Skip to content

सत्र अकरावे :- स्वतःची ओळख विसरणे (Dissociative Fugue)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)

सत्र अकरावे :- स्वतःची ओळख विसरणे (Dissociative Fugue)


या आजाराने त्रस्त व्यक्ती स्वतःचे नाव, गाव, नातेवाईक, घर आणि स्वतःची एकूणच ओळख विसरलेले असतात. व्यक्ती एकाएकी आपले मूळ ठिकाण सोडून नव्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करते. एवढेच नाही तर तेथेच काम धंदा सुरु करते. नवे मित्र, नातेसंबंध निर्माण करून स्वतःची अशी नवीन ओळख बनवते. एक नवे आयुष्य सुरु करते. परंतु हे सारे करीत असताना त्रस्त व्यक्तीमध्ये मनोविकाराची कोणतीही उघड अशी लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीच्या नव्या आयुष्यामधील मित्र-मैत्रिणींना तिच्या वागण्या-बोलण्यात खटकण्याजोगे असे काही वाटत नाही. आणि तिचे हे आयुष्य पुढे सुरळीतपणे चालू राहू शकते. पण भूतकाळात घडलेल्या गोष्टी त्यांना मुळीच आठवत नसल्याने आणि त्याला मानसिक आघात हे मुख्य कारण असल्याने या आजाराचा समावेश विकृतीमध्ये करण्यात आलेला आहे.


केस :
त्या दिवसानंतर अमित पुन्हा घरी आलाच नाही. अमित हा एक विवाहित तरुण असून २ वर्षाअगोदरच त्याचा विवाह झाला होता. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी अर्चना खूप आनंदी होती. ती अमितची खूप आतुरतेने वाट पाहत होती. त्या दिवशी अमित लवकर घरी येऊन तिला सिनेमाला घेऊन जाणार होता. पण त्या दिवसापासून आजपर्यंत अमित घरी आलाच नाही. पोलिस कंप्लेंट सर्व करून झाले पण अमितचा कुठे पत्ताच नाही. या घटनेला आज जवळजवळ सहा महिने होतील. त्यादिवशी अचानक नागपूरला अर्चनाला अमित दिसला, अमितला बघता क्षणीच अर्चना ढसाढसा रडू लागली, पण अमितने अर्चनाला मुळीच ओळखले नाही. तर मग नेमकं अर्चनाला न ओळखण्या इतपत अमितच्या बाबतीत काय घडलं होतं ? तर तो प्रसंग असा होता की, त्यादिवशी अमितला ऑफीसमधून बॉसने महत्वाच्या कामासाठी दहिसर ला पाठवले आणि तेथून बॉसने घरी जायची परवानगीही दिली. तिकडचे पटकन काम उरकून अमित घरीच जाणार होता. अमितला कल्याणहुन दहिसरला जायलाच ५ वाजले. अमितला कळून चुकले होते की आता आपण आपल्या बायकोला वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे अमितने अर्चनाला फोन करून सविस्तर माहीती दिली. सुरुवातीला अर्चना थोडीशी रुसली पण नंतर “व्यवस्थित घरी या” हे तिचे शेवटचे दोन शब्द ! अमितला दहीसर वरून निघायलाच ८ वाजले. अमितने बॉस ला फोन करून काम झाल्याची माहिती दिली आणि बॉसने खुश होऊन अमितला उद्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीही दिली. अमितला हे काम करण्याचे २० हजार रुपये मिळाले होते. त्याने अर्चनासाठी साडी आणि तिच्या आवडीची भेटवस्तू खरेदी केली. रात्री १२. ११ ची अमितने दादरहून अंबरनाथ रेल्वे पकडली. डब्यात कोणीच नसल्याने अमित दरवाज्यावर उभा होता. कुर्ला स्टेशनवर ५ व्यक्तींचा ग्रुप डब्यात चढला. ते सर्वजण अमित ज्या दरवाज्यावर उभा होता तेथेच उभे राहिले. आता गाडी थेट ठाण्याला थांबणार होती, जशी गाडी कुर्ल्यावरून निघाली अमित डुलक्या घायला लागला. एक डुलकी तर त्याने अशी घेतली की अमित खाली पडतापडता वाचला, कारण त्या चार पैकी एका व्यक्तीने त्याचा हात धरला व त्याला आत खेचले आणि अमितला ओरडून आत बसायला सांगितले. अमित आत जाऊन बसला. तो खूप घाबरला होता. त्याची झोपच काहीशी उडाली होती. त्याच्या काही सेकंदामधेच अमित ज्या जागेवर उभा होता, त्या जागेवर उभी असलेली व्यक्ती रेल्वेतुन खाली पडली, ती दुसरी कोणीही नसून अमितचा हाथ पकडलेली व्यक्ती होती. त्या व्यक्तीने श्वास सोडला होता. एकूणच या प्रसंगाचा तीव्र मानसिक धक्का अमितला येऊन अमित जागीच चक्कर येऊन पडला आणि थेट हॉस्पिटल मधेच जागा झाला. तेव्हा अमितचा मोबाईल आणि पाकीट लंपास झाले होते. जेव्हा जाग आली अमितचे डोके प्रचंड दुखत होते. डॉक्टरांनी अमितला त्याचे नाव व पत्ता विचारले पण अमितला काहीच सांगता येईना. अमित स्वतःची ओळख हरवून बसला होता.


