Skip to content

IQ आणि EQ याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध ??

IQ आणि EQ याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध ??


सायली राजाध्यक्ष


आपल्याकडे बुद्ध्यांक किंवा IQ (Intelligence Quotient ) जितका महत्त्वाचा मानला जातो तितकं महत्त्व आपण भावनांक किंवा EQ (Emotional Quotient) ला देत नाही. आपल्या समजुतीनं, वाचनानं, शिक्षणानं सहज वाढवता येऊ शकतो आणि इक्यू आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

एखाद्या परिस्थितीत कसं वागावं, एखाद्या अडचणीला कसं तोंड द्यावं, माणसांशी कसं वागावं हे सगळं इक्यू चांगला असेल तर अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतं.

अनेक लोकांना आपल्या भावना योग्य त-हेनं व्यक्त करता येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ अनेक दिवसांनी एखादी व्यक्ती भेटली तर ती इतके दिवस का भेटली नाही याची प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. अर्थातच त्या व्यक्तीशी कसे संबंध आहेत यावरही प्रतिक्रिया अवलंबून असतेच. पण समजा त्या व्यक्तीनं सांगितलं की, मला बरं नव्हतं, तर त्यावर तिथे असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघणं रंजक असतं. एखादा माणूस लगेचच त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन, तिला हलकी मिठी मारून, आता कसा आहेस किंवा कशी आहेस हे विचारतो. पण इतर अनेक असेही असतात की त्यांना नेमकं काय करावं हे उमगत नाही किंवा आपल्या भावना जर सहज व्यक्त केल्या तर त्यांना तो स्वतःचा अपमान वाटतो. एखादा माणूस या माणसाकडे अविश्वासानं बघतो. एखादा माणूस त्यात काय एवढं असाही बघतो.

कौतुक करणं हेही आपल्याकडे दुर्लभच. त्यामुळे एखाद्यानं कौतुक केल्यावर कसं व्यक्त व्हावं हे अनेकांना समजत नाही. दिलखुलासपणे कौतुक स्विकारणारे विरळाच. कुणी कौतुक केलं की आधी ज्यानं कौतुक केलंय त्याच्याकडे अविश्वासानं बघणारे लोक असतात. अगदी वरपासून खालपर्यंत बघतात. कौतुकाचा, प्रेमाचा कसा स्वीकार करायचा ते आपल्याकडे शिकवलंच जात नाही. दुसरीकडे दिलखुलासपणे कौतुक करणारे लोकही कमी असतात. एखादी छान गोष्ट बघितली तर उत्स्फूर्तपणे छान असं म्हणणारे लोक कितीसे असतात?

शाळा कॉलेजात भरभरून मार्क मिळवणा-या अनेकांना लोकांशी कसं बोलावं याचं साधं ज्ञान नसतं. याचं कारण घरातच अभिव्यक्ती ही गोष्ट किती महत्त्वाची आहे ते शिकवलं जात नाही. परवा Whatsapp वर एक विनोद वाचला – अमेरिकेत आजारी माणसाला भेटल्यावर Get well soon म्हणतात, इंग्लंडमध्ये Wish you a speedy recovery असं म्हणतात तर भारतात आमचे काका यानंच गेले हो असं सांगतात! आता यातला विनोदाचा भाग सोडा पण हे किती खरं आहे.

मी सध्या सुलभा ब्रह्मनाळकर यांचं डॉक्टर म्हणून जगवताना हे पुस्तक वाचतेय. पुस्तक फार छान आहे. त्यातलं एक प्रकरण भावनांकाच्या अनुषंगानं आहे. त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी लिहिलंय की किती लहानपणापासून आपण मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असतो. म्हणजे दवाखान्यात लहान मूल आलं, ज्याला व्यवस्थित बोलता येतंय आणि कळतंय या वयातलं मूल. तर काय झालंय विचारल्यावर त्याची आई किंवा वडीलच उत्तरं देत राहतात. म्हणजे कुठे दुखतंय हे विचारल्यावर तेही आईवडीलच दाखवतात. त्याउलट त्यांच्याकडे एकदा परदेशात राहणारी, पाहुणी म्हणून भारतात आलेली मराठी मुलगी आली. तिनं मात्र सगळं विचार करून व्यवस्थित सांगितलं. कारण परदेशात मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून फार लहानपणापासून वाढवलं जातं.

तुम्ही खूप हुषार आहात, भरपूर पैसे मिळवता आहात हे सगळं खरं असलं तरी जर तुम्हाला भावनांची अभिव्यक्ती जमत नसेल तर सगळं व्यर्थ आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

7 thoughts on “IQ आणि EQ याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!