आपल्यातील हे १६ व्यक्तिमत्व घटक आपलं संपूर्ण मानसिक विश्व बॅलन्स करत असतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळं असतं. त्याची विचार करण्याची पद्धत भावना व वर्तन सर्व भिन्न असतात. बरेचदा व्यक्तिमत्व म्हटलं की आपलं लक्ष बाह्य गोष्टींकडे जातं. जसे की व्यक्तीचा पेहराव केशभूषा इत्यादी. परंतु व्यक्तिमत्व हे फक्त बाह्य गोष्टींवर आधारलेलं नसून त्यात अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतात.
म्हणजेच एका व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असे आहे अस आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते बनत कसं, त्यात नेमक असतं काय ज्या आधारे ती व्यक्ती असं वागत असते, विचार करत असते हेही लक्षात घेतले पाहिजे. तर व्यक्तिमत्त्व हे त्याच्या मध्ये असलेल्या विविध गुणांच्या मिश्रणातून होत असतं. त्याच्या मध्ये विविध गुणवैशिष्ट्यांचा समावेश होत असतो.
आता ही गुणवैशिष्ट्ये कोणती, त्यांचा व्यक्तीवर कसा परिणाम होतो व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो. त्यामध्ये कमी-जास्त पणा झाला की व्यक्तिमत्व कसे बनते मानसिकता कशी बनते यामध्ये मानसशास्त्रामध्ये बरेच संशोधन झाले. त्यातून अनेक सिद्धांत आले. यातच अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत Raymond cattle यांनी मांडला. तो म्हणजे सोळा व्यक्तिमत्व घटक सिद्धांत. कॅटल असे म्हणतो की हे जे सोळा गुण आहेत ते व्यक्तीच्या बाह्य वर्तनातून सहज लक्षात येत नाहीत.
परंतु त्यांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये खूप वाटा आहे. कॅटेल ने यावर आधारित चाचणी विकसित केली ज्यामध्ये त्याने या सोळा गुणांच्या आधारे प्रश्नावली तयार केली. तसेच या सोळा गुण घटकांची दोन्ही टोके यामध्ये दिलेली आहेत. म्हणजेच एखादा गुण एखाद्या व्यक्तीमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात आणि तोच गुण एखाद्या व्यक्तीमध्ये खूप कमी प्रमाणात असतात त्या त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो त्याचे विचार असतात कसे त्याचे व्यक्तिमत्त्व कसं असतं हे सगळं यातून लक्षात येतं. व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज आपल्याला यातून बांधता येतो. ते घटक कोणते ते आपण पाहू.
१. उबदारपणा: (warmth) उबदारपणा म्हणजे मायाळू, प्रेमळ सर्वांना सामावून घेण्याचा स्वभाव. आपुलकीने वागण्याचा स्वभाव.
आता हा गुण त्यांच्यामध्ये कमी असतो अशा व्यक्ती शांत, अलिप्त, लोकांमध्ये जास्त न मिसळणाऱ्या, भिडस्त, काहीशा संकुचित वृत्तीच्या असतात.
हाच गुण त्यांच्यामध्ये अधिक असतो अशा व्यक्ती प्रेमळ इतरांमध्ये राहणाऱ्या दयाळू वृत्तीच्या असतात.
२. तार्किकता: (reasoning) एखाद्या गोष्टीमागे कार्यकारणभाव शोधणे ती गोष्ट अशीच का याचा तर्क लावणे अशी घडते याचे काय कारण असू शकत. दोन गोष्टींच्या आधारे तिसऱ्या गोष्टीचा त्यांच्याशी संबंध जोडणे या गुणाला म्हणतात तार्किकता.
या गुणाची कमतरता त्यांच्यामध्ये असते त्या व्यक्तींची बुद्धिमत्ता तुलनेने कमी असते त्यांचे विचार करण्याची पद्धत एका साचेबंद पद्धतीची असते. अमूर्त अशा संकल्पना किंवा त्या पद्धतीच्या समस्या जिथे सृजनशील वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो यांच्यामध्ये कमी दिसून येतो. याउलट हा गुण ज्यांच्या मध्ये जास्त असतो त्या बुद्धिमान हुशार मानसिक क्षमता जास्त असणाऱ्या लवकर शिकणारे असतात.
३. भावनिक स्थिरता: (emotional stability) परिस्थितीला योग्य अशी भावना देणे. योग्य प्रमाणात भावना व्यक्त करणे तसेच कोणत्या गोष्टीने पूर्णपणे ढासळून न जाता आपला मानसिक तोल सांभाळणे या साठी जो गुण लागतो त्याला म्हणतात भावनिक स्थिरता.
