” तुमच्या मुलांना तुम्ही लहानपणी केलेली “Enjoyment” केव्हा शिकवणार?? “
मधुश्री देशपांडे गानू
“बचपन के दिन भी क्या दिन थे
उडते फिरते तितली बनके..
“बालपण” शब्द उच्चारला तरी प्रत्येकाला आपलं लहानपण आठवतं. तो जीवनातला सर्वात सुखाचा, बिनधास्त काळ आठवतो. छोट्या छोट्या गोष्टीत, वस्तूंमध्ये दडलेला अपार आनंद आठवतो. बालपणीचे खेळ, सवंगडी आठवतात. आवडीचा खाऊ हा तर आठवणींचा खजिना असतो. प्रत्येक व्यक्ती बालपण म्हटलं की “Nostalgic” होतेच होते.
मग मामाचा गाव, आजीची मऊसूत मिठी, आजीची गोधडी तर आजही अनेकांकडे असेल. मावशी, काका, आत्या, किती जवळची आणि लांबची ही नाती आठवतात. सगळ्या चुलत, मामे, मावस भावंडांनी मिळून केलेली मस्ती आठवते. माझ्यासारखे जे चाळीस-पन्नाशीच्या अलीकडचे पलीकडचे आहेत. त्यांचं बालपण अगदी साधं सोपं, खूप आनंदाचं मोकळेपणाचं होतं.
आज पालक झालेल्या प्रत्येक आई-बाबांनी आपल्या लहानपणीच्या गंमतीजमती सांगितल्या तरी त्या मुलांपर्यंत पोहोचतातच असं नाही. कारण स्वानुभव हा खरा. प्रत्येकाच्या स्वतःच्या लहानपणीचा काळ हा त्याच्यासाठी खासच असतो. आणि हा खजिना तो आयुष्यभर मनाच्या कुपीत सांभाळून ठेवतो.
पण आजचा काळ लक्षात घेता आधीच्या पिढीचं बालपण आणि आत्ताच्या मुलांचे बालपण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आमच्या लहानपणी मुलगा/ मुलगी नियमित शाळेत जातात. पास होतात. एवढंच महत्त्वाचं होतं. आजच्यासारखी जीवघेणी रॅट रेस प्रत्येक ठिकाणी नव्हती. आज शीशुवर्गात इतक्या लहान मुलांना घातलं जातं.
आणि केजीपासून शाळेबरोबर त्यांचे इतरही क्लासेस सुरू होतात. आज अगदी छोट्यात छोट्या मुलाला त्याने रडू नये म्हणून मोबाईल हातात देणारे पालक जास्त आहेत. दोन तीन वर्षाच्या नकळत्या वयात मुलींना मॉडेल सारखे कपडे घालून त्यांना तसंच वावरायला शिकवलं जातं. आणि प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर अपलोड होते. लहान मुलांचे निरागस निष्पाप बाल्यच हरवून गेलंय. आज अत्यंत उद्धट, उर्मट, उद्दाम वागणाऱ्या मुलांना “smart kid” म्हटलं जातं.
पालकांच्या लहानपणी त्यांनी जे नैसर्गिक वातावरणात मैदानी खेळ खेळले असतील ते तर आता विस्मरणात गेले आहेत.. लगोरी, आट्यापाट्या, विषामृत, विटीदांडू, खोखो असे कितीतरी खेळ आम्हीं लहानपणी खेळायचो. या खेळात आणि सवंगड्यां मध्ये इतके रमून जायचो की घरी जायची आठवणही नसायची. आज मात्र आत्ताच्या लहान मुलांना खूप लहान वयातच अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. पूर्वीसारखी सुरक्षितता ही आता राहिली नाही. आणि पालकही आता जास्त सावध आणि overprotective झाले आहेत. त्याला तशी कारणेही आहेत.
खरं म्हणजे आत्ताची लहान मुलं आणि त्यांची enjoyment आणि पालकांची किंवा आजी-आजोबांची लहानपणीची enjoyment अशी तुलना करताच येणार नाही. करणे योग्यही नाही. आता सगळेच अर्थ, आयाम, काळ आणि वेग बदललं आहे. वेगवान स्पर्धात्मक युगात मुलांना नैसर्गिक मोकळं वागायला, हुंदडायला, बागडायला वेळही नसतो आणि जागाही नाही.
टीव्ही आणि मोबाईल याच्या अतिवापरामुळे शारीरिक कसरत, मैदानी खेळ, सवंगडी असे शब्दही मागे पडलेत. बहुतेक घरटी एकच मूल असतं. त्यामुळे ते एकलकोंडं होतंच. शेअरिंग आणि केअरिंग ची सवय लागतच नाही.
