Skip to content

Id, Ego आणि Super-ego यांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी काय संबंध ??

Id, Ego आणि Super-ego यांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी काय संबंध ??


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


कुणाल कॉलेजला जाणारा एक २२ वर्षाचा तरुण. त्याचे कॉलेज गावाबाहेर असल्याने रोज त्याला बसचा प्रवास करावा लागे. एकदिवस असच तो कॉलेज सुटल्यानंतर बस स्टँड वर उभा होता. स्टँडवर नेहमीप्रमाणे खूप गर्दी होती. ऑफिसमधून येणारी लोक, शाळा, कॉलेजची मुल असा सर्वांचा गलका तिथे चालू होता . अशातच एक बस तिथे आली. सर्वांची एकच झुंबड बसमधे चढण्यासाठी. काही वेळाने लोक चढल्यावर बस निघून गेली. त्यावेळी कुणालच लक्ष बाजूला पडलेल्या एका पाकिटाकडे गेलं. पैशाचं पाकीट होत ते. त्याच्याव्यतिरीक्त कोणाचही लक्ष त्या पाकिटाकडे नव्हत.

कुणालच्या मनात सहज एक विचार डोकावून गेला. या पाकिटाकडे तसंही कोणाचं लक्ष नाही. काय बिघडणार आहे जर आपण हे पाकीट उचलल तर? आपल्याला काही पैसे मिळतील. त्यातून आपण काहीतरी घेऊ शकतो. परंतु लगेच त्याच्या मनात अजून एक विचार आला ज्याने त्याला तसं करण्यापासून थांबवलं. तो असा होता, दुसऱ्याच पाकीट घेणे चुकीच आहे, हे अजिबात योग्य नाही, नैतिकतेला धरून नाही. या दोन विचारांमुळे त्याला नेमकं काय करावे कळेना.

एक प्रकारच्या द्वंद्वात तो अडकला. दोन मिनिटं शांततेत गेली. मग मात्र त्याने मनात काही ठरवलं. त्याने ते पाकीट उचलून तिथे तिकीट काढण्याच्या ऑफिसमध्ये बसलेल्या एका माणसाकडे दिले व त्यांना सांगायला सांगितले जेणेकरून ते पाकीट ज्या कोणाचं आहे ते ती घेऊन जाऊ शकते. त्या वेळी त्याला हे वागणं योग्य वाटलं.

आता असा प्रश्न पडतो की तो मनाचा कोणता भाग होता जो त्याला पैसे घ्यायला भाग पाडत होता? तसच तो कोणता भाग होता जो तस करण्यापासून रोखत होता आणि शेवटी त्याने जी कृती केली त्याचे कारण काय असू शकेल?

तर याचे उत्तर आहे Id, ego आणि superego. सिग्मंड फ्रॉईड; प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ, ज्यांनी मानसशास्त्रामध्ये बहुमोल योगदान दिले. ज्यांनी मनोविश्लेषण सिद्धांत मांडला. त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मनाचे तीन भाग सांगितले आहेत. Id जो आपल्याला आपल्या जन्मापासूनच मिळतो. सर्व प्रकारच्या शारीरिक गरजा, वासना यामध्ये येतात.

मनाचा हा भाग सुख तत्वावर चालतो. याला चांगलं, वाईट नैतिक-अनैतिक, वास्तवता यातील काहीही माहीत नसतं. लहान मुलांमध्ये id जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. लहान मुलांना जे हवं ते दिलं की ती लगेच खुश होतात. त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं तर ती लगेच तोडफोड, आरडाओरड, रडारड सुरू करतात.

मनाचा हा भाग आपल्या जाणिवेच्या पातळीवर नसतो. म्हणूनच त्याला वास्तवाचं फार भानही नसतं. Id आयुष्यभर व्यक्तीमध्ये एखाद्या लहान मुलासारखाच राहतो. त्यामध्ये आनंद मिळवण्याची आणि विध्वंस करण्याची अशा दोन्ही भावना असतात.

मनाचा दुसरा भाग आहे ego. परंतु त्याआधी आपल्याला superego बद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या वयानुसार,तसेच आजूबाजूचे वातावरण, शिक्षण यातून त्यांची अशी एक मूल्यव्यवस्था, नैतिकता तयार होत असते. व्यक्तीचे स्वतःचे असे काही आदर्श तयार होत असतात. हे आदर्श, ही नैतिकता ज्या भागात असते, चालू राहत असते त्याला superego म्हणतात.

Superego हा नैतिक तत्वावर चालतो. यामध्ये समाजाच्या मान्यतेनुसार तसेच स्वतःच्या नैतिकतेनुसार वागण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असते. मोडेन पण वाकणार नाही अशा व्यक्तीमध्ये सुपरइगो प्रबळ दिसतो. जेव्हा व्यक्तीला अपराधीपणा म्हणजेच guilt येतो तेव्हा त्याने स्वतःच्या आदर्शांना सोडून काहीतरी काम केलेले असते. त्याची जाणीव व्हावी म्हणून ही भावना त्याला येते.

आता जेव्हा id आणि superego मध्ये युद्ध सुरू होतं. म्हणजेच एक भाग तर म्हणतो की मला फक्त सुख हवं आहे. त्यासाठी मी काहीही करू शकतो आणि superego त्याला तसं काही करू देत नाही कारण ते त्याच्या नैतिकतेला धरून नसतं. तेव्हा व्यक्तीच्या मनाचा जो भाग काम करतो त्याला ego असं म्हणतात.

Ego हा वास्तव तत्वावर आधारित आहे. Id आणि superego च्या द्वद्वामध्ये मध्यस्ती करण्याचे काम ego करतो. Id आणि superego या दोघांनाही आटोक्यात आणून त्याक्षणी काय योग्य ठरेल, ज्यातून नुकसान होणार नाही वा आनंदही मिळेल अशी कामे ego द्वारे केली जातात.
मोठे मोठे संत महात्मा ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून माणसाला जगावं कसं याची शिकवण दिली. त्यांच्यामध्ये superego जास्त प्रबळ दिसतो. त्यांनाही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी आपली नैतिकता सोडली नाही. त्याचप्रमाणे वय वाढल्यानंतर ही फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करणारे, चोर, गुन्हेगार यांच्यामध्ये आपल्याला Id प्रबळ दिसतो.

पण कितीही झाल तरी हे दोन टोकाचे भाग झाले. एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना आपल्याला पूर्णपणे कशाचा त्याग देखील करता येत नाही तसच समाजाच्या निती नियमांना तोडून ही चालत नाही. फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करून चालत नाही.

आपल्यासमोरही अनेकदा असे प्रसंग उभे राहतात जेव्हा आपल्याला समजत नाही कसं वागावं. परिस्थिती पण आपल्या हातात नसते. अशावेळी पूर्णपणे टोकाच्या भूमिका न गाठता म्हणजेच मी अमुक एक अशा पद्धतीने तो वागणार ज्यात मला एक तर आनंद मिळू शकेल किंवा मी अशा पद्धतीने वागेन त्यामध्ये मला त्रास होईल आणि इतरांनाही त्रास होईल परंतु माझे आदर्श टिकून राहतील असं न करता त्या परिस्थितीमध्ये काय योग्य ठरेल, वास्तवाला धरून असेल ज्यातून आपल्याला अपराधी वाटणार नाही व आपली समस्या सुटेल अस वागणं योग्य ठरत.

म्हणजेच जितका आपला Ego प्रबळ असेल वास्तवतेला धरून असेल आपल्या समोर आढळणाऱ्या समस्या सुटण्याच्या शक्यता वाढतील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!