हा गुण त्यांच्यामध्ये अल्प प्रमाणात असतो त्या व्यक्ती भावनाविवश होऊन निर्णय घेतात अस्थिर असतात लगेच उदास होतात.
तसेच ज्यांच्या मध्ये जास्त स्थिरता असते त्या व्यक्ती समायोजित, परिपक्व वास्तवाला शांततेने सामोरे जाणारे असतात.
४. वर्चस्व गाजवणे: (dominance) एखाद्या वस्तूवर व्यक्तीवर समूहावर किंवा एखाद्या प्रदेशावर स्वतःची सत्ता गाजवणे अशा पद्धतीचे वृत्ती असणे म्हणजे वर्चस्व गाजवणे. अनेक हुकूमशहा मध्ये आपल्याला गुण पाहायला मिळतो. हा गुण त्यांच्यामध्ये कमी असतो त्या व्यक्ती सहयोगी भांडण टाळणाऱ्या नंबर आज्ञाधारक गरीब स्वभावाचा व परिस्थिती नुसार स्वतःला ढाळून घेणार्या असतात.
हा गुण ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो त्या व्यक्ती हुकुमशाही आक्रमक ठाम, हट्टी, स्पर्धात्मक वृत्तीच्या असतात.
५. जिवंतपणा/ चैतन्य: (liveliness)आयुष्य भरभरून जगणे नव्या उमेदीने जगणे. जिथे जाईल तिथे त्या परिस्थितीमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आणणे म्हणजे चैतन्य. हा गुण ज्यांच्यामध्ये कमी असतो त्या व्यक्ती गंभीर, अंतर्मुख, शांत, मितभाषी, शहाण्या वृत्तीच्या असतात.
ज्यांच्यामध्ये हा गुण जास्त असतो त्या उत्स्फूर्त आनंदे हॅपी गो लकी स्वभावाच्या असतात.
६. नियमाप्रति जागरूक असणारा:(rule consciouness) सद्सद्विविवेक भाव, जबाबदारीची जाणीव असणे कर्तव्याला जागणे तो हा गुण.
हा गुण ज्यांच्यामध्ये कमी असतो त्या व्यक्ती नियमांचे पालन करताना दिसत नाहीत स्वतःच्या आनंदाकडे यांचे जास्त लक्ष असते.
अर्थातच हा गुण त्यांच्यामध्ये जास्त असतो त्या नियम पाळणाऱ्या नीतिमत्ता पाळणाऱ्या गंभीर असतात.
७. सामाजिक धैर्य:(social boldness) समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे कोणत्या प्रकारची भीती न बाळगता नवीन प्रसंगाना सामोरे जाणे धोका पत्करणे म्हणजे सामाजिक धैर्य. सामाजिक धैर्य कमी असणारी व्यक्ती लाजाळू धोक्यांना, घाबरणारी, भित्र्या स्वभावाची असते. तसेच हा गुण जास्त असणारी व्यक्ती सामाजिक दृष्ट्या न घाबरणारी धोका पत्करणारी असते.
८. संवेदनशीलता:(sensitivity) समोरच्याच्या सुखदुःखाची जाणीव असणं एखाद्याला काय वाटेल काय वाटू शकतो याच्याबद्दल जाणीव असणे. एखाद्या गोष्टीचा फरक पडण याचा अर्थ संवेदनशीलता. ज्या व्यक्ती कमी संवेदनशील असतात त्या उपयुक्ततावादी कणखर, स्वावलंबी, मस्करी न आवडणाऱ्या असतात तसेच भावनाशून्य असतात. ज्यांच्या मध्ये संवेदनशीलता जास्त असते त्या व्यक्ती संवेदनशील सौंदर्याची जाण असणाऱ्या भावनाशील मृदू स्वभावाच्या असतात.
९. सावधानता:(vigilance) आपल्या आजूबाजूला अनेक अशा व्यक्ती असतात ज्या प्रत्येक गोष्टीत खूप जास्त जागरूक पटकन विश्वास न ठेवणाऱ्या सावधान राहणाऱ्या असतात. हा गुण ज्यांच्यामध्ये कमी असतो त्या विश्वासू लगेच गोष्टींचा स्वीकार करणाऱ्या विनाअट एखादी गोष्ट मानणाऱ्या असतात. तसच हा गुण ज्यांच्यामध्ये जास्त असतो त्या संशयी लगेच विश्वास न ठेवणाऱ्या अशा असतात.
