Skip to content

सतत रडणारी बायको असेल तर तिची समजूत कशी काढावी..?

सतत रडणारी बायको असेल तर तिची समजूत कशी काढावी..?


हर्षदा पिंपळे


लग्न झालं नी संसार सुरू झाला की एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात होते.आणि संसार म्हंटल की भांड्याला भांड लागायचच.एकमेकांचे कधी ना कधी छोटे -छोटे खटके उडणारचं.जरी पत्रिकेतील छत्तीस गुण जुळले तरी आयुष्यातील सगळ्याच आवडी निवडी जुळतात असं नाही.आणि मग काय अशा कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांमध्ये कुरबुरी होणं अगदीच स्वाभाविक आहे. इतकच नाही तर कधी कधी एकमेकांची समजूत काढणही शक्य होत नाही.

आणि अनेकजण म्हणतात की बायकोची समजूत घालणं तर फारच कठीण…! तिला केव्हा काय होतं काहीच सांगता येत नाही. कोणत्याही कारणावरून ती रूसून बसते,चिडचिड करत राहते,सतत रडत बसते.तिला समजून घेणं मग एखादं दिव्य वाटायला लागतं.कारण कशीही समजूत घातली तरी ती ऐकायलाच तयार नसते.अशावेळेस एक गाणं हमखास आठवतं.ते म्हणजे—-

नाकावरच्या रागाला या औषध काय…?
गालावरच्या फुग्यांच म्हणणं तरी काय…?

कळत नकळत चित्रपटातील हे गाणं बायकोसाठी अगदी तंतोतंत लागू होत असावं.काय करावं हे कळत नाही आणि तिला काय बोलायच असतं तेही समजत नाही. इतकी सतत रडते नी सतत चिडते.

काय झालं असं तिला विचारायला जावं तर ‘काही झालं नाही’ असं म्हणून मोकळी होते.तर कधी ‘काय झालं नाही ते विचारा’ असही म्हणायला ती कमी करत नाही. खरच तिला समजून घेताना नवऱ्यांची नक्कीच गोची होत असणार. अनेकदा तिला कसं हँडल करावं तेच कळत नाही.फार फार तर बाईक किंवा कार हँडल करू शकतो पण बायकोला हँडल करणं म्हणजे कठीणच…! तिची समजूत कशी काढायची हेच कळत नाही.चला तर मग काही गोष्टी करून पाहूयात जेणेकरून सतत रडणाऱ्या बायकोची समजूत निघू शकेल.

रडण्याच , चिडण्याच कारण बायको सहजासहजी सांगणं काही शक्य नाही. त्यामुळे तिच्या रडण्यामागच नेमकं कारण काय असेल ते समजून घ्या.

तिला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करण्याला प्राधान्य द्या. तिने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींच आवर्जून कौतुक करा.तिला त्या छोट्या छोट्या गोष्टीतही फार मोठ्ठ समाधान मिळतं. एखादी भाजी नसेल आवडत तरी तिने प्रेमाने बनवली म्हणून थोडी तरी खा. तुझ्या हाताला खरच चव आहे असं आनंदाने सांगा.

बायकोला कधीतरी निवांत फिरायला घेऊन जा.तिला आवडेल त्या ठिकाणी मनसोक्त वेळ घालवा. शक्य असल्यास कधी तिच्या आवडीचा सिनेमा किंवा नाटक पहायला जा. शांत ठिकाणी मोकळा सुसंवाद साधा.

शक्य होईल तितका वेळ बायकोसाठी द्यावा.कारण नात्यात वेळ देणेही खूप महत्त्वाचे ठरते.वेळेमुळेच एकमेकांना समजून घेणं सहज सोपं होतं. तिच्यासाठी चार प्रेमाने प्रेमाच्या गोष्टी कराव्यात. कधीतरी एखादं फूल द्यावं , चॉकलेट द्यावं.तिचं राग – रूसणं चॉकलेटसारखच सहज विरघळून जातं.

कधीतरी स्वतःच्या हाताने चहा – कॉफी बनवून द्यावी. जेवण बनवायला थोडी मदत करावी.

असं म्हणतात , बायकांच मन शॉपिंगकडे जास्त आकर्षित करतं.त्यामुळे तिच्यासोबत शॉपिंग करायला जा.तिने काही घेतलं तर छान आहे हे असं म्हणून थोडं कौतुक करा.जर आवडल नाही तर शांत शब्दात समजून तिला पटवून द्या की ते का चांगल नाही.

उगाचच तिच्यावर ओरडण्यापेक्षा जरा प्रेमाने , तिच्या कलाने घ्यायला शिका. तिला काय हवं नी काय नको ते समजून घ्यायचा प्रयत्न करा.तिला जे आवडत नाही ते प्रकर्षाने टाळायचा प्रयत्न करा. काय रडायच ते रड असं बोलण्यापेक्षा थोडं समंजसपणे घ्यावी. सारख रडणं चांगल नाही हे तिला पटवून द्या.

तुला खटकतील अशा गोष्टी मी स्वतः टाळेन हे तिला समजावून सांगा. माझं चुकलं तर हक्काने माझे कान पिळ पण रडू नको असं प्रेमाने सांगा.

थोडक्यात काय तर बायकोच्या कलाने गोष्टी घ्यायचा प्रयत्न करा.तिला आनंद वाटेल , तिला ज्यामध्ये उत्साह असेल ते करण्याला प्राधान्य द्या. तिचं रडणं-रूसणं कमी होईल. थोडस कठीण आहे तिला समजावणं पण अशक्यही नाही….!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!