अशावेळी मग पालकांनी काय करायचं?? पालकांना वाटतं की आमचं बालपण मस्त मौजेचे होतं. आपल्या मुलांना ती मजा करता येत नाही. तर त्यासाठी पालकांनी आजही काही गोष्टी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक वेगळ्या करायला हव्यात.
१) तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं हे अधिक मोकळं, विश्वासाचं, एका पातळीवर मित्रत्वाचं हवं. ही सर्वस्वी पालकांची जबाबदारी आहे.
२) तुम्ही कितीही करिअर ओरिएंटेड असलात तरीही मुलांना क्वालिटी टाईम देता आलाच पाहिजे. तुमचे बालपणीचे किस्से गोष्टी सांगा. तुम्हीं खेळलेले खेळ मुलांना शिकवा. पत्ते, बुद्धिबळ, मैदानी खेळ इत्यादी. या खेळांमुळे मेंदू ही तल्लख व्हायला मदत होते.
३) संस्कार. अत्यंत महत्त्वाचा मुलांच्या वाढीचा टप्पा. Outdated समजून संस्कार सोडून देऊ नका. फक्त सुसंस्कार माणसाला प्रत्येक प्रसंगात तारतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तम संस्कार होणे खूप गरजेचे आहे. तेही कृतीतून. मुलं तुमचं पाहून शिकतात हे लक्षात ठेवा. मुळात पालकांनी तसं वागणं आधी अपेक्षित आहे. मुलांच्या IQ ला महत्व देताना त्याचा EQ ही तेवढाच जपायला हवा. त्याच्या Happiness Quotient ला महत्त्व द्या.
४) सर्वात प्रथम पालक स्वतः समाधानी आणि आनंदी असायला हवेत. तर तुमचं मूल आनंदी व्यक्ती बनेल.
५) प्रात्यक्षिकातून शिकवा. नुसती पुस्तकी पोपटपंची नको. त्यांना मातीची भांडी बनवायला शिकवा. मातीचा feel त्यांना घेऊ द्या. मनसोक्त मातीत, पाण्यात खेळू द्या. आजारी पडतील म्हणून घाबरत बसू नका. शेती कशी करतात ते प्रत्यक्ष दाखवा. त्यांना त्या कामात सहभागी करून घ्या.
६) आम्हांला आणि मुलांना वेळच नसतो हे पालुपद बंद करा. आवर्जून सर्व नातलगांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घ्या. मुलांना सगळी नाती समजतील असे नातेसंबंध जपा.
७) तुमची शाळा, कॉलेज याठिकाणी आवर्जून मुलांना घेऊन जा.
८) घरातील लहान मोठ्या कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या. “मुलांना काय कळतंय?” असा चुकीचा गैरसमज बाळगू नका.
९) मुलांचं कितीही क्षुल्लक म्हणणंही नीट लक्षपूर्वक ऐका. आजच्या पालकांना मुलांचं ऐकायलाच वेळ नसतो. त्यामुळे पालक आणि मुलं हे नातं आज विस्कळीत झालेलं आहे.
१०) तुम्ही तुमच्या नोकरी-व्यवसायात खूप गुंतलेले असता, म्हणून तुमचं guilt घालवायला मुलांवर भेटवस्तूंचा भडीमार करू नका.
११) दिवसातला ठराविक वेळ हा पालक आणि मुलांनी टीव्ही, मोबाइल शिवाय एकत्र घालवायला हवा. तरच संवाद टिकून राहील.
आपण आपल्या लहानपणी आनंदी, खेळकर मूल होतो, असं पालकांना वाटत असतं ना! अगदी त्याच भौतिक गोष्टी, त्याच गंमतीजमती आपण आज मुलांना देऊ शकत नाही. आत्ताच्या मुलांची enjoyment concept च वेगळी आहे. त्यांना मॉलमध्ये फिरायला आवडतं. मल्टीप्लेक्समध्ये मूवी बघायला आवडतं. हिल स्टेशन वर हॉलिडे ला जायला आवडतं. लेटेस्ट गॅझेटस् आवडतात. आणि आजच्या काळाप्रमाणे त्यांचे बालपण म्हणून ते करत असलेली ही enjoyment बरोबरच आहे. हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.
आपलं मूल ही कायम आनंदी खेळकर असावं असं पालकांना वाटत असेल तर त्याचं बाल्य, निरागस असणं जपणं आज खूप आवश्यक आहे. पालक म्हणून शिस्त तर तुम्हीं लावताच. पण तुमचं मूल हे तुमच्या अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे साधन नव्हे. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जसं निसर्गात कळीचं अलगद फूल होतं त्याच हळुवारपणे तुमच्या मुलाला फुलू द्या. त्याचा आनंद हा तुमच्यासाठी सर्वपरि असायलाच हवा. बघा.. तुम्हांलाही अजून नवीन काही नक्कीच सुचेल. पटतंय ना!
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