१०. अमूर्तता:(abstractedness) चित्र सर्व काढतात गाणी सगळेच म्हणतात परंतु एखाद्या चित्रकाराचे चित्र एखाद्या संगीतकाराचं संगीत हे इतरांपेक्षा वेगळं ठरतं त्याचं कारण आहे त्यांच्यामधला असलेला गुण.अमुर्त ता म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने नवीन नजरेने पाहणे एखादी समस्या सोडवताना वेगळ्या पद्धतीने त्यावर विचार करणे सर्जनशीलता आणणे. हा गुण कमी असणाऱ्या व्यक्ती व्यवहारी समस्या समस्या सोडवणार या रूढी बद्ध नियमांना पाळणाऱ्या असतात. हा गुण ज्यांच्या मध्ये जास्त असतो त्या कल्पना मध्ये राहणाऱ्या, अव्यवहारी, स्वप्नाळू स्वभावाच्या असतात.
११. खाजगीपणा:(privateness) बऱ्याच जणांना आपल्या बद्दल फारसं बोलणं जास्त मिसळणे आवडत नाही कारण हा गुण. ज्यांच्यामध्ये हा गुण कमी असतो त्या स्पष्ट प्रामाणिक निष्कपटी साध्या असतात. तसेच त्यांच्या मध्ये गुण जास्त असतो त्या अलग स्वतःच्या गोष्टी उघड न करणाऱ्या असतात. चतुर असतात.
१२. काळजी:(apprehension) माझं पुढे कसं होईल काय होईल सर्व नीट होईल ना हे या गुणामध्ये वाटत राहते. काळजी कमी असणाऱ्या व्यक्ती स्वतःबद्दल खात्री असणाऱ्या आत्मसंतुष्ट अपराधीपणा नसलेल्या आत्मविश्वासू असतात. तसेच गुण त्यांच्यामध्ये जास्त असते त्या स्वतः संशय घेणाऱ्या सतत काळजी करणाऱ्या अपराधी वाटुन घेणार्या असुरक्षित स्वतःला दोष देणाऱ्या असतात.
१३. बदलाला मोकळेपणाने सामोरे जाणे:(openness to experience) व्यक्तीचा आयुष्य हे कधीही स्थिर नसतं प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या बदलाला सामोरे जावे लागते व्यक्ती कशा पद्धतीने त्या बदलाला सामोरे जाते हे या गुणावर ठरत. हा गुण कमी असणाऱ्या व्यक्ती पुराणमतवादी परंपरा मानणाऱ्या नवीन बदलांना लगेच सामोरं न जाणाऱ्या असतात. हा गुण जास्त असणारे व्यक्ती मोकळेपणाने सामोरे जाणाऱ्या, प्रयोगशील, मोकळ्या विचारांच्या व लवचिक प्रवृत्तीच्या असतात.
१४. आत्मनिर्भरता:(self reliance) स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहणे तो गुण म्हणजे आत्मनिर्भरता. हा गुण त्यांच्यामध्ये कमी असतो त्या समूहवादी, अवलंबी असतात. ज्यांच्यामध्ये हा गुण जास्त असतो ते आत्मनिर्भर, व्यक्तिवादी, स्वयंपूर्ण असतात.
१५. परिपूर्णता:(perfectionism) कोणतीही गोष्ट पूर्णपणे ताकत लावून करणे. केली तर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न असणे परिपूर्ण करणे म्हणजे हा गुण. हा गुण कमी असणाऱ्या व्यक्ती लवचिक, असणाऱ्या तसेच भावनाविवश, समाजाच्या नियमांच्या बाबतीत निष्काळजी असणाऱ्या असतात. ज्यांच्या मधे हा गुण अधिक असतो संघटित स्वयंशिस्त असणाऱ्या सामाजिक दृष्ट्या स्थिर, नियंत्रित असतात.
१६. ताण:(tension) एखाद्या गोष्टीचा लगेच टेन्शन घेणे. त्यामुळे चिडचिड, होणारा त्रास होणे, त्यानुसार काही काम करणे म्हणजे ताण.
हा गुण ज्यांच्यामध्ये कमी असतो त्या तणावमुक्त शांत संयमी असतात. तसेच हा गुण ज्यांच्यामध्ये कमी असतो ते तणावग्रस्त असतात, असंयमी असतात.
हे सर्व गुण कोणत्याही प्रकारे व्यक्तीला चांगलं-वाईट ठरवत नाहीत तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रदर्शित करतात. यातून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होते एखादा गुण कमी असेल तर तो आपण कसा वाढवू शकतो किंवा एखादा गुण जास्त आहे त्यामुळे त्रास होतो त्याला कशा पद्धतीने कमी करू शकतो हे समजायचं असेल तर आधी आपल्याला स्वतःचे व्यक्तीमत्व ओळखून घ्यावे लागते.
आणि त्यासाठी हे सगळे गुण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जर आपल्याला आपल्या बद्दल आपल्या व्यक्तिमत्त्व बद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळाली चांगल्या पद्धतीने समजलं तर येणाऱ्या समस्या पण चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
लेख आवडला
Changla
अतिशय सुरेख व उपयुक्त माहिती आहे.👍