Skip to content

सत्र दहावे :- भूत अंगात येणे (Devil to Come Round)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)


सत्र दहावे :- भूत अंगात येणे (Devil to Come Round)


भिती ही एक सर्वसामान्य जणांची स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आहे. कुणा अमुक व्यक्तीला भिती नाही, अशी एकही व्यक्ती या पृथ्वीतलवार आज तरी उपस्थित नाही. सामान्य भितीमुळे आपल्याला येणाऱ्या संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना ही आधीच मिळते, त्याप्रमाणे मग आपण हालचाली सुरु करतो. जसे परीक्षेला एक महिना शिल्लक आहे, अभ्यास नाही केला तर आपण नापास होऊ. म्हणजेच नापास होऊ ही भिती ओळखून आपण अभ्यास करतो. अगदी तसेच आक्रमक आणि काटेकोर व्यक्तींच्या छायेत आपले वर्तन आकार घेत असते. पण जेव्हा हीच भिती पराकोटीला गेली तर काय होईल ? आणि ती काल्पनिक भुतांच्या बाबतीत असेल तर ? म्हणजेच कुणा एका भुताने तुम्हाला झपाटले आहे का ? तुम्ही कुणाला झपाटताना पाहिले आहे का ? विचार करताच क्षणी आपण गांगरून जातो. मनात पहिली भिती उत्पन्न होते. आत्तापर्यंतचे सर्व जुने देखावे चटकन डोळ्यासमोर येतात. पण घाबरू नका ! आपण अपसामान्य भिती बद्दल बोलत आहोत. एक अशी भिती की तुम्ही तुमच्या घरी झोपले आहात. अचानक मध्यरात्री तुम्हाला अशी जाणीव होते की माझ्या अवतीभवती १ किमी पर्यंत कोणीच व्यक्ती नाही. अचानक तुम्हाला तुमच्या समोर एक सावली दिसते. आणि ती सावली तुमच्या शरीरात प्रवेश करते, यावर तुमचा ठाम विश्वास बसलेला असतो. म्हणून तुमच्या भितीदायक मनाकडून जन्मलेली सावली ही आणखीन गडद होत जाते. मग तुम्ही विचित्र हालचाली आणि आवाज तोपर्यंत काढत राहता जोपर्यंत तुमच्या भितीदायक मनाचं समाधान होत नाही ! आपले डोळे तेच पाहतात जे आपलं मन दाखवतं.


केस :-
सुमित्रा वय वर्ष ३५. अत्यंत मनमिळावू आणि नेमक्या भावना व्यक्त करणारी एक विवाहीत स्त्री आहे. जे काही ती पाहते, वाचते किंवा ऐकते याचा तिच्या मनावर खोल परिणाम घडून आलेला आहे. जसे कि एखादा भावनिक प्रसंग पाहून डोळ्यातून अश्रू येणे, दचकणे, आवाजाकडे पटकन मान वाळविणे ई . एके दिवशी मध्यरात्री सुमित्रा बाथरूमसाठी उठली असताना पहिल्यांदा तिला तिच्या आयुष्यातला तो प्रसंग अनुभवायला मिळाला. बाथरूम वरून परतल्यानंतर सुमित्राच्या मानेवर नखाने ओरबाडलेले निशाण सापडले तसेच कपाळातून रक्तही येत होते. हे सर्व पाहून घरातली सर्व मंडळी भितीने कापून उठली. खरंतर या घटनेमागे कुठलीही बाहेरची बाधा नसून सुमित्राच्या अबोध मनाची ही एक अवस्था आहे. अशी भितीदायक अवस्था ज्या अवस्थेने सुमित्राला मध्यरात्री बाथरूमसाठी उठविले आणि त्याच अवस्थेने सुमित्राकडून भिंतीवर डोके आपटणे आणि स्वतःच्याच नखाने मानेवर इजा करणे इ अबोध मनातील दडलेल्या इच्छा आणि संघर्षांना मोकळी पायवाट करून दिली. सुमित्राच्या अबोध मनातील भितीदायक भावना, इच्छा, संघर्ष इतक्या तीव्र प्रमाणात दबल्या होत्या कि त्या आता विकृत स्वरूपात बाहेर पडत होत्या. एकंदरीत त्या विकृत भावना कधी बाहेर पडतील, याची जाणीवही तिला आता नव्हती आणि त्यावर नियंत्रणही नव्हते. त्या रात्री नेमके काय घडले हे सुमित्राला काहीच आठवत नाही, अशी एक मनाची अवस्था जिचा सहन करण्याचा पारा वाढला की तो पारा शमविण्यासाठी ‘एकदाचं होऊन जाऊ दे’ या स्वरूपात आपल्या मनाची अबोध अवस्था ती इच्छा-आकांक्षा पूर्ण करून घेते. या सर्व गोष्टी आपल्या नकळत घडत असतात. जाणिवेच्या कक्षेच्या बाहेर असल्यामुळे चमत्कार, देव, भूत, भानामती इ. गोष्टींवर आपला चटकन विश्वास बसतो. जसा सुमित्रा आणि तिच्या घरातील मंडळींचाही बसला. हा एक केवळ अबोध मनातील दडलेल्या इच्छा, यातना, भितीदायक भावना, क्लेशकारक भावना यांचा एकत्रित समुच्चय असून तो निव्वळ समजून घेण्याचा विषय आहे, हे लक्षात घेऊन आता  तरी अंधश्रद्धेच्या अघोरी प्रथा थांबतील का ? कोण जाणे ?