लक्षणे :
१) एखाद्या तणावग्रस्त प्रसंगात अशा व्यक्तींना प्रचंड मानसिक धक्क्यांना सोमोरे जावे लागते, त्यामुळे त्यांच्या स्मृतीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
२)  काही तास किंवा जवळजवळ ६ महिन्यांपर्यंत अशा व्यक्ती स्वतःची ओळख हरवून बसतात.
३) अगदीच स्वतःची बायको आणि आई-वडील यांचे चेहरेही ते ओळखू शकत नाही.
४) असे असतानाही दैनंदिन जीवनातील छोटे-मोठे काम ते व्यवस्थित करताना दिसतात.
५) अशा व्यक्तींना कोणतातरी आजार झाला आहे, हे त्यांच्या आयुष्यातल्या नवीन व्यक्तींना जाणवत नाही.


कारणे :
१) या विकृतीचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तीव्र मानसिक धक्का होय.
२) मानसिक धक्क्याने हाच आजार होतो असे नव्हे तर त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वानुसार व्यक्तीमध्ये विकृती उत्पन्न  होतात.
३) हा आजार होण्यामागे अनुवंशिक कारणही तितकेच महत्वाचे आहे.
४) मेंदूला इजा पोहोचणे किंवा अति मद्यपान यामुळे जर स्वतःची ओळख हरवत असेल तर तो आजार या आजारात मोडत नाही, अशा वेळी त्या आजाराला स्मृतीभ्रंश असे म्हणता येईल.
५) आपल्या अबोध मनात स्वतःचं रक्षण करणारी एक यंत्रणा असते, जर अशा वेळी ती परिस्थिती आपण विसरलो नाही तर गंभीर शारीरिक आजार घडण्याच्या शक्यता असतात, म्हणून त्या घटनेचे एकतर दमण होते किंवा विस्मरण होते, या संपूर्ण प्रक्रियेवर आपल्या अबोध मनाचे बारीक निरीक्षण असते.


उपचार :
१) जर व्यक्ती स्वतःची ओळख विसरली असेल तर लगेचच त्या व्यक्तीला ओळख पटवण्यासाठी त्या घटनेची आठवण करून देऊ नये, कारण धक्का सहन होणार नाही म्हणूनच तिच्या अबोध मनाकडून तो किस्सा विसरण्याची प्रक्रिया सुरु झालेली असते.
२) अशावेळी व्यक्तीला सहानुभूतीची, आपुलकीची, सुरक्षिततेची आणि प्रेमाची फार गरज असते म्हणून ती व्यक्ती जरी तुम्हाला ओळखत नसेल तरी तिच्या सानिध्यात राहील्यास फार चांगला आणि लवकर फरक पडू शकतो.
३) अशा व्यक्ती स्वतःची ओळख विसरून जेव्हा पुन्हा शुद्धीवर येतात, तेव्हा हीच खरी वेळ त्यांच्यावर उपचार करण्याची असते. कारण सर्व एकदम किंवा हळूहळू मानसिक धक्का पोहोचविणारा क्षण आठविल्यावर त्यांच्या Reactions काय असतील यावरून उपचाराची दिशा ठरवली जाते.
४) यामधील काही व्यक्ती भानावर आल्यानंतर प्रचंड डिप्रेशनमध्ये जातात, अशा वेळी व्यक्तीला relax करून अस्तित्व स्वीकारण्यासंबंधी उपचार केले जातात.
५) अशावेळी REBT आणि CBT हे उपचार तंत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात.



टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते.

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!