‘अंगात येणे’ ही संकल्पना आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिकदृष्ट्या पवित्र मानली जाते. परंतु या संकल्पनेच्या मागे फार मोठा शास्त्रीय आधार दडलेला आहे. ज्या व्यक्तींकडून या गोष्टींचा अतिरेक होतो, ते पुढे जाऊन या विकृतीला बळी पडतात. म्हणजेच अंगात आले की केलेले पाप धुतले जातात, नवस पूर्ण होतो, इच्छा पूर्ण होतात, सद्द्यस्थितीतल्या गंभीर समस्या सुटतात, स्वर्गवास होतो, आपण देवांचे अनुयायी बनतो अशा भ्रामक आणि अवास्तव कल्पनांना ते बळी पडतात. अशा अतार्किक गोष्टींवर केवळ त्यांचाच ठाम विश्वास असावा असे त्यांना वाटत नाही तर ते इतरांनाही या गोष्टी करण्यासाठी उत्तेजीत करतात. अशा व्यक्तींनी धार्मिकदृष्ट्या स्वतःला इतके वाहून घेतलेले असते कि, आयुष्यातले अत्यंत सोपे प्रश्न सुद्धा अंगात आल्यानंतर किंवा अंगात आलेल्या व्यक्तीचे दर्शन घेतल्यानंतरच सुटतात, याविषयी ते इतरांनाही बळजबरी करताना दिसतात. मनाच्या अबोध अवस्थेतून व्यक्तीच्या ठिकाणी अश्याप्रकारची उत्तेजना निर्माण होतात, ही उत्तेजना कालांतराने शांत होऊन व्यक्तीला बरे जरी वाटत असले तरी वारंवार अशाप्रकारची उत्तेजनाविषयी व्यक्तीमध्ये आकर्षकता ही वाढते. एकंदरीत याठिकाणी व्यक्ती हि स्वसंमोहीत होते. अश्यावेळी चटके जरी दिले, तरीही त्याची जाणीव व्यक्तीला होत नाही. कारण अबोध मनात प्रवेश केल्यानंतर व्यक्तीच्या जाणीवा आणि संवेदना या तात्पुरत्या बधिर होतात. ही आपल्या मनाची एक अवस्था आहे, आपण प्रत्येकजण झोपेच्या गाढ अवस्थेत याचा अनुभव घेत असतो.
लक्षणे :-
१) या विकृतीने ग्रस्त व्यक्तींमध्ये धार्मिकतेच्या संदर्भात अतिरेक आढळून येतो. तसेच खराखुरा अंगात आलेला व्यक्ती समोरच्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, कारण त्याच्या जाणिवा या तात्पुरत्या बधीर झालेल्या असतात.
२) अशा व्यक्ती मनाने अतिशय कमजोर असतात. आयुष्यातले अत्यंत क्षुल्लक निर्णय सुद्धा ते देवदेवतांवर सोपवितात.
३) अशा व्यक्तींचे स्वतःच्या मनावर नियंत्रण नसते. त्यांनी ते मन काल्पनिक देवांना जणू दानच केलेले असते.
४) धार्मिक स्थळी यांचे वर्तन उल्हासित आणि उत्साहीत आढळून येते. त्यामुळे अशा व्यक्ती क्षणार्धात बाबा-बुवा यांना बळी पडतात.
५) अशा व्यक्तींच्या अबोध मनात देवदेवतांचे राज्य असते, त्यामुळे त्यांना सतत देवदेवतांचे स्वप्न पडतात.
६) अंगात आल्यानंतर अशा व्यक्ती बेभान होतात, त्यांना चटका किंवा जखम जरी झाली तरी याची जाणीव त्यांना होत नाही, मात्र शरीरावरच्या जखमा प्रकर्षाने दिसतात.
कारणे :-
१) लहानपणापासून धार्मिक वातावरणाच्या छायेत वाढल्यामुळे अबोध मनातील संघर्षांना मोकळी पायवाट म्हणून अशा व्यक्तींच्या अंगात येते.
२) सभोवतालचे वातावरण धार्मिक असल्यास किंवा मनातील वातावरण धार्मिक झाल्यास या व्यक्तींच्या अंगात यायला सुरुवात होते, या सर्व गोष्टी मेंदूतील रसायनांमध्ये असमतोल झाल्याने उद्भवतात.
३) अनुवंशिकतेमार्फत हा आजार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होऊ शकतो.
४) पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी या आजाराचे प्रमाण जास्त आहे, याचे कारण इच्छा आणि आकांक्षा दाबून टाकण्याच्या क्रमांकात स्त्रिया या अव्वल आहेत.
५) दैनंदिन जीवनात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टी जेव्हा व्यक्ती नशिबाशी जोडतात, त्याचा अतिरेक करतात, तेव्हा त्यांच्या ठिकाणी अश्या पद्धतीचा आजार होण्याची शक्यता वाढते.
उपचार :-
१) संमोहन तंत्रामार्फत त्यांच्या अबोध मनातील दडपलेल्या इच्छा यांना मोकळी पायवाट करून दिली जाते, ज्यामुळे व्यक्तीचे मन हे त्याच्या नियंत्रणात येते.
२) वेगवेगळ्या Meditation मार्फत विचार, भावना आणि कृती यांमध्ये योग्यता आणण्याचा प्रयत्न केला जातो.
३) काही औषधोपचारानेही व्यक्तीतील Hyper Behaviour नियंत्रित केला जाऊ शकतो.
४) तसेच व्यक्तीमधील वाढलेला अति धार्मिकपणा यांवर वेगवेगळ्या Psychodynamic Treatment द्वारे उपचार केले जाऊ शकतात.
५) आपल्या हिंदू संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे आयुर्वेदीक उपचार पद्धतीचाही खूप चांगला फायदा अशा व्यक्तींना होतो.
टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते
फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !
अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे. माझ्या गावामध्ये कुलदैवताच्या जागर-गोंधळ कार्यक्रमात घडलेल्या अमानवीय कृती पाहून मी फार अस्वस्थ झालो आहे. अनेक तरुण मुलांच्या अंगात आहे होते. आपण माझ्या गावात येऊन एखादे सत्र घेऊ शकाल काय?