शकत हा acceptance यायला पाहिजे. मी पण चुकू शकत, माझ्याकडून पण काहीतरी कमी पडलं असावं हे मान्य करता आला पाहिजे. हे होताना दिसत नाही.
जेव्हा एकच व्यक्ती नातं टिकवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती स्वतःच्या चुका मान्य करत असते, माघार घेत असते ही वृत्ती, हा समजूतदारपणा समोरच्या व्यक्तीकडून येताना दिसत नाही. माझी काही चूक असूच शकत नाही आणि मी जर काही चूक केली नाही तर त्याची जबाबदारी तरी मी का घ्यावी? असा त्यांचा दृष्टिकोन असतो. अशा व्यक्ती कधी माघार घेत नाहीत. आपलं ते खर मानत असतात. त्यामुळे ती नात टिकवायला पुढाकार घेत नाही. साहजिक ही जबाबदारी एकावर येऊन पडते.
जर दोन व्यक्तींना आपलं नातं टिकवायचं असेल तर त्यात एक बॅलन्स निर्माण करावा लागतो. जाणीवपूर्वक करावा लागतो. आता हा कसा करणार? तर समोरच्या व्यक्तीला आहे तस स्वीकारून, आपल्या कडून काही चूक झाली तर मान्य करून, समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन, त्याच्या आवडीनिवडी, विचार समजून घेऊन, दोघांनी या नात्याला पुरेसा वेळ देऊन, महत्त्व देऊन, त्यावर बोलून हा समतोल साधता येतो आणि हे सर्व प्रयत्न दोघांकडून व्हावे लागतात. जेव्हा अस होत नाही तेव्हा फक्त एकच व्यक्तीवर नात टिकवायची वेळ येते.
नात्यामध्ये हा समतोल, चूक भूल द्यावी घ्यावी अशी वृत्ती लागते. ती कोणा एकामध्ये असते त्यामुळे अस होत. म्हणून जर नातं छान टिकवायचं असेल तर दोघांनीही त्याला तितकच महत्त्व दिले पाहिजे. काही प्रसंगी माघार घेतली पाहिजे, काही प्रसंगी पुढाकार घेतला पाहिजे. तर ते नात छान फुलतं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