लक्षणे :

१) संध्याकाळ झाली की अश्या व्यक्तींच्या मनाचा थरकाप उडायला लागतो. रात्र होऊच नये अशा व्यक्तींना सदैव वाटत असते.
२) या व्यक्तीसोबत सतत कोणत्यातरी देवाचा फोटो असतो, आणि सारखे त्या देवाचे नामस्मरण करीत असतात किंवा प्रार्थना स्थळी ते आढळतात.
३) अत्यंत तीव्र केसमध्ये या व्यक्ती स्मशानभूमीत तासनतास जाऊन बसतात किंवा झाडाखाली आढळतात.
४) आपल्या मनातील भितीवर उपाय म्हणून इतरांना घाबरविण्यासाठी त्यांच्या अंगात भूत संचारतो, आणि त्या मनाचे समाधान झाले की भूत निघून जातो, ही एक आपल्या मनाची अबोध अवस्था आहे.
५) मध्यरात्री अचानक जाग येणे, अवास्तव सावली दिसणे, त्या सावलीचा शरीरात प्रवेश होणे, बाहेरून कोणीतरी आवाज दिल्याचे ऐकू येणे, पैंजणाचा आवाज येणे अशा भितीदायक भावनेने त्यांचे मन संपूर्ण व्यापलेले असते, त्यामुळे त्यांना तशा पद्धतीची स्वप्नेही पडतात. पुढे हळू-हळू अशा व्यक्तींचा अस्तित्वापासूनचा संपर्क तुटू लागतो.


कारणे :

१) भितीदायक भावना याची सुरुवातच घरातून आणि आजूबाजूच्या परिस्थितून उत्पन्न होते. एकंदरीत अंधाराला घाबरायला हवं, याचे जणू प्रशिक्षण प्रमाणपत्रच आपल्याला मिळालेले असते.
२) अतृप्त इच्छा असलेल्या व्यक्ती मृत्यू नंतर इतरत्र भटकतात, याचे संस्कारच आपल्याला लहानपणापासून मिळाले आहे,  म्हणून आपल्याही असंख्य इच्छा या अपूर्ण राहिल्या आहेत, याची दाखल घेऊन आपलं अबोध मन जिवंतपणी भूत या पात्राचं अभिनय करतं.
३) तसेच चित्रपट आणि सोशल मिडिया मार्फतही अशा भितीदायक गोष्टींना खात-पाणी मिळत आलेले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्याचेच पात्र अशा अवास्तव आणि अतार्किक गोष्टींशी संबंधित असल्याने त्याचा फार मोठा पगडा आपल्या मनावर लहानपणापासून पडतो.
४) आजही मुलांचे संगोपन करताना त्यांना अशाच प्रकारची भिती दिली जाते, त्यामुळे आपल्या अवतीभवती कोणतीतरी राक्षसी शक्ती आहे, जिचे आपल्यावर नियंत्रण आहे, अशा गोष्टींवर मुलांचा विश्वास बसायला लागतो.


उपचार :
१) अबोध मनातील दडलेल्या इच्छा, प्रेरणा आणि भितीदायक भावना यांना मोकळी पायवाट म्हणून जर अश्या व्यक्तींच्या अंगात आले नाही, तर तो मनातील दबाव वाढत जाऊन गंभीर डोकेदुखी सारखे शारीरिक आजार होण्याची दाट शक्यता असते, म्हणून अंगात येणे म्हणजे नेमकं काय ? अबोध मन म्हणजे काय ? यासंदर्भात कुटुंबाचे, समाजाचे समुपदेशन होणे गरजेचे आहे.
२) स्वप्न विश्लेषणामार्फत (Dream Analysis) अबोध मनातील हा भितीदायक कप्पा बराचसा शिथिल करता येतो.
३) संमोहन शास्त्राचाही (Hypnotism) याठिकाणी फार मोठा फायदा व्यक्तीला होतो.
४) अशा व्यक्तींच्या ठिकाणी चुकीच्या तीव्र गैरसमजुती असतात, त्यासाठी REBT व CBT हे सायकोथेरपी महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
५) काही केसेसमध्ये धार्मिकतेचा आधार घेऊन त्याला शास्त्रीय वळण दिले जाते, उदा. भूलभुलैय्या चित्रपट.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!